बरेच दिवस काम न करता घरात बसून राहणे सर्व सामान्यांना परवडणारे नव्हते.. सर्वच ठिकाणंचा कामधंदा बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.. आता काय करायचं..? हा त्यांच्या समोर प्रश्न उभा राहिला.. बाहेरून शहरात आलेल्यांना शहरात राहणे मुश्किल झाले.. शेवटी त्यांना एकच वाट दिसली आणि ती म्हणजे गावाकडची वाट.. लाॅकडाऊन असल्याने वाहने तर बंदच होती, मग जायचं कसं..? हा त्यांच्या समोरील यक्षप्रश्न.. काहीने तर बऱ्याच शक्कली लढवून मार्ग काढला , परंतु काहीना मात्र चांगलाच चटका लागला फक्त काळजाला नाही तर पायाला ही.. त्यांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला.. हजार किलोमीटर जायला वाहनाला सुद्धा दोन दिवस लागतात, तर विचार करा या पायी जाणाऱ्यांना किती दिवस लागले असतील.. तरीही शहरातून लोंढेच्या लोंढे गावाच्या दिशेने जावू लागले.. सुरूवातीला काहींना अडवण्यात ही आले , परंतु नंतर त्यांचा रोष बघून थोडीफार ढिल देण्यात आली.. काहीतर हजार किलोमीटर प्रवास करून गावी पोहचले ही, परंतु गावाच्या वेशीवरच त्यांना अडवण्यात आले.. गावोगावी ‘गावबंदी’ अशी स्वयंघोषित संकल्पना राबविण्यात आली होती..
पूर्वी शहरातून गावी येणाऱ्याला घरी बोलावून चहा-नास्ता दिला जायंचा , पण आज मात्र गावाच्या वेशीवर पण उभा राहू देत नव्हते.. या कडवट प्रवासात काही ठिकाणी देवदूत ही भेटले हे मात्र विसरता कामा नये.. म्हणतात की फाळणी नंतरचं सर्वात मोठं स्थलांतर होतं हे.. फाळणीचा स्थलांतर मी पाहिला नाही पण हे बघून त्याची प्रचिती मात्र थोड्याफार प्रमाणात मला आली.. या स्थलांतरित लोकांकडे तरी त्यांच्या घराचा पत्ता होता.. पण त्यांच्याकडं.. ना घर होतं .. ना कुठल्या घराचा पत्ता.. होती फक्त वाट.. आणि त्या वाटेने नुस्तं चालायचं बस.. मग विचार करा त्यांचं कसं झालं असेल.. नुसती कल्पना केली तरी डोळ्यातून आपसूकच पाणी येतं..
तसे लाॅकडाऊन , क्वाॅरंटाईन , सॅनिटाइजर , पीपीई किट हे शब्द मी कधी ऐकलेच नव्हते.. बहुधा मी मराठी मिडीयम मधून असल्याने माहीत नसावे.. या सॅनिटाइजरच्या नावाने खूप मोठा काळाबाजार झाला.. काही असंवेदनशील लोकांनी तर साबणाचं पाणी- शॅम्पूचं पाणी बोटल मध्ये भरून हेच सॅनिटाइजर आहे म्हणून भाबड्या लोकांना लुटले.. ज्यांना एरवी कोणी कुत्रं सुद्धा विचारणार नव्हतं असे नको नको ते सॅनिटाइजरचे ब्रँड मुबलक प्रमाणात बाजारात आले.. काही हॉस्पिटलांनी तर कहरच केला.. अवाच्या-सव्वा बिलं आकारून हतबल रूग्णांना लूटले.. हि बाब नंतर आॅडीट मध्ये समोर आलीच..
एरवी २ ते ३ रूपयाला मिळणाऱ्या मास्कची किंमत आता १० ते १२ रूपये झाली होती.. N-95 मास्कची किंमत तर विचारूच नका, तो तर आमच्या नशिबी कधी आलाच नाही.. कोरोनाचा सामना करणारे कोरोना योद्धा यांना मात्र एकदाच दोन संकटांना सामोरे जावे लागले.. कर्तव्य निभावताना कोरोनाशी आणि दुसरं म्हणजे भाड्याने राहत असल्यामुळे घर मालकाशी.. तुमच्यामुळे आम्हाला ही कोरोना होईल म्हणून अनेक घर मालकांनी त्यांच्याकडे घर खाली करण्याचा हट्ट धरला.. एखादा जर कोरोना पॉझिटीव्ह सापडला तर लोक त्याच्याकडे अशा नजरेने बघायचे कि त्याला आपसूकच वाळीत टाकल्या सारखे वाटायचे.. एवढे सर्व होत असताना देश मात्र अजूनही लाॅकडाऊनच होता..
कोरोनाचा एक ही लक्षण त्याला दिसत नव्हते , मग नक्की काय झालं असावं असा आम्ही विचार करतो नी करतो तोच बाजूने जाणाऱ्या एका रिक्षावाल्याने आवाज दिला की त्याला फिट आली आहे.. त्याने बाजूलाच असलेल्या एका घरातून एक कांदा घेतला.. आम्ही दोघे त्या व्यक्तीच्या जवळ गेलो.. रिक्षावाल्याने कांदा फोडून त्याच्या नाकासमोर धरला.. तो आणखीनच जोराने झटके मारू लागला.. आता मात्र आम्ही घाबरलो.. त्याला व्यवस्थित बसला करून नाकाला कांदा लावून ठेवणे आवश्यक होते.. आम्ही दोघांनी पकडून त्याला बसला केला.. कांद्याने त्याला जरा तरतरी येत आहे हे बघून रिक्षावाल्याने कांदा आमच्या हातात देवून पाच मिनिटे असेच धरून ठेवा असे सांगून निघून गेला.. मी त्याला पाठीमागून धरून ठेवला आणि मित्राने त्याच्या नाकासमोर कांदा पकडून ठेवला.. थोड्या वेळाने तो माणूस उठून उभा राहायचा प्रयत्न करू लागला.. आम्ही त्याला रस्ताच्या बाजूला घेवून गेलो..
आता थोडा वेळ इथे बसू देवू मग याला जावू देवू असा आम्ही विचार केला.. पण तो काही बसण्याचा नाव घेईना तरीपण आम्ही प्रयत्न करून त्याला कसतरी बसवलं.. आम्ही बाजूला जाताच तो उठून उभा राहिला आणि चालू लागला.. चालताना त्याचा तोल जात होता.. आम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो काही थांबला नाही.. तो तसाच निघून गेला.. कोण होता.. कुणास ठाऊक.. तो गेल्यानंतर मी मित्राला विचारलं जर त्या व्यक्तीला कुणीच मदत केली नसती तर काय झालं असतं..? अशा फिट मुळे मृत्यू होवू शकतो का..? तेव्हा तो म्हणाला की मेंदूला जर रक्त व आॅक्सिजन पुरवठा व्यवस्थित झाला नाही की फिट येते.. अशाने मृत्यू ही होवू शकतो..
या घटने नंतर एक गोष्ट मात्र माझ्या लक्षात आली, ती म्हणजे कोणत्या आजाराची कोणती लक्षणे असतात आणि त्याच्यावर प्रथमोपचार काय असतात..? हे प्रत्येक व्यक्तीला माहित असणे आवश्यक आहे.. आज प्रथमोपचारामुळेच एकाचा जीव वाचला होता. संकटे येतील संकटे जातील.. कोरोना ही एके दिवशी नष्ट होईल पण माणूसकी मात्र हरपू देवू नका.. मित्राचा निरोप घेवून मी ही घरची वाट धरली..
कामावरच असताना मला वहिनीचा फोन आला की, तुम्ही आले का..? यांना डाॅक्टरकडे घेऊन जावू या.. श्वसनाचा थोडा त्रास होत आहे.. डाॅक्टरांची ७ वाजता Appointment घेतली आहे .. श्वसनाचा त्रास..! ऐकून मला जरा धक्काच बसला.. कोरोनाचं सगळ्यात मोठं लक्षण हेच असते.. हे मी एेकले होते, वाचले होते आणि न्यूजला बघितले देखील होते.. मी घरी आल्यानंतर भावाला घेवून हाॅस्पीटलला गेलो.. वहिनी ही सोबत होतीच.. हाॅस्पीटलच्या बाहेर सेक्युरिटी गार्ड आणि आणखी दोन व्यक्ती बसले होते.. ते प्रत्येक पेशंटचे आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तींचे Temperature आणि Oxygen Level व Pulse Rate चेक करत होते.. भावाला तिथे नेले.. अगोदरच्या काही लोकांना ते चेक करत होते.. भावाला जास्त वेळ उभे राहता येत नव्हते.. थोडं चालल्यानंतर लगेच दम लागायचा.. भावाने इशारा करून खुर्ची बसण्यासाठी मागितली.. त्याला एवढे अशक्त पूर्वी कोणत्याही आजारामध्ये मी कधीही पाहीले नव्हते..
सगळे चेक करून आम्ही आत जावू लागलो, तेवढ्यात गार्ड ने आम्हाला आडवलं.. ” सर, तुम्ही घातलेले मास्क चालणार नाहीत.. डाॅक्टर Allow करत नाहीत “, तो व्यक्ती आम्हाला सांगू लागला.. बाजूलाच असलेल्या मेडीकलकडे इशारा करून दाखवू लागला की ते मास्क चालतील.. आमच्याकडे असणारे मास्क त्याच्यापेक्षा कितीतरी सुरक्षित होते, मग तेच का..? ह्यावर मी Argue केला असता पण भावाची तब्येत बघून मी बोलणं टाळलं.. मी ते घेण्यासाठी गेलो.. Use and throw मास्क होता तो.. एका मास्कची किंमत १० रूपये.. एरव्ही २-३ रूपयाला मिळणारा मास्क आज १० रूपयात.. मागणी आणि पुरवठा याचा किंमतीवर परिणाम होतो हे मला माहित होते , परंतु परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांमुळे ही किंमतीवर परिणाम होतो हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळत होते.. अनेक सेवाभावी संस्थेनी गोरगरिबांसाठी हाताने लाखो मास्क बनवले, मग ते सुरक्षित नाहीत का..?
भावाला घेऊन आम्ही घरी निघालो.. त्याला उलटी आल्या सारखे वाटत होते.. घरी येताच त्याला पित्ताची उलटी झाली.. कोरोनाच्या काळात बऱ्याच ठिकाणी COVID रूग्णालय उभारण्यात आली होती.. सकाळ पर्यंत थांबायचा की आताच तिथे घेवून जायचं आम्ही विचार करत होतो.. तेवढ्यात मावशी आणि मावस भावाचा फोन आला.. त्यांनी ही COVID रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.. थोडं खाऊन आम्ही परत निघालो.. एका चांगल्या हाॅस्पीटल मध्ये भावाला आम्ही घेऊन गेलो.. गेटपाशी गाडी उभी केली.. तेथून चेकअप ठिकाण लांब होते.. भावाला चालताना दम लागत असल्याने व्हीलचेअर वर बसवून नेण्यात आले.. तिथे नेल्यावर डाॅक्टरांनी तपासून आॅक्सिजन लावले.. एरवी २०० ते ३०० रूपयाला मिळणारा आॅक्सिजन मास्क तिथे ही ५०० रूपयाला होता.. भावाची आॅक्सिजन लेवल कमी झाली होती.. आॅक्सिजन लावल्यानंतर त्याला जरा बरं वाटू लागले..
Amount ऐकून जरा धक्काच बसला.. कोरोना ऐवढा Dangerous आहे की हाॅस्पीटलमध्ये फक्त अॅडमिट करण्यासाठी चक्क १ लाख रूपये लागतात.. मी विचार करत करत गाडी जवळ येत होतो.. तेवढ्यात वहिनीचा फोन आला.. एका हाॅस्पीटलमध्ये आॅक्सिजन बेडची सोय झाली आहे.. अर्थात ओळख निघाली म्हणून .. मी लगेच गाडीत बसलो.. वहिनीला सांगितला की आॅक्सिजन मास्क ५-१० मिनिटे काढून ठेवल्यावर कसं वाटतं बघा.. मी आलोच.. गाडी चालू केली.. हाॅस्पीटलच्या दिशेने निघालो.. मनात विचार येवू लागले.. जर बेड हे असे ओळखीवरच मिळत असतील तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल.. त्यांची अशी ओळख निघेलच असं नाही, मग त्याने काय करावं..? विचार करता करता मी कधी हाॅस्पीटलला पोहचलो समजलंच नाही..