बरमा.. हे कुण्या ठिकाणाचं नाव नाही , तर हे नाव आहे माझ्या जीवलग मित्राचं… जगात अस्तित्वात असलेल्या कोणत्याही ब्राऊझरमध्ये सर्च केला ना तरी फक्त हाच येणार एवढा युनिक नाव… आणि माणूस ही तेवढाच युनिक…
सर्व साधारण मुलांचा गणितात ३६ चा अाकडा असतो याचा मात्र ६३ चा आकडा असायचा कारण ३६ मध्ये ६ कोणत्या बाजूला लिहायचे यात पण तो Confuse असायचा..एवढा हुशार…. लोकं गणिताचे सुत्र पाठ करतात हा मात्र अख्खच्या अख्खं गणितच…
गणितात जरी याचे तीन-तेरा वाजले असले तरी इतर विषयात मात्र हा हुशार होता…जेव्हा याची ग्राऊंडची प्रॅक्टिस मी बघितली तेव्हा मी थक्कच झालो कारण याचा धावण्याचा वेग हा माझ्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त होता…
अशा या पठ्ठयाला पोलीस व्हायचं होतं त्याचसाठी तो मुंबईत आला होता.. मी जेव्हा याला भेटलो तेव्हा याने Already चार वेळा पोलीस भरती दिली होती .. चौथ्या परिक्षेचा निकाल अजून यायचा होता.. हि परिक्षा मी हि दिली होती..मात्र ग्राऊंडची प्रॅक्टीस न करता..ज्या वेळस मी ग्राऊंडच्या परीक्षेला गेलो त्याच वेळी पहिल्यांदा गोळ्याचं वजन किती असतं ते समजलं मला..आमची भेट ही एका लायब्ररीत झाली जिथे हा अभ्यास करायला यायचा… माझ्या एका मित्राबरोबर याने पोलीस अकॅडमीचा क्लास पूर्ण केला होता त्याच्याच मार्फत माझी याच्याशी ओळख झाली…
निकालाचा दिवस उजाडला.. त्या दिवशी आम्ही सगळे लायब्ररीत आलो होतो, निकालाची खबर मिळताच सगळे जण सायबर कॅफे मध्ये गेलो..आम्हाला आमचे मार्कस् माहीत होते, फक्त मेरीट लिस्ट मधे आमचं नाव आहे की नाही तेवढचं बघायचं होतं.. बरमाचे मार्कस् हे माझ्या पेक्षा जास्त होते..
त्याला मिळालेले मार्कस् बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटत होते की हा नक्कीच सिलेक्ट होणार.. मी निकालाची लिंक ओपन केली, मेरीट लिस्ट मध्ये माझं नाव सर्च केलं.. माझं नाव येतच नव्हतं, मी पुन्हा पुन्हा लिस्ट चेक केली पण त्या लिस्टमध्ये माझं नाव कुठच नव्हतं.. मी सिलेक्ट झालो नव्हतो .. खुप दु:ख झालं… फक्त मलाच… कारण बाकीच्यांना माझ्या निकालात काहीच इंटरेस्ट नव्हता… त्यांना फक्त बरमाचाच निकाल बघायची घाई झाली होती…. परत एकदा लिस्ट ओपन केली, बरमाचं नाव सर्च करू लागलो… त्याचा सुद्धा नाव सर्च होत नव्हतं …आता मात्र आम्ही सगळे जण घाबरलो, त्याचा नाव लिस्टमध्ये नाही याच्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता… तो ही सिलेक्ट झाला नव्हता.. फक्त २ मार्कस् ने तो गेला होता.. याला एकमेव कारण होतं ते म्हणजे त्याचं गणित …
आमचा निकालाचा दिवस दु:खातच गेला.. एकदा का तुम्ही सिलेक्ट झाला नाहीत तर तुम्ही परत शुन्यावर येऊन पोहोचता..परत अभ्यास, परत परीक्षा, परत ग्राऊंड प्रॅक्टीस.. सगळंच काही परत परत.. ज्याचं काळीज वाघाचं आहे ना त्यांनीच स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार करावा..कारण स्पर्धा परीक्षाच्या या प्रवासात तुमच्यावर क्षणाक्षणाला घाव होत असतात.. ते सोसण्याची हिम्मत जर तुमच्यात असेल तर तुम्हाला यश मिळवण्या पासून कोणीही रोखू शकत नाही.. स्पर्धा परीक्षा देणाऱ्याला कासवाच्या वेगाने पळून चालत नाही, त्याला सशाच्याच वेगाने पळावे लागते आणि ते ही शेवट पर्यंत…
एकाच वेळी लाखों विद्यार्थी परीक्षेला बसत असतात आणि जागा असतात फक्त हजाराच्या आसपास.. म्हणजे ९९ हजार विद्यार्थ्यांना मागे टाकून तुम्हाला पुढे जावं लागतं.. स्पर्धा परीक्षेमध्ये एका गुणाने आपण हजारो विद्यार्थ्यांना मागे टाकत असतो, परंतु तोच एक गुण मिळवण्यासाठी हजार वेळा प्रॅक्टीस करावी लागते हे मात्र विसरता कामा नये…
सर्व साधारण मुले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या मागे लागतात.. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखादी नोकरी किंवा व्यवसाय करून कुटुंबाला हातभार लावावा अशी प्रत्येक आई-वडीलांची अपेक्षा असते.. त्याच्यातच तुम्ही असा निर्णय घेत असाल तर तशी मानसिकता ही असली पाहिजे आणि चिकाटी सुद्धा…
दुसऱ्या दिवसापासून आम्ही नियमित अभ्यासाला लायब्ररीत जाऊ लागलो..आमचा तेथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या ५-६ मुलांचा Group तयार झाला होता..लायब्ररीची वेळ ही सकाळी ९ ते १२ आणि संध्याकाळी ५ ते ९ असायची.. सकाळी लायब्ररीची वेळ संपली की आम्ही सर्व जण अर्धा तास गप्पा गोष्टी करत असत.. तेव्हा मी बरमाला सहज विचारलं तुझं नाव बरमा कसं काय पडलं.. त्याने सर्व हकीकत सांगितली.. त्याच्या आईला त्याचं नाव उमेश ठेवायचं होतं, परंतु आजीला मात्र ब्रह्मा.. कारण त्यांच्या गावात एक ब्रह्म देवाचं मंदिर होतं.. हा जेव्हा आजी बरोबर शाळेत Admission घ्यायला गेला तेव्हा आजीने नाव सांगण्यात घोळ केला की शिक्षकाने ऐकण्यात ..माहीत नाही.. परंतु नाव मात्र बरमा च राहीलं.. आणि ते ही आजतागायत…
नेमाने आम्ही लायब्ररीत जात असत.. मन लावून अभ्यास करत असत.. शुक्रवारी मात्र लायब्ररी बंद असायची.. आम्ही पण ठरवलं , आपण पण शुक्रवारी अभ्यास नाही करायचा तर फक्त Enjoy करायचा.. या दिवशी आम्ही मनात येईल तिकडे जात असत.. कधी फिरायला, कधी पोहायला, कधी खेळायला तर कधी पार्टी ला.. आम्ही एका ठिकाणी क्रिकेट खेळायला जात असत.. तिथे अगोदरच काही मुले खेळायला येत असायची.. आम्ही ५-६ जण असल्याने आमची एक टीम आणि त्या मुलांची एक टीम अशी पाच ओवरची मॅच होत असे.. ती मुले रोज खेळायला येत असल्याकारणाने बऱ्यापैकी खेळत असे.. आम्ही मात्र त्यांच्या पेक्षा कमीच होतो.. तरी ही आम्हीच जिंकत असत.. या मागे आमची एक रणनीती होती.. एखाद्या प्रतिस्पर्ध्याला हरवायचा असेल ना तर त्यासाठी आपल्याकडे तसं Skill असलं पाहिजे नाहीतर त्याला घायाळ करण्याची क्षमता…
आमच्याकडं तसं Skill नव्हतं.. मात्र त्यांना घायाळ करण्याची क्षमता तेवढी होती..आमची रणनीती अशी असायची की जो कोणी बॅटींगला जाईल ना त्याने डायरेक्ट Sixer चं मारायचा.. भले ही तो एका बाॅल मध्ये का आऊट होईना पण Sixer मारायचाच प्रयत्न करायचा.. बरमा जेव्हा बॅटींगला जात असे तेव्हा बॅट एवढ्या जोरात फिरवायचा कि बॅटच्या हवेच्या आवाजाने किपर मात्र घाबरायचा.. त्याला खेळता येत होतं की काय कुणास ठाऊक पण बाॅल ही नेमका त्याच्या बॅटच्या टप्प्यातच येत असे.. बाॅल बॅटला लागला की तो हद्दपारच .. बाॅलर जरा भीतभीतच बाॅल टाकायचा आणि हा मात्र त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा.. हद्दपार झालेला बाॅल एवढा लांब जायचा की फिल्डर पण आणता-आणता थकायचा..त्यांची अवस्था पार बिकट होत असे..
एके दिवशी सकाळी लायब्ररीची वेळ संपल्यानंतर मी त्याला कुतूहलाने विचारले.. ” तु एवढे चार वर्षे पोलीस भरती देतो, तुला कधी वाटलं नाही का की बस्स झालं आता .. कुठंतरी नोकरी शोधावी “.. तो फक्त एवढंच म्हणाला, ” जिऊँ तो खाकी के साथ… मरू तो तिरंगे के साथ …” त्याला आणखी काही बोलायची गरजच नव्हती.. मी समजून गेलो.. आपले ध्येय गाठण्यासाठी कोणी एवढे वर्षे कसं काय प्रयत्न करू शकतो.. मला त्याचा अभिमान वाटू लागला.. ‘ संघर्ष ‘ फक्त शब्द वाचला होता.. आज मात्र त्याचा अर्थ समजवणारा माणूस पण बघितला…
हुशार तर तो होताच हे मला काही दिवस त्याच्या बरोबर राहून समजलं होतंच.. शिवाय ग्राऊंड प्रॅक्टीस ही लाजवाब होती.. न राहून शेवटी त्याला मी विचारलचं , ” तु सगळ्या गोष्टीत तर Perfect आहेस , मग नेमका Problem कुठं येतो “..त्याने गणित जमत नसल्याची कबूली दिली.. ” मग तु पेपर मध्ये कसं काय सोडवायचा ” , मी विचारलं.. ” सोडवतो कसला, अंदाजेच उत्तरे लिहतो “.. त्याने उत्तर दिले.. धन्य हो..! मी मनात पुटपुटलो… त्याचा जसा गणित Weak होता तसाच माझा ग्राऊंड..
माझा गणित जरा बऱ्यापैकी होता.. ठरलं ..तर मी याला गणित शिकवेन.. हा मला ग्राऊंड.. मी विचार केला आणि क्षणाचा ही विलंब न करता त्याला बोलून ही दाखवलं.. तो ही एका पायावर तयार झाला… मग प्रश्न आला कधी व कुठं.. लायब्ररीत शिकवू शकत नव्हतो, कारण इतर मुलांना त्रास झाला असता.. घरी तर सगळेच असतात मग अशाने अभ्यास होईल की नाही सांगता येत नाही.. लायब्ररीच्या थोड्या अंतरावर एक गार्डन होतं.. दुपारच्या वेळेत तिथे कोणच नसायचं.. तिथ जावून गणित शिकवायला काहीच अडथळा नव्हता.. आता प्रश्न माझ्या ग्राऊंडचा.. आमच्या घराजवळ अस कोणतही मैदान नव्हतं जिथं आम्ही प्रॅक्टीस करू शकू.. आता काय करायचे..? विचार केला की या मैदानावर फक्त Running आणि गोळा फेक करायचं.. Long Jump साठी ६-७ किलोमीटर अंतरावर असलेल्या मैदानावर जायचं..आठवड्यातून दोनदा आम्ही तिकडे जात असत..
Long Jump साठी ६-७ किलोमीटर जावून परत लायब्ररीत येवून अभ्यास करणे आमच्यासाठी वेळ खावू होता.. मग आता.. ज्या मैदानावर आम्ही प्रॅक्टीस करायला जात असत तिथे एकदा खूप मोठा धार्मिक कार्यक्रम होता.. त्या कार्यक्रमात एक ५-६ मीटर लांबीची दानपेटी होती.. जमीनीवरच खड्डा करून ती ठेवली होती.. ज्या वेळेस कार्यक्रम संपला तेव्हा तो खड्डा न बुजवता तसाच ठेवला होता.. आम्ही विचार केला की या खड्यात जर पुळण माती आणून टाकली तर.. Long Jump चा Track इथेच तयार होईल.. मग ६-७ किलोमीटर जाण्याची आवश्यकताच लागणार नाही.. माझं गाव हे आम्ही राहत असलेल्या ठिकाणपासून जवळच होतं..मी माझ्या मित्रांना फोन केला की आम्हाला पुळण माती पाहीजे.. ते बोलले कधी पण ये आपल्या नदीत खूप आहे.. आम्ही एक टेम्पो घेऊन गेलो आणि माती घेऊन आलो.. मस्तपैकी Long Jump Track बनवला.. आता आमचा ग्राऊंडचा प्रश्न मिटला होता…
सगळ्या गोष्टींची पूर्तता झाली होती.. आता फक्त वेळेचे नियोजन करायचं होतं.. दोघांच्या संमतीने असे ठरले की सकाळी ६ ते ८ ग्राऊंड प्रॅक्टीस , ९ ते १२ लायब्ररीत जावून वाचन , ३ ते ५ गार्डन मध्ये गणित शिकवणे आणि परत ५ ते ९ लायब्ररीत जावून वाचन.. संपूर्ण दिवसाचा Schedule तयार केला..आम्ही आमच्या अगोदरच्या अभ्यासाच्या वेळेत काहीच बदल केला नाही तर ग्राऊंड व गणित या साठी Timepass वेळेतून २-२ तास कपात केली..शुक्रवार तर होताच आम्हाला Enjoy करायला , त्यामुळे काही Problem नव्हता..ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये प्रखर ईच्छाशक्ती असावी लागते आणि तुमच्या कुटुंबाचा मजबूत पाठींबा..आमच्या कडे या दोन्ही ही गोष्टी होत्या..
पोलीस भरतीची परीक्षा यायला अजून ८-९ महिने तरी असतील .. आम्ही त्या अनुषंगाने आतापासूनच सुरवात केली.. सकाळी उठायचं , फ्रेश व्हायचं आणि मैदानावर जायचं.. बरमा माझ्या अगोदरच तिथे आलेला असायचा.. त्याने मला ग्राऊंड शिकवायला सुरूवात केली.. रनिंग करायच्या अगोदर Warm Up कसं करायचं , Long Running करताना सुरूवातीला एकदम स्पीड न घेता अगोदर हळूहळू पळायचं , कारण सुरूवाती पासूनच स्पीड पकडला तर लवकर दम लागतो.. ह्रदयाच्या ठोक्या बरोबरच स्पीड मध्ये Pick Up घ्यायचा.. शक्यतो तोंड बंद करूनच पळायची सवय ठेवायची.. तोंड उघडं ठेवलं तर लवकर दम लागतो.. पुर्ण रनिंग झाली की लगेच खाली न बसता थोडी Walking करायची आणि लगेच पाणी न पिता शरीर जरा थंड होऊ द्यायचं.. अशा अनेक टीप्स त्याने दिल्या..
गोळा फेकताना कसा पकडायचा आणि कसा फेकायचा हे सांगताना बोलायचा की गोळा फेकताना त्याला सरळ न फेकता हलकासा हवेत उंचावरून फेकायचा प्रयत्न करायचा..जेणेकरून तो खाली पडताना जास्त अंतरावर पडेल.. हे समजवताना उदाहरण द्यायचा की महाभारतात युद्ध चालू असताना कोणताही धनुर्धारी बाण सरळ न सोडता हवेतून सोडायचा जेणे करून बाण लांब गेला पाहिजे.. तशाच टीप्स Long Jump च्या पण असायच्या.. १०० मीटर स्प्रिंट मारताना पूर्ण पाय जमिनीवर न टेकता पायाच्या पंजांवर पळायचं आणि पाय हे लांब – लांब टाकायचे.. अशा सगळ्या टीप्सने माझ्या ग्राऊंड मध्ये Improvement होत होती…
ग्राऊंड करताना मी पूर्णपणे थकून जात असे.. पण तो मला Boost Up करायचा.. त्याच्या शब्दात जादू होती..कितीही थकलो असलो तरी त्याच्या Boost Up ने मला जोश यायचा आणि परत मी प्रॅक्टिस करायला सुरुवात करायचो.. ग्राऊंड झाला की घरी येऊन फ्रेश होवून नाष्टा करून ९ वाजता आम्ही लायब्ररीत हजर.. १२ वाजता लायब्ररी बंद झाली की अर्धा तास चर्चा फिक्स..
परत जेवण करून ३ वाजता गार्डन मध्ये त्याला गणित शिकवायला यावं लागतं असे..सकाळी ग्राऊंड केल्यामुळे दुपारी आपसूकच झोप येत असे , मग मी अलार्म लावून १५ मिनिटांचा Power Nap घेतल्यानंतरच ३ वाजेपर्यंत गार्डन मध्ये पोहचत असे..इथं ही तो माझ्या अगोदरच आलेला असायचा..जेव्हा मी त्याला गणित शिकवायला सुरूवात केली तेव्हा त्याचं गणिताच ज्ञान बघून कधी कधी मलाच वाटायचं की मी याला गणित शिकवू शकेन का..? त्याला गणित शिकवताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गणित विषयाच्या नाण्याला दोन बाजू आहेत.. एक आवड तर दुसरी भीती..
हे नाणं हत्तीच्या छोट्याशा पिल्लासारखं आहे.. लहान असताना त्याच्या पायात एखादी चैन बांधली तर तो तोडण्याचा प्रयत्न करतो.. परंतु ती तुटत नाही.. ते पिल्लू मग कितीही मोठं झालं तरी त्याच्या मनात एकच गोष्ट असते ती म्हणजे ही चैन मला तुटणार नाही.. तसचं गणिताचं आहे.. एकदा का तुमच्या मनात त्याची भीती निर्माण झाली ना की ती तशीच राहते.. वास्तविक पाहता हत्तीला ज्या प्रमाणे आपल्या ताकदीचा विसर पडलेला असतो त्याच प्रमाणे गणिताची भीती बाळगणाऱ्या व्यक्तीला ही पडलेला असतो.. आपण हे करूच शकत नाही अशी त्याच्या मनात भावना निर्माण झालेली असते.. बरमा त्यापैकीच एक होता..
याला गणित शिकवण्याची सुरूवातच बेरीज-वजाबाकीने करावी लागली.. याची Grasping Power मात्र कमालीची होती.. शिकवलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या बरोबर लक्षात राहत असे.. बहुधा याने लहानपणी गणित विषयाकडे दुर्लक्ष केलं असावं असं मला वाटू लागलं..एक-दोन आठवड्यातच त्याने बऱ्यापैकी कव्हर केलं होतं.. एखादा गणित समजावयाचं , त्याचं सुत्र पाठ करून घ्यायचं , त्याच्या कडून तशाच प्रकारची ३-४ उदाहरणे सोडवून घ्यायची आणि मग प्रश्न पत्रिकेतील त्याच प्रकारचं गणित सोडवून घ्यायचं.. अशी शिकवण्याची पद्धत असायची.. ज्या वेळेस प्रश्न पत्रिकेतील गणित हा बरोबर सोडवत असे तेव्हा तो कमालीचा खूष होत असे.. पूर्वी याच गणितांचा तो अंदाजे उत्तर लिहत असे..
४-५ महिन्यात आमचा अभ्यास आणि ग्राऊंडची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झाली होती.. आम्ही आता परीक्षेचीच वाट बघत होतो.. परीक्षेत बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो.. कारण त्यांनी प्रश्न पत्रिका सोडवण्याची प्रॅक्टिस कधीच केलेली नसते.. कोणता प्रश्न कधी सोडवायचा, कोणत्या प्रश्नाला किती वेळ लागतो याचे कसलेच नियोजन नसते.. आम्हाला ही गोष्ट माहिती होती.. परंतु सराव करण्यासाठी आमच्याकडे प्रश्न पत्रिकाच नव्हती कारण आतापर्यंतच्या सर्व प्रश्न पत्रिका उत्तरासहीत आमच्या पाठच होत्या.. मग आता करायचं काय..? मी विचार केला की जर आपण स्वतःच प्रश्न पत्रिका काढल्या तर..
आमचा ५-६ जणांचा Group होता.. प्रत्येक आठवड्याला त्यापैकी एकाने त्याला वाटणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रश्नांची प्रश्न पत्रिका काढायची.. परंतु ती काढताना कोणत्या विषयातील किती प्रश्न घ्यायचे याचा निर्णय मात्र सर्वानुमते घेण्यात आला.. प्रत्येक जण प्रश्न पत्रिका काढत असे.. आम्ही फक्त परीक्षा देणारे विद्यार्थी होतो.. आता मात्र आम्ही सगळे प्रश्न पत्रिका काढणारे झालो होतो.. हा सराव नक्की करायचा कुठं हा पण एक प्रश्नच होता..पण त्याचे उत्तर ही आमच्याकडे होतं.. आमच्याच ग्रुप मधील एक जण लायब्ररीत काम करायचा..लायब्ररीची चावी त्याच्याच कडे असायची.. शुक्रवारी लायब्ररी बंद असल्यावर आम्हाला तिथं जावून प्रश्न पत्रिका सोडवण्याचा सराव करणे शक्य होतं..पण कोणालाही सूचना न देता शुक्रवारी लायब्ररीत जाणं आम्हाला योग्य वाटलं नाही..आम्ही लायब्ररीच्या मॅडम ला Request केली ..त्या आम्हाला बऱ्याच महिन्यापासून बघत होत्या.. नियमित अभ्यासाला येणारा आमचाच ग्रूप होता.. मॅडमने क्षणाचा ही विलंब न करता आम्हाला Permission दिली..
प्रश्न पत्रिका काढणारा त्या दिवशी पर्यवेक्षक असे.. पेपर संपे पर्यंत तो आमच्यावर लक्ष ठेवत असे.. त्याने Answer Key पण बनवलेली असायची..पेपरची वेळ संपली की तो सगळ्यांचे पेपर जमा करायचा.. मग तो ते पेपर वेगवेगळ्या मुलाकडे दयायचा आणि उत्तर सांगायचा.. कोणाचा उत्तर चुकला असेल तर चेक करणारा सांगत असे..आता आम्ही पेपर Checker पण झालो होतो.. पेपर तपासून झाले की प्रत्येकाला भीती वाटायची.. कारण आमचा एक नियम होता.. ज्याला सर्वात कमी मार्कस् मिळतील तो सर्वांना वडापावची पार्टी देणार.. त्यामुळे आपल्याला सर्वात कमी मार्कस् पडू नये.. या प्रयत्नात प्रत्येक जण असायचा.. पण दुर्दैवाने कोणाच्या ना कोणाच्या नशीबी तो योग यायचाच…
दिवस भरभर जात होते.. परीक्षा जवळ येत होती.. अामचा अभ्यास , पेपर प्रॅक्टीस , ग्राऊंड प्रॅक्टीस आणि बरमाचा गणित सुद्धा बऱ्यापैकी झाला होता.. आता फक्त परीक्षेच्या वाटेवर नजरा लागलेल्या होत्या.. एके दिवशी भरतीची जाहिरात आली.. बरमाचा मात्र फिक्स होता कि तो मुंबईतच फाॅर्म भरणार.. इतर मित्रांनी देखील मुंबईतच फाॅर्म भरला.. मी मात्र नवी मुंबईत भरला..परीक्षेच्या तारखा Declare झाल्या.. पोलीस भरतीत सुरवातीला ग्राऊंडची परीक्षा असते मग लेखी परीक्षा आणि नंतर दोन्हीचे मार्कस् एकत्र करून मेरीट लिस्ट लागते..
बरमाने ग्राऊंडच्या परीक्षेत कमालच केली.. १०० पैकी तब्बल ९८ मार्कस् त्याने मिळवले.. लेखी परीक्षेत देखील बरमाचा बोलबाला राहीला ..त्याने त्यात ही १०० पैकी ८४ मार्कस् पाडले.. टोटल १८२ .. मागील १० वर्षे तरी मुंबईची मेरीट १८० च्या वर लागली नव्हती आणि या पठ्ठ्या ला मिळाले तब्बल १८२..’ अब दुनिया की कोई ताकद उसको पुलीस बनने से नहीं रोक सकती थी ..५ साल की उसकी मेहनत रंग लाने वाली थी ‘..आम्हाला पण चांगले मार्कस् मिळाले होते..
नवी मुंबईचा निकाल हा मुंबईच्या निकालाच्या अगोदर लागत असतो.. एके दिवशी बरमाचा मला फोन आला.. बोलला की ” नवी मुंबईचा निकाल लागला आहे.. पेढे घेऊन ये.. तु सिलेक्ट झाला आहेस “.. “काय..! खरचं “.. सुरूवातीला तर मला त्याच्या बोलण्यावर विश्वासच नव्हता पण त्याने माझा मेरीट लिस्ट मध्ये कितवा नंबर आहे आणि माझी इतर Details सांगितल्यावर तो खरा बोलत होता हे मला समजलं.. मी लगेच बाईक काढली आणि थेट त्याच्या घरी गेलो.. त्याला घेतलं आणि डायरेक्ट हेड क्वार्टर गाठलं.. तिथे मेरीट लिस्ट एका बोर्डावर लावलेली होती.. आम्ही चेक केली… Yes ..! मी पोलीस झालो होतो.. गगनात मावणार नाही एवढा आनंद झाला होता..या वेळेस फक्त मलाच नाही तर सगळ्यांनाच आनंद झाला होता.. शुभेच्छांचे फोनवर फोन येवू लागले होते.. वर्षेभर सातत्याने केलेल्या कष्टाचे चीज झाले होते..
आता बारी होती बरमाची.. त्याचा निकाल जरा उशीराच लागणार होता.. निकाल कधी लागेल याच विचाराने तो बैचेन होता.. नुसता निकालाच्या Website वर चेक करायचा.. जर सर्वे केला असता ना तर या Website ला सर्वात जास्त भेटी देणारा बरमाच असेल.. एके दिवशी आम्ही अशाच गप्पा गोष्टी करत एका गार्डन मध्ये बसलो होतो..त्याला त्याच्या भावाचा फोन आला.. बोलला की ” चल ,आपल्याला गावी जायचं आहे “.. याने विचारले, ” कशाला ? “.. भाऊ बोलला , ” तुला गावी मस्तपैकी एक द्राक्षांची बाग लावून देतो “.. भाऊ असा का बोलतो याला समजेना.. ” नाही दादा, मला पोलीसच बनायचं आहे .. माझं स्वप्न आहे खाकी वर्दी घालून तिरंग्याची सेवा करण्याची ” , बरमा भावाला सांगत होता.. ” तु येणार आहेस की नाही “, भाऊ जरा रागातच बोलला.. ” दादा, एवढा निकाल तर लागू दे ना.. मग पुढचा विचार करता येवू शकतो “, बरमा भावाला विनवणी करत होता.. ” निकाल लागला आहे , तु परत सिलेक्ट नाही झालास ” , भावाने समोरून उत्तर दिले आणि फोन कट केला..
बरमाच्या पाया खालची जमीन एकदमच सरकून गेली.. कंठ दाटून आला..डोळ्यातून टपटप अश्रु पडू लागले.. या वेळी नक्की सिलेक्ट होणार असा त्याला आत्मविश्वास होता..परंतु त्याच्या नशीबी निराशाच आली होती..त्याची पाच वर्षांची मेहनत वाया गेली होती.. आम्ही त्याला सांत्वन देवू लागलो.. अशा परिस्थितीत काय करावं आम्हाला पण सुचत नव्हतं.. तेवढ्यात परत भावाचा फोन आला.. बरमा ने फोन उचलला.. ” काय करतोस , घरी ये ” , भाऊ बोलला .. ” हो , येतो ” , जरा दबक्या आवाजातच बरमा बोलला.. ” आणि हाँ..एक काम कर येताना पेढे घेवून ये ” , भावाने सांगितले..
” पेढे..!” , बरमा जरा गोंधळून गेला.. ” हो.. हो.. पेढे “, आणि जोराने हसू लागला.. ” तु सिलेक्ट झाला आहेस “.. बरमाच्या डोळ्यातून परत अश्रू वाहू लागले पण या वेळी मात्र सुखाचे..
भावाने अगोदर त्याची मस्करी केली होती.. आम्ही सगळे जण आनंदाने नाचू लागलो.. गार्डन मधून थेट सायबर मध्ये गेलो.. नाव सर्च केलं.. ” SELECTED ..!” बरमा पोलीस झाला होता..
आज बरमा मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे.. QUICK RESPONSE TEAM ( QRT ) या दहशतवादी विरोधी पथकामध्ये सेवा करत असून मुंबईला आणि परिणामी देशाला आतंकवादी हल्ल्यांपासून वाचवण्याचे काम तो करत आहे..