डोंगर नवरा-नवरीचा…
– एक थरार
माझे एक सुत्र आहे… आयुष्यात पुढे गेल्यावर मागे वळून बघितला ना , तर कधी पश्चात्ताप नाही झाला पाहिजे की मी ही ही गोष्ट केली नाही… आपल्या इच्छा-आकांक्षा या योग्य वयातच पूर्ण केल्या पाहिजेत.. कारण त्या पुर्ण करण्यासाठी जरी तुमचं मन तरूण राहीलं ना तरी शरीर साथ देईल की नाही हे मात्र सांगता येणार नाही.. त्याचपैकी एक म्हणजे डोंगर प्रवास…
आज निवड केलेल्या डोंगराच नाव ऐकून जरा तुम्हाला हसू येईलच परंतु खरचं हे एका डोंगराचं नाव आहे..
” डोंगर नवरा-नवरीचा ” … या डोंगराला अस नाव का बरं पडलं असावं..? असा जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला न सांगता मी पुढं कसं बरं जाणार..
या डोंगराच्या सर्वोच्च ठिकाणी दोन भले मोठे सुळके आहेत आणि बरोबर दोन्ही सुळक्यांच्या मधोमध एक छोटासा सुळका आहे.. याचा आकार हा हुबेहूब गणपतीच्या मूर्ती सारखा दिसतो.. बघणाऱ्याला अस वाटतं की जणू काही नवरा आणि नवरीच्या मध्यभागी गणपतीची मूर्तीच ठेवली आहे.. शिवाय या डोंगराच्या रांगेत १०-१२ असे छोटे- मोठे सुळके आहेत, ते बघून असं वाटतं की नवरा-नवरीची वरात निघाली आहे आणि पाठीमागून वऱ्हाडी येत आहेत…
अशा या सुंदर डोंगरावर चढण्याची सुरवात आम्ही चौघांनी भल्याचीवाडी या आदिवासी वाडीतून केली..या डोंगराकडे बघूनच वाटेल की हा चढायला किती खतरनाक असेल .. आम्हाला हे अगोदरच माहीत होते म्हणून तर आम्ही आज ३०-४० मिटर लांबीची रस्सी आणि Harness घेऊन आलो होतो.. वाटेत असणारी झाडं-झुडप साफ करण्यासाठी मी हातात एक कोयता पण बरोबर घेतला होता…
आज पाऊस येण्याची शक्यता वाटत होती परंतु आमचा पावसात भिजण्याचा फूल मुड होता त्यामुळे रेनकोट कोणीच घेतला नाही… आम्ही डोंगरावर चढण्याची सुरवात करतो ना करतो तोच सोसाट्याच्या
वाऱ्यासह पाऊस आला.. आम्ही पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला, परंतु ह्या पावसामुळे आमचा प्रवास मात्र धोकादायक झाला हे आम्हांला नंतर समजलं जेव्हा आमचे पाय सरकू लागले…
आम्ही प्रत्येक प्रवासाला जाताना बरोबर जेवण नेत असतो , आज मात्र एकदम झकास आयटम होता- चिकन बिर्याणी… शिवाय पाण्याच्या बाटल्या आणि इतर नाष्ट्याच्या आयटमने बॅगा भरगच्च भरलेल्या होत्या..अशा या जड बॅगा पाठीवर घेऊन वर चढणे खूपच अवघड होते.. एका अवघड ठिकाणी आम्हाला वर चढण्याची खूपच भीती वाटू लागली कारण सरकलो तर पकडायला कसलाच आधार नव्हता..
आता मात्र आम्हाला रस्सीची आवश्यकता वाटू लागली.. मी Harness काढून कमरेला बांधला आणि त्यात रस्सी अडकवली .. मित्रांना खाली रस्सी पकडून ठेवायला सांगितली.. मी हळूहळू वर चढू लागलो आजूबाजूला बघायची हिम्मतच नव्हती कारण खाली खोल दरी बघून आपोआपच नजर भिरकत असे आणि डोके गरगरल्या सारखे वाटत असे एवढा तीव्र उतार… या ठिकाणा वरून जर मी पडलो असतो तर ५०-६० मीटर खाली नक्कीच गेलो असतो व ते ही हुसेन बोल्ट पेक्षा जास्त वेगाने.. अर्थात मित्रांनी व्यवस्थित पकडून ठेवलं तरच नाही तर ८०० मीटरचा प्रवास मात्र पक्का आणि तो ही फूटबॉल सारखा…
एक मित्र मधेच बोलला की अगोदर बिर्याणी खावून घ्यायची का…? म्हणजे पडलो तरी बिर्याणी खावून पडेन .. म्हणजे वाया ही जायला नको आणि मरता-मरता बिर्याणी खाल्याचा तेवढा समाधान…
याला काय बोलायचं… इथं जीव मुठीत घेऊन चढत आहोत आणि याला जोक सुचतात…
सुदैवाने मी सुरक्षित वर पोहचलो, थोडा श्वास घेतला , रस्सी एका छोट्याशा झाडाला बांधली आणि जोश मध्येच मित्रांना म्हणालो , ” बैठ निचे , बढ आगे “… मित्र रस्सीला पकडून हळूहळू वर आले.. असे तीन-चार ठिकाणी आम्हाला अडथळे आले , कधी मी पुढे जायचो तर कधी मित्र…
आज कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार होते , तब्बल ३८ वर्षांनी हा योग पाहायला मिळणार असे खगोल अभ्यासक म्हणत होते…जवळपास साडेतीन तास चालणारे हे सूर्यग्रहण बघण्यासाठी आम्ही Telescope पण बरोबर घेतला होता , परंतु डोंगरातील भयानक अडथळे पार करताना आम्हाला याचे भान सुद्धा राहीले नव्हते… आमचा सुर्य ग्रहण बघण्याचा योग मात्र हुकला… आणलेल्या Telescope ने डोंगर-दऱ्या तेवढ्याच बघता आल्या…
वर गेल्यावर घनदाट असा झाडाझुडपांचा भाग होता.. या ठिकाणी रस्ता कुठून जातो हे दिसत नव्हते..या भागात बरेचसे मुंग्यांचे वारूळ दिसत होते ..नक्की मुंग्यांचे होते की सापांचे माहित नाही , परंतु एक मित्र बोलला की मुंग्या फक्त एकच सीजन वारुळात राहतात नंतर त्याच्यात साप येवून राहतात…हा नक्की डिस्कव्हरी चॅनेल बघत असेल असे समजून आम्ही जरा दुरूनच जावू लागलो…
आम्ही सरळ वर-वर जात राहिलो … हे काय..? चढायला रस्ताच नाही.. असा रस्ता चढायला आम्ही काही घोरपडीची औलाद नव्हतो… मी जरा वर जाऊन कुठून रस्ता आहे का बघीतलं पण कुठून ही रस्ता दिसत नव्हता… सत्यानाश… परत मागे जावून रस्ता शोधावा लागणार होता, पण आम्ही सगळे अति शाहणे असल्याकारणाने कडेकडेने जावून एका टोकापासून वर चढू असा एकमताने निर्णय घेतला… या निवडलेल्या रस्ताने आमची पार दमछाक झाली.. शेवटी आम्ही डोंगराच्या त्या कड्यावर पोहचलोच.. मी सगळ्यात अगोदर पोहचलो आणि आनंदाने आेरडू लागलो…मित्र ही पोहचले.. वर चढल्याचा समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते…
आम्ही सर्व आनंदाने नाचू लागलो.. पण पाय न उचलता.. कारण आम्ही एका कड्यावर होतो ना की सपाटीवर… इथून जर खाली पडलो असतो तर आयुष्यात ना नाचण्याजोगे राहिलो असतो ना बसण्याजोगे… या ठिकाणावरून मुख्य कडा हा हाकेच्या अंतरावर नजरेसमोर होता , पण जाणारा रस्ता हा अतिशय अरूंद होता… या रस्त्याने पुढे जाणे खूपच धोकादायक होते.. आम्ही Quit करायचे ठरवले कारण जगलो तर दुसऱ्या मार्गाने ही तिथं कधीतरी जाता येईल… म्हणून Risk नको…
आणलेल्या बिर्याणीवर ताव मारण्याची आम्ही वाटच बघत होतो.. बाजूलाच असलेल्या केळीचं पान घेतलं , बिर्याणी घेतली आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवणाचा आनंद घेतला.. पाऊस रिमझिम पडतच होता.. धुक्याने आजूबाजूचा संपूर्ण परिसर दिसेनासा झाला होता… आम्ही मात्र पाऊस जाण्याची वाट बघत होतो… बऱ्याच वेळाने पाऊस पडायचा बंद झाला.. हळूहळू धुके जावू लागले… डोंगराच्या कड्याकपारीत शिरलेले , वर येणारे धुके बघताना आम्ही स्वर्गात असल्याचा भास होत होता… असे दृश्य मी फक्त TV मध्येच बघीतले होते ..आज मात्र ‘ याच देहीं याच डोळा ‘ बघीतले …
जेव्हा धुके निघून गेले तेव्हा चारी बाजूंची दृश्य बघून डोळ्याची पारणे फिटली… एका बाजूला पनवेल तालुक्याची निसर्गरम्य अशी हिरवळ तर दुसऱ्या बाजूला बदलापूरचा नयनरम्य असा देखावा… एकीकडे खाेल भयानक दरी तर दुसरीकडे ऊंच काळाभोर कडा…जवळपास अर्धा तास या निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो… अालेल्या मार्गानेच परत जायचं का दुसरा कोणतातरी मार्ग शोधायचा , याचा विचार करत असताना आम्ही एक-दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत होतो.. सगळ्याच्या चेहऱ्या कडे बघून आपोआप समजले की नवीन मार्गच शोधावा…
आम्ही दुसरा मार्ग शोधण्यासाठी दरीच्या दिशेने पुढे जावू लागलो.. झाडी-झुडपातून रस्ता शोधत होतो.. या ठिकाणाची माती ही अतिशय चिकट होती.. पाय सरकत होते , आम्ही तोल सांभाळत होतो.. तशी झाडी घनदाट असल्याने ऐवढी भीती नव्हती.. एका ठिकाणी मित्राचा पाय घसरलाच आणि तो दनकन आपटला… आम्ही त्याच्याकडे बघून हसू लागलो.. तेवढ्यात तो म्हणाला , ” ये तो मेरे बैठने की स्टाईल हैं ” आम्ही जोरजोराने हसू लागलो… पुढे जाऊन आम्हाला एक पायवाट दिसली, आम्ही सर्वजण खूष झालो… त्या वाटेने आम्ही मज्जा करत करत चाललो होतो.. पण थोडयाच वेळात आमचे सगळ्यांचेच बारा वाजले.. कारण आम्ही त्याच रस्त्याने परत आलो होतो ..हासणारा चेहरा क्षणात फिका पडला..जाताना इथूनच आम्ही रस्ता चुकलो होतो…
आता मात्र आम्हाला परत एकदा जीव पणाला लावून उतरावे लागणार होते… छाती धडधडू लागली.. Harness लावला, रस्सी बांधली, डोळे मिटले, श्वास टाकला आणि सुरू केला परत चित्तथरारक असा प्रवास… एकाने खाली जायचं , तिघांनी रस्सी पकडायची, पहिला ३०-४० मीटर खाली गेला की मग दोघांनी रस्सीला पकडून हळूहळू उतरायचं आणि नंतर चौथ्यानी मात्र राम भरोसे यायचं… असा आमचा प्लान…
असे करत असताना मधेच एक मित्र बोलला, ” माणूस जेव्हा मरायला येतो ना, तेव्हा त्याला शेवटचे सात मिनिटे आयुष्यात जे काही केलं ना ते सर्व आठवायला लागतं…म्हणजे त्यांनी समजावं की आपलं मरण जवळ आलं आहे ” … तेवढात मी म्हणालो, ” असं जर कोणाला वाटत असेल ना तर त्यानी दोन मिनिटे अगोदर सांगा म्हणजे त्याला नीट रस्सीने बांधून ठेवता येईल “… अशा परिस्थितीत ही जोक सुचतात हे मात्र आम्ही पहिल्यांदाच अनुभवले…
शेवटी आम्हीच जिंकलो.. आम्ही सर्वजण सुखरूप खाली उतरलो… मातीने माखलेले कपडे सांगत होते की आम्हाला कसा प्रवास करावा लागला असेल… हे मात्र घरच्यांना कळू नये म्हणून कपडे नदीतच धुवून घेतले…
मी मात्र जाता जाता एकच विचार करत होतो की पावसाळ्यात असे अवघड डोंगर कधीही चढू नये कारण पावसाच्या धारा पेक्षा घामाच्या धारा कधीही चांगल्याचं…