करपलेला बाप …
– एक ह्रदयस्पर्शी कथा
मध्या.. वय जेमतेम ४० वर्षे.. शिक्षण कदाचित ३ री – ४ थी.. २-३ एकर जमीन आणि एक छोटंसं घर.. वयाच्या १७ व्या वर्षीच याच्या बापाने याच लग्नं सुंदरी नावाच्या मुलीशी लावून दिलं होतं.. आज तब्बल २२-२३ वर्षे झाली असतील त्याच्या लग्नाला.. याला एकुलता एक मुलगा होता.. यशवंत.. सगळे त्याला येशूच म्हणत.. १० वीत शिकत होता तो.. अतिशय हुशार.. वर्गात नेहमी पहिला यायचा.. आता १० वीचा वर्ष असल्याने तो ही कसोशीने अभ्यास करायचा.. गरीब मुलांना नेहमी परिस्थिती जगण्याचा मार्ग दाखवत असते .. भूक सगळे काही शिकवते..
मध्या त्याला काही ही कमी पडू देत नसे.. त्याच्या हुशारीवर मध्याचा विश्वास होता.. हा एके दिवशी नक्कीच मोठा माणूस होईल आणि आपल्या खानदानाचं नाव काढील असे त्याला मनोमन वाटायचे.. आणि येशू तसा होता ही.. एरवी येशू शेतात येवून मध्याला हातभार लावत ही होता, परंतु १० वीचा वर्ष असल्याने मध्याच त्याला शेतात येवू देत नव्हता.. ” तु फक्त अभ्यास कर , मी आहे ना हे सगळे करायला “, असे बोलायचा.. जरी तो जास्त शिकला नसला तरी शिक्षणाची जाणिव मात्र त्याला होती..
घरात तर लाईट नव्हतीच त्याच्या.. वीजेचे बील ही परवडणार नव्हते त्याला.. पण मुलाला रात्री अभ्यास करता यावा, म्हणून तालुक्याला जावून सौर ऊर्जेचा एक छोटासा संच घेऊन आला आणि येशू पुरता एक बल्ब तेवढा लावून घेतला.. त्या बल्बच्या उजेडावर येशू रात्री अभ्यास करायचा.. त्याला हवं ते सर्व तो त्याला पुरवायचा.. आपल्यासाठी बाप एवढं काही करतो हे बघून येशू चा उर दाटून यायचा.. आपण ही बापासाठी काही तरी करू हे त्याने मनात कोरून ठेवले होते..
जसजसे दिवस जावू लागले येशूची परीक्षा जवळ येवू लागली.. १० दिवस असतील परिक्षेला , येशूला अचानक ताप आला.. त्याच्या अंगावर लाल- लाल पुरळ येवू लागल्या.. डोके दु़खू लागले.. कधी कधी तर उलट्या पण होत असत.. अंगाला खाज सुटू लागली.. त्याच्या अंगाची लाहीलाही होवू लागली.. हळूहळू अंगावरील पुरळ मोठ्या होवू लागल्या.. त्यामध्ये पाणी भरल्यासारख्या त्या फुगत असत.. येशूला झोपताना ही खूप त्रास होत असे.. कधी कधी तर त्या पुरळ फुटून ही जात असत.. जेव्हा त्या फुटत तेव्हा येशूच्या अंगाची आग होत असे.. येशूला कांजिण्या आजार झाला होता.. १० वीच महत्त्वाचं वर्ष आणि त्यात हा आजार .. त्याला नकोसे वाटू लागले.. अंगाची होणारी जळजळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. मध्या त्याची जळजळ कमी व्हावी म्हणून शेजाऱ्याकडून बर्फ आणत असे व त्याच्या अंगाला लावत असे.. येशूला तात्पुरते बरे वाटत असे..
म्हणे हा आजार संसर्गजन्य आहे.. मध्याला ही या आजाराची लक्षणे जाणवू लागली.. काही दिवसाने त्याला ही कांजिण्या आजार झाला.. तरीही तो येशूची सेवा करतच राहीला.. १० वीच्या पहिल्या पेपरच्या दिवसापर्यंत येशूच्या अंगावर अशी जागा शिल्लक नव्हती जिथं पुरळ अाली नसेल.. अशा परिस्थितीत ही तो परीक्षेला जावू लागला.. त्याला त्याचं वर्ष फुकट घालवायचा नव्हतं.. मध्या त्याला सायकलीवरून परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी जात असे.. परीक्षा केंद्रात त्याच्या आजाराची लागण इतर मुलांना होवू नये म्हणून शिक्षकांनी त्याच्या बसण्याची व्यवस्था वेगळीच केली होती.. पेपर संपल्यानंतर त्याचा पेपर वेगळाच ठेवून पॅक केला जात असे..
पेपर संपेपर्यंत मध्या परीक्षा केंद्राच्या बाहेरच बसून राहत असे.. त्याला ही कांजिण्या झाल्या असल्याने होणाऱ्या वेदना असह्य वाटायच्या.. तरीही तो मुलाची वाट बघत बाहेरच बसून राहत असे.. ” बाबा, तुम्ही कशाला थांबता इथे, घरी जायचं ना.. तुम्हाला ही किती त्रास होत अाहे, तरी पण तुम्ही माझी वाट बघत बसता.. मी आलो असतो ना घरी चालत “.. येशू त्यांना बोलू लागला.. ” नाही रे बाळा, अशा वेदनांची सवय आहे मला , तु निश्चिंत होवून पेपर लिह “..
तसे पेपर लिहताना येशूला देखील त्रास होत होता, परंतु गरीबीमुळे भोगाव्या लागणाऱ्या वेदना या कांजिण्या ने होणाऱ्या वेदनांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होत्या हे त्याला माहीत होते.. अंगाला सुटणारी खाज आणि अंगाची होणारी जळजळ यामुळे परीक्षेच्या या काळामध्ये त्याला अभ्यास करणे शक्य नव्हते, परंतु अगोदर करून ठेवलेल्या अभ्यासाच्या जोरावर तो बऱ्यापैकी पेपर लिहत होता.. अखेर परीक्षा संपली.. येशूच्या आणि मध्याच्या अंगावरील पुरळ ही हळूहळू कमी होवू लागल्या.. काही दिवसानंतर ते दोघे बरे ही झाले, परंतु कांजिण्यांच्या खुणा दोघांच्या ही अंगावर व चेहऱ्यावर कायम स्वरूपी राहील्या…
मध्या परत रोज शेतात जावू लागला.. आता त्याच्या बरोबर बायको सुंदरी आणि येशू ही त्याला कामात मदत करण्यासाठी येत असत.. एके दिवशी मध्या आणि सुंदरी शेताच्या बांधावर बसून येशूच्या पुढील शिक्षणाचं कसं करायचं याचा विचार करत होते..
” तुम्ही काय बोलले का येशूशी पुढील शिक्षणाबद्दल ..? “, सुंदरीने विचारले..
” हो…” बोलता बोलता तो मध्येच थांबला ..सुंदरी त्याच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती..तो जरा चिंतेतच दिसत होता ..
थोडा थांबून बोलू लागला, ” इंजिनियरींग करायची इच्छा आहे असा म्हणाला..” , हा शब्द सुंदरी साठी नविनच होता..
” किती पैसे लागतील..? “, सुंदरीने पुन्हा प्रश्न केला..
” अंदाजे ४-५ लाख रुपये लागतील.. ” , मध्याने जरा हलक्या आवाजातच उत्तर दिले.. एवढे पैसे लागतील हे ऐकून तिच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले..
” एवढे पैसे आपण कुठून आणणार.. ” , ती पुटपुटली..
” मी एका बँकेत गेलो होतो.. तारण कर्ज मिळेल का बघायला..” , मध्या बोलत होता तिने मध्येच विचारले , “काय ठेवायचं तारण.. ?”..
” आपली जमीन आणखी काय..? “, तो झटकन बोलला..
” अहो.. पण ही तुमची खानदानी जमीन.. तुम्ही बोलला होता ना की जीव गेला तरी विकणार नाही म्हणून.. जर कर्ज घेतले तर त्याचे हप्ते लगेच सुरू होणार.. मग ते कुठून भरायचे.. शेवटी विकावीच लागणार ना.. ” , तीने भरभर सगळे बोलून टाकले..
” मी सावकाराकडे पण जाऊन आलो, त्याला मी सांगितलं कि मला काही महिने पैसे उसने लागतील म्हणून.. थोडाफार व्याज पण देईन.. आपल्या शेतातील पीक आले की ते विकून सावकाराचे पैसे देता येतील आणि बँकेच्या हप्त्यांचा पण विचार केलाय मी.. दोनदा पीक घ्यायचे आपण.. आणि येशू शिकून नोकरीला लागला की आपण सहज फेडू कर्ज..” तो जरा आत्मविश्वासानेच तिला सांगू लागला..
ती ही होकारार्थी मान फिरवू लागली.. एवढं बोलून ते परत शेतात कामाला लागले.. येशू पण काही तरी करतच होता..
येशूचा दहावीचा निकाल लागला.. येशूला खूप चांगले मार्कस् मिळाले होते.. एवढा आजारी असताना सुद्धा एवढे मार्कस्.. सगळे खूष झाले होते.. मध्याने अख्ख्या गावात पेढे वाटले.. येशूच्या इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.. मध्याने सगळा खटाटोप केला व तारण कर्ज तेवढा पास करून घेतला आणि सावकाराकडून उसने पैसे घेण्याची सोय सुद्धा केली..
मुंबईतील एका नामांकित काॅलेजमध्ये येशूच Admission झालं.. मुलाचे भविष्य आता उज्ज्वल आहे.. आता कोणतीच अडचण राहिली नाही असे समजून मध्या मनोमनी खुश झाला.. चांगल्या काॅलेजमध्ये Admission झालं म्हणून येशू हि खूश होता.. आता मागे वळून बघायचे नाही.. बापाने घेतलेल्या कष्टाचे चीज केल्या शिवाय राहणार नाही अशी जणू काय त्याने भीष्म प्रतिक्षाच घेतली.. काॅलेजच्याच Hostel मध्ये तो राहू लागला.. मध्या फक्त त्याला सोडण्यासाठी आला होता.. परत परत येणे त्याला परवडण्यासारखे नव्हते.. आता त्याच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या येवून पडल्या होता.. बँकेच्या कर्जाचे हप्ते , येशूला लागणारा खर्च , सावकाराचे पैसे उसने घेतले तर ते परत फेडण्यासाठी त्याला अहोरात्र मेहनत करावी लागणार होती..
येशूचं शिक्षण सुरळीत चालू झालं.. मध्या ही शेतात राबू लागला.. अगोदर करत असलेल्या शेती मध्ये त्याचे कुटुंब तेवढे चालत होते परंतु आता त्याच्यावर कर्जाचा ही भार असल्याने कोरडवाहू , जमिनीत सुद्धा पीक काढण्यासाठी त्याला धडपड करावी लागणार होती.. कोरडवाहू जमीनीवर पीक घ्यायचे असेल तर ती जमीन पाण्याखाली आणावी लागणार होती.. मध्याने शेततळे बनवण्याचा विचार केला परंतु ते खोदण्यासाठी मशीन आणणे त्याला परवडणारे नव्हते.. मध्या आणि सुंदरीने स्वत: खोदकाम करायला सुरुवात केली.. सकाळी लवकर शेतावर जावून शेतीची कामे उरकून लगेच ते दोघे शेततळे खोदायला सुरवात करत असत.. उन्हाच्या झळा सोसत सोसत मध्या आणि सुंदरी जमेल तेवढं शेततळं खोदत असत.. दोनदा पीक घ्यायचे तर जमीनीचा कस टिकून राहिला पाहीजे.. त्यासाठी सेंंद्रिय खत तसेच आलटूनपालटून पीक घ्यावे लागणार होते याची माहिती ही मध्याला होती.. शिक्षणाने माणूस शिकतो हे खरं आहे पण अनुभवाने ही माणूस खूप काही शिकू शकतो हे सांगण्यासाठी मध्या शिवाय दुसऱ्या कोणाचे उदाहरण देण्याची गरज नाही..
पावसाळा यायच्या अगोदर शेततळं तयार झालं पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल हे मध्या जाणून होता.. त्यासाठी भर उन्हात मध्या आणि सुंदरी खोदण्याचं काम करत असत.. कडक उन्हात काम करताना घामाच्या धारा सुटत असत.. पण समोर मुलाचं भविष्य होतं त्यामुळे उन्हाच्या झळा सोसल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.. बँकेचे हप्ते सुरू झाले होते.. हप्ते भरण्यासाठी लागणारे पैसे तो सावकाराकडून घेत होता.. मध्याचे कष्ट बघून हा आपले पैसे नक्की परत करील असा सावकाराला विश्वास होता त्यामुळे तो ही त्याला हवे तेवढे पैसे देत होता.. ७-८ महिने खोदकाम करून अखेर मध्याने छोटसं शेततळं तयार केलं.. तिकडे येशू ही मन लावून अभ्यास करत होता.. मधेमधे तो वडीलांना पत्र ही पाठवायचा.. मध्या ते कोणाकडून तरी वाचून घेत असे.. मुलाच्या आठवणीने मध्या आणि सुंदरी एवढे रमून जायचे की आपोआपच त्यांच्या चेहऱ्यावर कधी हसू यायचे तरी कधी डोळ्यातून अश्रू ..
मध्या जोमाने शेती करू लागला.. शेतातून बऱ्यापैकी पीक येवू लागले.. पावसाळ्यात येणारे पीक विकून तो सावकाराचे व्याजासहित उसने घेतलेले पैसे परत करत असे तर उन्हाळ्यात शेततळ्यातील पाणी वापरून दुसरं पीक घेवून बँकेच्या कर्जाचे काही हप्ते भरत असे.. सगळं काही अलबेल चालले होते.. २ वर्षे कोणताच प्रॉब्लेम आला नाही.. एके दिवशी धो-धो पाऊस पडू लागला.. पूर्ण दिवस संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता.. मध्याचं शेत पाण्याने तुडुंब भरू लागलं.. साचलेल्या पाण्याला वेळीच वाट करू दिली नाही तर शेताचा बांध फुटून बाजूच्या शेतांचे नुकसान होण्याची भीती होती.. संध्याकाळचे ६ वाजले असतील मध्या फावडा , टिकाव घेऊन शेताच्या दिशेने जाऊ लागला.. अंधार पडत चालला होता.. शेतावर पोहचल्यानंतर तुडूंब भरलेल्या शेतातील पाण्याला त्याने व्यवस्थित वाट करून दिली आणि सुटकेचा श्वास टाकून परतीच्या मार्गाला लागला..
अंधार खूप पडला होता.. रस्त्याने चालताना पायाखालचे काहीच दिसत नव्हते.. अचानक त्याच्या पायाला काही तरी चावल्याचे त्याच्या लक्षात आले.. पण अंधारात काहीच दिसत नव्हते.. दुर्लक्ष करून तो पुढे चालू लागला, परंतु चालत थोड्या अंतरावर गेला असेल तेवढ्यात त्याला भोवल आली आणि तो खाली पडला.. खूप उशीर झाला तरी नवरा परत येत नाही म्हणून सुंदरी शेताच्या दिशेने जाऊ लागली.. रस्ताने जाताना एका ठिकाणी तीला मध्या निपचित पडलेला दिसला.. ती घाबरून गेली.. तीने धावत जाऊन मध्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता.. तीला काहीच सुचेनासं झालं.. उचलून नेण्या इतपत तिच्यात जोर पण नव्हता.. त्याला तसंच तिथे ठेवून तीने घराच्या दिशेने धाव ठोकली.. शेजाऱ्यांना आवाज देवून त्यांना सगळी हकीकत सांगितली.. शेजारी लगेच त्याच्या मदतीला धावून आले.. त्यांनी शेतावर जाऊन निपचित पडलेल्या मध्याला उचलून घरी आणले.. कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला डाॅक्टरकडे नेण्यात आले.. डाॅक्टरने बघताच क्षणी सांगितले की केस जरा क्रिटीकल दिसते.. चेकअप केले असता असे निदर्शनास आले की विषाच्या प्रभावामुळे त्याच्या रक्त वाहिन्यावर परिणाम होऊन अंतर्गत रक्तस्राव झाला आहे , त्यामुळे ह्रदय, श्वसन तसेच किडनी फेल होण्याची शक्यता आहे.. आॅपरेशन करावा लागेल .. खूप जास्त खर्च होईल आणि जगण्याचे चान्सेस पण कमी दिसतात.. हे ऐकून सुंदरी ला खूप मोठा धक्का बसला..
” डाॅक्टर, तुम्ही पैशाची चिंता करू नका, तुम्ही फक्त आॅपरेशनची तयारी करा, मी आलेच पैसे घेऊन.. ” , सुंदरी डाॅक्टरला विनवणी करून निघून थेट सावकाराच्या घरी गेली.. सावकाराला घडलेला प्रसंग सांगितला.. मध्याशी सावकराचा चांगला व्यवहार असल्याने तसेच मध्याची जमीन ही असल्याने सावकाराने निसंकोचपणे तीला हवं तेवढे पैसे दिले.. पैसे घेऊन ती परत हाॅस्पीटलला गेली.. पैसे भरल्यानंतर डाॅक्टरांनी लगेच त्याला ICU मध्ये नेवून आॅपरेशन करायला सुरुवात केली.. अथक प्रयत्नाने डाॅक्टरांना अखेर यश आले.. मध्या हळूहळू प्रतिसाद देवू लागला.. सुंदरीच्या जीवात जीव आला.. त्याला योग्यवेळी औषध देण्याचे काम नर्स बरोबरच ती ही करू लागली.. काही दिवसाने तो शुद्धीवर आला.. मृत्यूशी झुंज देवून मध्या देवाच्या दारातून परत आला होता.. डिस्चार्ज देल्यानंतर त्याला घरी नेण्यात आले.. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर सुंदरीने त्याला सर्व हकीकत सांगितली.. सावकाराचे अगोदरच उसने घेतलेले पैसे आणि आता आणखी हे पैसे कसे द्यायचे तो विचार करू लागला.. या पीकात फक्त अगोदरचे पैसे देणे शक्य होते.. आता हे पैसे देवू कसे ह्या पेचात तो पडला..
त्याने कारखान्यात काम करायचा विचार केला.. दिवसा शेतात राबायचे आणि रात्री कारखान्यात जावून काम करायचे.. तरी पैसे कमीच पडणार होते.. सुंदरीने पण काम करायचे ठरवले.. कारखान्यात फक्त पुरूषानाच काम मिळत होते, त्यामुळे तिला तालुक्यालाच जावून काम शोधावं लागणार होतं.. तालुक्याला जावून काम मिळल म्हणून ती सकाळी लवकर निघाली.. एका ठिकाणी तिला धुणीभांड्याचं काम मिळालं.. पण एका ठिकाणाच्या धुणीभांड्यानं विषय सुटणार नव्हता.. त्या ठिकाणंची धुणीभांडी करून ती दुसरीकडे काम शोधायला जात असे.. असे करून तिला आणखी ३-४ ठिकाणी हेच काम मिळालं.. आता मात्र थोड्याफार प्रमाणात गाडी रूळावर येवू लागला होती.. येशू मात्र तिकडे शिक्षण घेतच होता.. तो फक्त वर्षातून एकदाच इकडे येत असे.. जेव्हा तो येई तेव्हा सुंदरी त्याला खूप सारे पक्वान्ने बनवून देत असे आणि जाताना डब्यामध्ये काहीतरी गोड बनवून देत असे.. आता त्याचे शेवटचे वर्षे होते.. त्यामुळे तो येणार नव्हता.. हा वर्ष संपल्यानंतर तो नोकरीला लागून आपल्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी हातभार लावेल असे दोघांनाही वाटत होते..
आलेल्या पीकाचे सगळे पैसे सावकाराला देऊन ही बरेच पैसे देणे बाकी होते.. दुसऱ्या पीकाचे पैसेही सावकाराला द्यावे लागणार होते.. ते पैसे त्याला दिले तर बॅकेचे हप्ते कसे फेडायचे या दुविधा स्थितीत मध्या पडला.. बँकेचे पैसे काही हप्ते न भरता सावकाराचे पैसे अगोदर देवू असा विचार त्याने केला.. परंतु जेव्हा हप्ते बुडू लागले तेव्हा EMI Bounce चे Charges पण लागू लागले.. आता मात्र मध्याची स्थिती खूप बिकट होवू लागली.. दोनदा बँकेची नोटीस पण येवून गेली.. येशूची शेवटची परीक्षा थोड्याच दिवसावर राहीली होती.. ती झाली की त्याचा ही थोडाबहुत हातभार लागेल अशी त्याला आशा होती.. त्यामुळे तो कसे तरी दिवस पुढे ढकलत होता.. दिवस रात्र कष्ट करून दोघेही थकून जात असत.. अंगात काम करण्याची ताकद नसली तरी त्यांना कामावर जावं लागत होते.. नाही गेले तर कर्जाचा बोजा वाढतच जाणार होता..
येशूची परीक्षा दोन दिवसात संपणार आणि तो येणार म्हणून सुंदरीने अगोदरच तयारी करायला सुरूवात केली.. ३-४ दिवस उलटून गेले असतील,पण येशू अजूनही आला नव्हता.. एके दिवशी येशूचं पत्र आलं.. लिहलं होतं.. ” आई – बाबा तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे.. मला एका परदेशी कंपनीत नोकरी मिळाली आहे.. इकडूनच डायरेक्ट परदेशात जावे लागणार आहे.. स्वत:ची काळजी घ्या..मी लवकरच येईन परत.. ” मुलाला नोकरी लागली म्हणून दोघेही खूप खूश झाले.. परंतु मुलगा दूर जातो आहे हे ऐकून दु:ख ही झाले..
दोन वर्षे झाली तरी येशूशी कोणताही संपर्क होत नव्हता.. मध्या आणि सुंदरी दोघांना ही चिंता वाटू लागली.. मुलाचे काय बरे वाईट तर झाले नसेल ना या धास्तीने त्यांना कधी कधी झोप पण लागत नसे.. परदेशात जाऊन शोधायचा तरी कुठे हा ही एक प्रश्नच होता.. मध्या रोज रेल्वे स्टेशनच्या बाजूला जाऊन ३-४ तास ये़शू ची वाट पाहत बसायचा.. येणाऱ्या प्रत्येक ट्रेनने येशू येत आहे असा त्याला भास व्हायचा.. वाट बघून डोळे थकले की तो तिथूनच थेट शेतावर जायचा.. राब-राब राबायचा परंतु डोक्यात येशूचाच विचार असायचा.. संध्याकाळी घरी गेला का सुंदरी त्याच्या चेहऱ्याकडे बघत बसायची.. आज ही आपला मुलगा आला नाही.. हे बघून आपसूकच तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे.. हुंदका लागायचा.. टपटप पडणारे अश्रू पुसत मध्या तिला धीर द्यायचा..
” आपला मुलगा कधीच नाय येणार का..? ” , ती रडत रडत विचारायची..
” अगं तो परदेशात गेलाय.. परदेशात गेला की २-३ वर्षे त्यांना नाय मिळत सुट्टी.. ” , तो तीला धीर देण्याचा प्रयत्न करायचा पण त्याचा ही उर दाटून यायचा..
एके दिवशी एक पोस्टमन त्याच्या घरी आला.. त्याच्या हातात एक पार्सल होतं..
त्या पार्सलकडे बघत मध्याने त्याला विचारले, ” काय काम काढलं पोस्टमन दादा..?”
” तुमचं पार्सल आहे..” , पोस्टमन ने उत्तर दिले..
” माझं पार्सल..! ” , मध्या जरा चकीतच होवून विचारू लागला.. कोणाचा बरं असेल असा त्याच्या मनात विचार येवू लागला..
न राहून त्याने पोस्टमनलाच विचारले , ” कोणी पाठवला आहे..? “
” यशवंत मधुकर माने ” , पोस्टमन नाव वाचून दाखवू लागला.. नाव ऐकताच मध्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या..
” माझ्या येशुचं पार्सल ..! “, तो जोराने ओरडू लागला.. येशु चे नाव ऐकताच सुंदरी घरातून पळत पळत बाहेर आली..
” काय झालं..? ” , ती मध्याला विचारू लागली..
” आपल्या येशूचं पार्सल आहे..”, तो आनंदी होऊन तिला सांगू लागला .. ती ही खुश झाली..
मुलाचे पार्सल बघून खुश होणारे आई-वडील पाहताना पोस्टमनला ही बरे वाटले.. पार्सल देऊन तो निघून गेला.. मध्या पार्सल घेऊन घरात गेला.. पार्सल खोलून बघितलं.. त्यात एक नवीन कोरा मोबाईल होता.. मोबाईल बघून दोघेही खूप खुश झाले.. यापूर्वी कधी त्यांनी मोबाइल वापरला नव्हता.. त्यामुळे कसे वापरायचे हे त्याला माहीत नव्हते.. त्याने शेजाऱ्यांला बोलावून घेतले.. शेजाऱ्यांनी मोबाईल कसा वापरावा हे मध्याला समजावून सांगितले.. मोबाईल व्यवस्थित चालू झाला.. आता त्याच्यावर फोन कधी येईल या कडे दोघेही डोळे लावून वाट बघू लागले.. खूप उशीर झाला पण फोन काही आला नाही.. हळूहळू रात्र पडु लागली.. रात्रीचे ११- १२ वाजले असतील अचानक फोन वाजू लागला.. मध्याने फोन उचलला..
” हेलो “, मध्या बोलू लागला..
” हेलो बाबा.. मी येशू ..” , समोरून आवाज येवू लागला..
” येशू..! ” , मध्याच्या तोंडून एकदमच उद्गार बाहेर पडले.. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.. सुंदरी ही बाजूलाच होती तीला ही राहवलं नाही.. तीने झटकन मध्याच्या हातातून मोबाईल हिसकावुन घेतला..
” येशू , कसा आहेस लेका तु ..? ” , ती रडत रडत येशूला विचारू लागली..
” आई , मी ठिक आहे.. ” , येशूने ही तिकडून उत्तर दिले..
” खूप काळजी वाटत होती रे तुझी.. एवढे दिवस झाले कुठे आहेस.? काय करतो.? व्यवस्थित खातो की नाय..? याच विचारानं जीव कासावासा व्हायचा लेका.. ” , ती त्याला सांगू लागली..
” आई , तु काळजी नको करत जावू .. मी खूप आनंदी आहे इकडे.. मस्त वाटते मला इथे .. खूप मोठी कंपनी आहे.. भरपूर पगार देतात.. सुख सुविधा देतात.. तुमच्याच एवढी काळजी घेतात माझी.. ” , तो सगळं काही तीला सांगू लागला.. हे एेकून तीला ही बरं वाटलं..
” सुखी राहा लेका, घे..बाबांशी बोल.. ” , तीने फोन मध्या कडे दिला..
” येशू बरा आहेस ना.. ” , मध्या त्याला विचारू लागला..
” हो बाबा, सगळं काही मस्त चाललय.. ” , त्याने उत्तर दिले..
” कधी येशील लेका.. बरेच वर्षे झाली तुला बघीतला नाय.. ” , मध्याने त्याला विचारले..
” बाबा मी तुम्हांला उद्या व्हिडिओ काॅल करतो.. आता खूप रात्र झाली असेल तिकडे.. आता झोपा तुम्ही.. उद्या करतो मी काॅल तुम्हाला.. ” , येशू त्याला सांगू लागला..
” ठिक आहे लेका.. काळजी घे.. ” , एवढे बोलून दोघांनी ही फोन ठेवला..
फोन ठेवल्यानंतर मध्या आणि सुंदरी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता.. तब्बल ३ वर्षाने त्यांनी येशूचं आवाज ऐकले होते.. एवढ्या दिवसाचे दु:ख ते क्षणात विसरले होते.. मुलाच्या काळजीने जड झालेले मन आज हलकं झालं होतं.. येशूचं सगळं काही व्यवस्थित असल्याने त्यांना प्रचंड आनंद झाला होता..आता कधी उद्या एकदाशी तो व्हिडिओ काॅल करतो आणि त्याला बघतो असे दोघांनाही वाटत होते.. त्याला बघण्याच्या आतुरतेने दोघांना ही रात्रभर झोप लागली नाही..
सकाळ कधी झाली दोघांना ही कळलच नाही.. दोघंही आंघोळ वैगेरे करून तयार झाले.. येशूच्या फोनकडे दोघांचाही लक्ष लागले होते.. सकाळ होऊन दुपार होत आली तरी येशूचा फोन आला नाही.. परदेशात दिवस जरा उशीराच उगवतो हे मध्याला कोणीतरी सांगितले होते.. येशू बहुधा झोपला असेल असे समजून तो फोनची वाट बघत बसला .. रोज ३-४ तास रेल्वे स्टेशनवर जाऊन येशू येण्याच्या वाटेकडे बघत तो कित्येक वर्षे थांबत होता.. पण येशू काही आला नव्हता, पण आज येशूचा फोन येईल हे पक्के होते त्यामुळे त्याला वाट बघत थांबायला तेवढाच आधार होता..
साधारणत: १-२ च्या सुमारास येशूचा फोन आला.. रिंगचा आवाज ऐकून सुंदरी ही बाहेर आली.. आता येशूने व्हिडिओ काॅल केला होता.. मध्याने काॅल उचलताच त्याला समोर येशू दिसला.. क्षणार्धात त्याचे डोळे पाणावले.. मुलाला बघून त्याला मिठीत घ्यावसं वाटलं.. सुंदरीला येशू दिसताच तीने मोठमोठ्याने रडणे सुरू केले.. एवढे दिवस आपल्या एकुलत्या एक मुलाला तीने कसे दूर ठेवले असेल हे तीच्या रडण्यातून स्पष्टपणे दिसत होते.. येशू ही थोडा भावनिक झाला.. त्याला ही आई-वडीलांचे प्रेम बघून रडू येवू लागले.. जवळपास २-३ मिनिटे असेच एकमेकांना बघण्यात गेले.. मध्या स्वत:ला सावरून येशूची विचारपूस करू लागला..
” कसं चाललय काम तुझं.. ? “, मध्याने पाणावलेले डोळे पुसत पुसत येशूला विचारले..
” बाबा, खूप मस्त चाललय .. साहेब लोक माझे काम बघून खूप खूश आहेत.. ते मला लवकरच मॅनेजर बनवणार आहेत.. “, येशू उत्सूक होऊन त्यांना सांगू लागला.. मुलाची तरक्की बघून दोघे ही खुश झाले..
” खूप मोठा हो लेका.. ” , मध्याने त्याला आशिर्वाद दिला..
” बाबा, तुमच्याशी एक बोलायचं होतं.. “, येशूने जास्त वेळ न घालवता मनातलं बोलायचं सुरू केलं.. तसा तो जरा घाबरतच विचारत आहे , हे मध्याला लगेच समजून आले..
” निश्चिंत होऊन बोल लेका.. तुला काय अडचण आहे का..? ” , मध्याने त्याला धीर देत विचारले..
” नाही बाबा , मला कसलीच अडचण नाही.. उलट माझे दिवस खुप आनंदात चालले आहेत.. ” , येशूने बोलणं चालू केलं..
” मग चिंतेत का दिसतोस.. ” , मध्या ही जरा गोंधळून गेला..
” बाबा, तुम्ही एवढे कष्ट करता हे नाही बघवत मला.. दिवसरात्र उन्हातान्हात शेतात राब राब राबता..त्यापेक्षा ती जमीन विकून का नाही टाकत.. मिळणाऱ्या पैशात उरलेले कर्ज ही फेडता येईल आणि एैशपैश जीवन ही जगता येईल तुम्हाला.. मी आता बऱ्यापैकी इकडे पैसे कमवू लागलो आहे.. त्यामुळे जमीनीची मला काहीच गरज लागणार नाही.. मी इथेच राहून आनंदात जीवन जगू शकतो.. तुमच्या नेहमी डोळ्यासमोर राहावं , यासाठीच हा मोबाईल पाठवला आहे.. व्हिडिओ काॅल केला की मी घरात असल्याचाच तुम्हाला भास होईल.. मग छोट्याशा भेटीसाठी मी एवढ्या लांब कशासाठी येवू.. आज एवढ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत की ४-५ तासात मी विमानाने तुमच्यापर्यंत सहज पोहचेन.. त्यामुळे जेव्हा कधी बरेवाईट होईल तेव्हा लगेच येता येईल मला..” , येशूने क्षणाचाही विलंब न करता सरसकट सगळंच बोलून टाकलं.. येशूच्या तोंडून हे शब्द ऐकताच मध्याच्या डोळ्यासमोर अंधारीच आली.. पायाखालची जमीन एकदाच सरकल्यासारखे वाटू लागले.. डोळे पाणावले.. आलेला हुंदका कसा तरी दाबून ठेवला आणि एकच वाक्य बोलला..
” तु सुखी राहा एवढीच इच्छा आहे आमची.. हे घे आईशी बोल.. ” , एवढे बोलून मध्याने फोन सुंदरीकडे दिला.. आता मात्र आलेला हुंदका त्याला दाबून ठेवता आला नाही.. कधी नाही तो मध्या ढसाढसा रडू लागला.. रडण्याचा आवाज येशूला जावू नये म्हणून उठून बाहेर गेला.. बाप असा फक्त एकदाच रडतो जेव्हा तो मुलीला लग्नाच्या वेळेस विदा करतो.. पाणावलेल्या डोळ्यातून आता पाण्याच्या धारा वाहू लागला होत्या.. त्याने आता पर्यंत भोगलेल्या वेदनांपेक्षा या वेदना कितीतरी पटीने जास्त होत्या.. सुंदरीच रडणं तर चालूच होतं.. इकडच्या तिकडच्या काही गोष्टी काढून तीने एकदाचा काॅल संपवला..
फोन ठेवल्यानंतर सुंदरी मध्या जवळ गेली.. आता कोण कोणाला धीर देणार.. दोघंही गळ्यात गळा घालून रडू लागले.. जवळपास २-३ दिवस घरात चूल पेटली नाही.. दोघांची ही भूक मरून गेली होती.. कोण कुणाशीच बोलत नव्हतं.. घरात एक प्रकारची स्मशान शांतता पसरलेली होती.. चौथ्या दिवशी मध्या लवकर उठला.. अंघोळ वैगेरे करून तयार झाला..
” कुठं निघालेत..”, सुंदरी विचारू लागली..
” येतो जरा तालुक्याला जावून..” , मध्या बोलला.. तीने परत त्याला काही विचारले नाही.. तो बस स्टाॅप वर जाऊन उभा राहिला.. मनात खूप सारे विचार येत होते.. बस येवून उभी राहीली.. मध्या बस मध्ये जावून बसला.. बसच्या चाकापेक्षा जास्त वेगाने मध्याच्या डोक्यातील विचारांचे चक्र फिरत होते.. बस एका हाॅस्पीटल जवळ जावून थांबली.. मध्या खाली उतरला.. समोर हाॅस्पीटलची भली मोठी पाटी होती.. लिहलं होतं – ” किडनी अॅड डायलिसिस सेंटर “..
मध्या आत जावून एका रिसेप्शनीस्टला विचारू लागला.. ” मला किडनी विकायची आहे.. “
रिसेप्शनीस्ट त्याच्याकडे कुतूहलाने बघू लागली..
” साॅरी सर , आम्ही किडनी विकत घेत नाहीत , तर आमच्याकडे लोक किडनी दान करण्यासाठी येतात.. आमच्याकडे फाॅर्म भरून दिला की आम्ही त्या व्यक्तीच्या निधना नंतर त्याच्या पत्त्यावर जावून किडनी दान ची प्रोसेस करतो.. मरणानंतर आपण आपले अवयव जळून राख होण्याऐवजी ते दान करून एखाद्या व्यक्तीला जीवन दान देवू शकतो व कोणाला तरी अनाथ होण्यापासून वाचवू शकतो.. हीच आपली पुण्याई.. ” , रिसेप्शनीस्टने सगळं काही मध्याला सांगून टाकलं.. आपली किडनी आपल्या मरणानंतर एखाद्याला जीवनदान देईल हे ऐकून मध्याने किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.. किडनी विकण्यासाठी गेलेला मध्या किडनी दान करण्याचा फाॅर्म भरून घरी परत आला..
सुंदरी त्याची वाट बघतच बसली होती.. घरी परत येताच मध्याने टिकाव उचलला आणि शेताकडे जावू लागला.. सुंदरी ही त्याच्या मागून निघाली.. जमीन ही फक्त विकण्यासाठीच नसते तर खानदानाची निशाणी म्हणून सांभाळून ठेवायची असते.. असा विचार त्याच्या डोक्यात घुमत होता.. शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत कष्ट करीन पण जमीन विकणार नाही.. असा त्यानी ठाम विचार केला होता.. कर्ज फेडण्यासाठी भर उन्हातान्हात तो काम करू लागला.. मुलाने व्हिडिओ काॅलचा काढलेला तोडगा त्याच्या जिव्हारी लागला होता.. एवढे वर्षे मुलासाठी कष्ट करताना उन्हाच्या झळा सोसून तो अगोदरच करपून गेला होता.. आता मात्र हाच करपलेला बाप कर्ज फेडण्यासाठी परत एकदा उन्हामध्ये करपतच राहील की कधी तरी येशू परत येवून कर्जाचा बोजा दूर करील , देव जाणो ..