मानलेली गलफ्रेंड
भाग - २
मी हातावर घेतलेल्या साखरेकडे बघत राहीलो.. माझ्या डोळ्यातील अश्रू त्याच्यावर पडून ती भिजून गेली आणि थोडी थोडी विरघळू लागली.. पण मी मात्र माझं प्रेम या साखरे प्रमाणे विरघळू देणार नाही.. ती तेव्हा ही माझी मानलेली गलफ्रेंड होती पुढे ही राहणार असे मनाशी बोलून मी तिथून निघालो.. थोडे अंतर पुढे गेल्यावर तिला परत एकदा बघावं म्हणून मी मागे बघितलं.. ती माझ्याचकडे बघत होती.. माझी नजर तिच्यावर पडताच क्षणी तिने तिची नजर हटवली..
मी पुन्हा पुढं पुढं चालू लागलो.. पावले शतपावले गेलो असेन आता फक्त तिला शेवटचं बघावं म्हणून मी पुन्हा एकदा मागे वळून बघितलं.. ती साखर वाटतच होती.. पण साखरेच्या त्या ताटात तिच्या डोळ्यातून अश्रू पडत असतानाचा मला भास झाला.. अजून निरखून बघितल्यावर मला धक्काच बसला.. खरच तिच्या डोळ्यातून अश्रू पडत होते.. तीच्या डोळ्यात अश्रू का आले असावेत..? असा विचार करत मी तिच्याकडे एकटक बघत राहीलो पण तिने मात्र पुन्हा माझ्याकडे बघितलं नाही.. थोडावेळ तिथेच थांबून मी निघून आलो..
दुसऱ्या दिवशी मी टेरेसवर काहीतरी करत बसलो होतो.. ती अंगणात झाडू मारत होती.. ती झाडू मारताना मधेमधे माझ्याकडे बघत होती , पण मी माझ्या कामात गुंग असल्याने माझे तिकडे लक्ष नव्हते.. ती बराच वेळ झाडू मारत होती.. मधेच मला कसलातरी जोराचा आवाज ऐकू आला.. कसला आवाज झाला म्हणून मी खूर्चीवरून उठून बघू लागलो.. तीने माझं लक्ष वेधून घेण्यासाठी एक जोराचा फटका अंगणात असलेल्या पत्र्याच्या टाकीवर मारला होता.. जोराचा आवाज ऐकून तिची आई घरातून पळत पळत बाहेर आली..
" काय झालं गं..?", तिच्या आईने तिला विचारले..
" काही नाही गं.. या पत्र्याच्या टाकीवर झाडू आपटला म्हणून आवाज झाला..? " , तीने आईला सांगितले..
" बस कर आता.. चल घरात.. " , असे बोलून तिची आई परत घरात गेली.. मोहीनीच्या हाताला खूप लागलं होतं.. होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तीने तो हात दुसऱ्या हाताने घट्ट पकडून ठेवला होता.. थोडावेळ थांबून पडलेला झाडू उचलून ती माझ्याकडे बघत बघत घरात गेली..
२-३ दिवस उलटून गेले असतील.. संध्याकाळची वेळ होती.. ती अंगणात खूर्चीवर बसलेली मला दिसली.. कुणाशीतरी फोनवर बोलत होती.. साखरपुडा झाल्यानंतर प्रत्येक मुलीला तिचा होणारा नवरा नवीन फोन घेवून देत असतो.. तिला हि नवऱ्याने घेऊन दिला असावा आणि आता ती त्याच्याशीच बोलत असावी असे मला वाटले.. पण तिच्या हातात आईचाच जुना फोन होता.. मी गावात जात असताना तिने मला हाक मारली..
" अरे कुठे चाललास.. इकडे ये.." तिचा आवाज ऐकून मी जागीच थांबलो.. तिने अचानक मला कशाला बोलवला असेल.. मी जरा गोंधळून गेलो.. तिच्या समोर जावून उभा राहिलो.. ती माझ्याकडे फोन देत म्हणाली, " हे घे.. बोल.. " मी पार बिथरून गेलो..
" कोण आहे.. ", मी फोन घेत विचारले..
" अरे तु बोल तर खरं.. " तिने बळजबरीने माझ्या हातात फोन दिला..
मी फोन घेवून कानाला लावला.. समोरून एका मुलीचा आवाज आला..
" काय मग.. कसा आहेस..? " , समोरून ती मुलगी म्हणाली.. मी काही तिचा आवाज ओळखू शकलो नाही..
" कोण..? मी ओळखलं नाही.. ", मी उत्तर दिलं..
" अरे वाह..! विसरलास वाटतं.. " , ती मुलगी म्हणाली..
" एेश्वर्या.." , मी एकदम जोरात ओरडलो..
समोरून ऐश्वर्या बोलत होती.. अभिषेक बच्चन ची ऐश्वर्या नव्हे.. माझी काॅलेजची मैत्रिण ऐश्वर्या.. ती मोहीनीची खास मैत्रिण होती.. माझ्या एकतर्फी प्रेमाला हिचा बाहेरून सपोर्ट असायचा.. पण तिने कधी मोहीनीला त्याबद्दल डायरेक्ट सांगितलं नाही..
फोनवर बोलताना ती मला चिडवू लागली.. ५ - १० मिनिटे बोलून झाल्यावर मी मोहीनीकडे फोन देवू लागलो.. ती माझ्याकडे कधीपासून एकटक बघत होती हे माझ्या लक्षात ही आले नव्हते.. मी आवाज देताच ही भानावर आली.. मी फोन देवून निघू लागलो तेवढ्यात ती म्हणाली, " अरे ऐक ना.. " एवढे बोलून ती थांबली..
" काय..? ", मी म्हणालाे.. ती क्षणभर थांबली आणि म्हणाली..
" काही नाही.. जा तू..", असे बोलत असताना तिच्या चेहरा उदास वाटत होता.. मी काही न बोलताच तिथून निघून आलो..
पुढे रोज संध्याकाळी ती मला अंगणात खुर्चीवर आकाशाकडे बघत बसलेली दिसत असायची.. तिच्या चेहऱ्यावर कमालीची उदासिनता दिसत होती.. तिची ही उदासिनता तिच्या आई - वडिलांपासून लपून राहीली नाही.. एके दिवशी आईने तिला जवळ घेऊन विचारलं,
" का एवढी उदास दिसते..? तुला मुलगा आवडला नाही का..? ५ - ६ दिवस झाले जेवण ही व्यवस्थित करत नाहीस..? "
आईच्या एक ही प्रश्नाला तीने उत्तर दिले नाही.. आईने ही बातमी तिच्या वडीलांना सांगितली.. तिचे वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे.. माझ्यासाठी जरी तो खडूस असला तरी तिच्यासाठी मात्र तो देवच होता.. हळवा - प्रेमळ मनाचा होता.. वडील तिच्यापाशी गेले आणि म्हणाले, " अगं काय झालंय तुला..? मला तरी सांगशील का..? "
वडीलांच्या प्रश्नांने तिला मात्र रडू येवू लागले..
" अगं कशाला रडतेस..? तुला जर मुलगा नसेल आवडला तर नको करू लग्न.. तु माझा विचार करतेस का..? तुला वाटत असेल की हे लग्न तुटलं तर तुझ्या बापाला मिळणारा मानसन्मान धुळीस मिळेल.. अगं कसला मानसन्मान घेवून बसली आहेस.. तु खूश रहावी एवढीच इच्छा आहे माझी.. " वडीलांचे प्रेम बघून ती आणखीनच ढसाढसा रडू लागली.. वडील तिला गप्प करत बोलू लागले, " तुझ्या मनात कोणी मुलगा आहे का..? अगं तुझ्या मनात काळू सारखा मुलगा असला ना तरी मी तुझं लग्न त्याच्याशी लावून देईन.. " वडीलांच्या वाक्याने ती मात्र काहीच बोलली नाही.. वडील समजून गेले.. थोडावेळाने तो तिला म्हणाला, " अगं तुझ्या मनात काळू होता तर अगोदर सांगायचं ना..? कोणताही निर्णय घेताना स्वत:चा, कुंटुंबाचा आणि समोरच्या व्यक्तीचा सुद्धा विचार करायला हवं होतं..? प्रेम करणं काही चूक नाही पण असे मनात दाबून ठेवणं मात्र चूकीचं आहे.. खूप उशीर केलास लेकी सांगायला.. एखादं लग्न तुटल्यानंतर मिळवलेली अब्रू क्षणार्धात धुळीस मिळते.. हे सर्व होवू नये म्हणून प्रत्येकाने अगोदरच जे काही मनात असेल ते सांगितलं पाहिजे.. " बापाच्या बोलण्याने तीला गहिवरून आले..
" बाबा, माझ्या हातातून खूप मोठी चूक झाली आहे.. मी तुम्हांला अगोदरच सांगायला पाहिजे होतं.. पण बाबा माझी हिम्मतच होत नव्हती.. मला नेहमी वाटायचं की तुम्ही काय विचार कराल, समाज काय विचार करील याच भीतीने मी त्याला ही कधी सांगितलं नाही की तो मला आवडतो.. पण बाबा मला एवढा विश्वास आहे की त्याच्या बरोबर मी खूश राहीन.." वडीलांनी तिला जवळ घेऊन गप्प केलं..
" तु चिंता करू नकोस.. सगळं काही ठिक होईल.."
तिच्या बापाने माझाच उदाहरण का दिला असावा.. बहुधा माझ्या हालचालीने त्याला अगोदरच याची जाणीव असावी.. शिवाय माझ्या प्रति मोहिनीच्या मनात काय भावना असाव्यात हे ही त्यांनी जाणले असावे.. बाप..! बाप असतो.. आपण कितीही लपवलं तरी बापाच्या नजरेतून ते लपत नसतं..
दुसऱ्या दिवशी सकाळीच तिचा बाप माझ्या घरी आला.. मी तयारी करून नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला चाललो होतो.. एकदम फाॅर्मल कपडे घालून टाय लावून मी तयार झालो होतो.. तिचा बाप मला बघून जरा हसत पण वरच्या आवाजात म्हणाला, " कुठं निघालास..? बाप कुठं आहे तुझा..? " त्याच्या त्या दणकट आवाजाने मी मात्र घाबरलो.. एवढ्या सकाळीच तिचा बाप का आला असेल..? काही प्राॅब्लेम तर झाला नसेल ना..? मी विचारत करत माझ्या वडीलांना हाक मारली.. माझे बाबा नाष्टा करून हात धुत होते.. माझा आवाज ऐकून ते धुतलेले हात टाॅवेलात पुसत बाहेर आले.. मी जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात तिचा बाप म्हणाला, " हे बघ.. आमच्या घरी जा आणि दही-साखर खाऊन मगच जा इंटरव्ह्यूला.. " मान हलवत मी तिथून निघालो आणि थेट तिच्या घरी गेलो..
मला बघून ती हसू लागली आणि म्हणाली, " काय मग मुलगी बघायला चालला आहे वाटतं..? "
" नाही गं इंटरव्ह्यूला चाललो आहे.. " , मी ही खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणालो..
" मग इकडं काय काम काढलं..", ती माझी जरा थट्टा करतच म्हणाली.. बऱ्याच दिवसानंतर तिला हसताना मी पाहत होतो.. मी तिला सर्व काही सांगितलं.. ती घरात जावून एका छोट्या वाटीत दही आणि साखर घेऊन आली.. मी हात पुढं करताच क्षणी मला तो साखरपुड्याचा दिवस आठवला आणि माझ्या डोळ्यातून अचानक पाणी आले.. माझ्या डोळ्यात आलेले पाणी बघून तिच्या ही डोळ्यात पाणी आले.. क्षणाचा ही विलंब न लावता तिने मला घट्ट मिठी मारली आणि जोरजोराने रडू लागली.. दोन मिनिटे काय चाललयं मला काही समजे ना.. समोरून तिची आई येताना मला दिसली.. मी तिला मिठीतून सोडायला सांगत होतो पण ती काही केल्या मिठी सोडत नव्हती.. मला मिठी मारलेली तिच्या आईने बघितली.. मी पार घाबरून गेलो.. आता आपलं काही खरं नाही असे समजून मी तिला दूर करू लागलो.. बऱ्याच प्रयत्नाने तिने मिठी सोडली.. तिची आई समोरच उभी होती.. मिठी सुटल्यानंतर ती मला म्हणू लागली, " किती वर्षे प्रेम करतोस माझ्यावर..? मनातच ठेवशील की बोलशील कधीतरी.. तुला काय वाटतं, मला काय कळत नाही का..?" प्रत्यक्ष आई समोर तिच्या अशा बेधडक बोलण्याने माझी मात्र हवाच टाईट झाली.. एक वेळ तिच्याकडं, एक वेळ तिच्या आईकडं बघत मी स्वतः ला सावरत होतो.. पण ती नाॅनस्टाॅप बोलतच होती.. थोड्यावेळाने मला सगळी हकीकत समजली.. खूप आनंद झाला.. तिला मिठी माराविशी वाटली पण तिची आई समोर असल्याने गप्पच उभा राहिलो.. आज माझ्या स्वभावाने माझ्या रंगावर मात केली होती.. मोहीनी माझी होणार होती.. मानलेली गलफ्रेंड नव्हे तर माझी बायको होणार होती.. हसत मुखानं मी इंटरव्ह्यूला गेलो आणि हसत मुखानं परत आलो.. मी इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालो होतो.. मला नोकरी लागली होती.. माझ्या जिवनात एका पाठोपाठ एक आनंदाचे क्षण येत होते..
तिचा बाप माझ्या बापाबरोबर काहीतरी वार्ता करून गेला होता.. मात्र माझ्याशी कोणी काही बोललं नाही.. तिचा बाप घरी गेल्यानंतर तिच्या आईने त्याला विचारलं.. " अहो..! त्या मुलाकडच्या मंडळीला काय निरोप द्यायचा..? "
" अगं, मला काही सुचेना.. डोकं एकदम सुन्न झाल्यासारखं वाटतं..", त्याने बराचवेळ थांबून उत्तर दिलं.. तिची आई पुढं काही बोलली नाही.. तो आणखी थोडावेळ थांबून बोलू लागला..
" पोरीनं अगोदर सांगायला पाहिजे होतं.. असं एकाएकी नातं तुटल्यावर खूप मोठं दुख: होतं.. आयुष्यभर कमावलेल्या मानसन्मानाची अक्षरश: राख रांगोळी होते.. आपलं ही चूकलंच.. आपण ही तिला अगोदर विचारायला पाहीजे होतं.. आपण आपल्या इच्छा- अपेक्षा मुलीवर लादून देतो आणि ती बिचारी आपल्या प्रेमापोटी तिच्या इच्छा- अपेक्षा दाबून ठेवत असते.. आज जर तिला विचारलं नसतं तर आपल्या इच्छा- अपेक्षांचा भार आयुष्यभर तिने झेलला असता.. उशीरा का होईना बरं झालं आपल्याला मुलीच्या मनातलं समजलं.. "
एवढे बोलून त्याने आपल्या खिशातील फोन काढला आणि त्या मुलाच्या वडीलांना लावला..
" हेलो, सर्जेराव ना..? "
" हो, बोलतोय.. " , समोरून मुलाचे वडीलांचा आवाज आला..
" मला माफ करा.. हे लग्न नाही होवू शकत.. ", एकदम नम्र आवाजात तिच्या बापाने त्यांना सांगितले..
बराचवेळ बोलून झाल्यानंतर मुलाच्या वडीलांनी.. " स्वत:च्या इज्जतीचा नाही तर दुसऱ्यांच्या इज्जतीचा पण विचार करावा.." असे बोलून फोन ठेवून दिला.. फोन ठेवल्यानंतर तिचा बाप मानखाली घालून घरातून उठून बाहेर निघून आला आणि अंगणात असलेल्या खूर्चीवर बसून आकाशाकडे बघत राहिला.. तेवढ्यात तिथे मोहिनी आली.. वडीलांना एवढा हतबल बघून तिचे डोळे भरून आले.. भरलेल्या डोळ्यांनी ती वडीलांना म्हणू लागली..
" बाबा, तुम्ही सांगाल तिथे मी लग्न करायला तयार आहे.. मला सहन नाही होणार तुम्हाला कोणी काही बोललेलं.. " तिच्या भरलेल्या डोळ्यांकडे बघत तिचे वडील म्हणाले, " लेकी सगळं काही ठीक होईल.. मी सकाळी काळूच्या घरी गेलो होतो.. त्याच्या वडीलांशी बोललो आहे.. ते तयार आहेत लग्नासाठी.. आणि त्या मुलाकडील मंडळींशी ही बोलणं झालयं माझं.. तु कसली ही चिंता करू नको.. " वडीलांचे तिच्यावरील प्रेम बघून तीचे उर दाटून आले..
" बाबा मला माफ करा.." अशी ती पुटपुटत राहीली..
मला जेव्हा आमच्या लग्नाची १०० टक्के खात्री पटली तेव्हा मी आनंदी होवून धावत धावत शंकराच्या मंदीरात गेलो.. कारण मी लहान असताना एका वृद्ध व्यक्तीने मला सांगितले होते की " तुला जर विद्या हवी असेल तर सरस्वतीची पुजा कर.. तुला जर धन हवं असेल तर लक्ष्मीची पुजा कर आणि तुला जर सुंदर पत्नी हवी असेल तर उमापार्वतीची पुजा कर.. " तेव्हा पासून मी गावातील शंकराच्या मंदीरात रोज सकाळी जावून मोहीनी मिळावी म्हणून उमापार्वतीची पुजा करत होतो.. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या.. सगळं काही स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं.. घरच्या मंडळींनी साखरपुडा न करता डायरेक्ट लग्नाचीच तारीख ठरवली..
लग्नाचा दिवस उजाडला.. आज नवऱ्याच्या पोशाखात मी इतर दिवसापेक्षा कितीतरी सुंदर दिसत होतो.. मी खूश होवून हसत हसत मित्राला म्हणालो, " ऐ काशी..! माझी दृष्ट काढून घे.. नाहीतर कोणाची नजर लागायची.. " काशी माझ्याकडं बघून हसू लागला आणि म्हणाला, " तुझी दृष्ट काढून त्याचा टिका जर तुझ्या चेहऱ्यावर लावला तर तो भिंग घेवून शोधावा लागेल.." त्याच्या या वाक्याने मी ही हसू लागलो.. त्याच्या बोलण्याचा मला कधीच राग येत नव्हता.. माझ्या एकतर्फी प्रेमाला त्याने वर्षानुवर्षे जिवंत ठेवलं होतं.. कधी म्हणाला नाही, की " सोड तिचा नाद.. तुझी लायकी नाही तिच्यावर प्रेम करायची.. " अशा या जिवलग मित्राचा कोणाला राग येईल का..? सगळे विधी पार पडत होते.. शेवटी तो क्षण आलाच.. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याचं स्वप्न आज प्रत्यक्षात घडत होतं.. तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मी तिच्यासोबत सप्तपदी पूर्ण केली.. आता ती माझी साता जन्माची अर्धांगिनी झाली होती.. विधी संपन्न झाल्यानंतर आम्ही स्टेजवर विविध पोजमध्ये फोटो काढू लागलो.. आमचे फोटो काढत असताना एक फोटोग्राफर त्याच्या दुसऱ्या सहकाऱ्याला बरोबर कुजबुजला, " दादा, हे तर लयच काळं दिसतय.. फोटोमध्ये मॅच पण होत नाही.." त्यावर तो सहकारी म्हणाला, " थांब जरा , मी लाईटचा फोकस आणखी पुढे नेतो.. " त्या सहकाऱ्याने लाईटचा फोकस एकदम माझ्या तोंडासमोर आणला आणि फोटोग्राफरला इशारा केला.. फोटोग्राफरने फोटो काढला आणि सहकाऱ्याकडे बघत नकारार्थी मान फिरवली.. तो सहकारी परत फोटोग्राफर जवळ गेला आणि म्हणाला, " तु काढून घे फोटो.. करू नंतर एडीट. " मी मात्र त्यांच्याकडं बघत स्मितहास्य देत होतो..
लग्न झाल्यानंतर ५ - ६ दिवसांने आम्ही फिरायला निघालो.. तिला काश्मीर खूप आवडतं.. तिथं पडणाऱ्या हिमवर्षात तिला खेळावसं वाटतं.. तिची इच्छा मी पुर्ण करणार नाही तर कोण करणार.. आम्ही काश्मीरलाच जायचं ठरवलं.. सुरूवातीला विमानाने आणि नंतर पुढे टॅक्सीने आम्ही तिच्या आवडत्या ठिकाणी पोहचलो.. तिथे एका हाॅटेलात आम्ही आमचा सामान ठेवून आजूबाजूची अनेक नयनरम्य ठिकाणं फिरू लागलो.. तिला फोटो काढायची खूप हौस होती.. प्रत्येक ठिकाणाचे कितीतरी फोटो आम्ही दोघांनी एकत्र काढले.. संध्याकाळी हाॅटेलवर परत आल्यावर मी त्या फोटोमधून स्वत:ला क्राॅप करून ते फोटो व्हाट्सऍप स्टेट्सला ठेवत असत.. माझं व्हाट्सऍप स्टेट्स बघून मित्र मला फोन करायचे आणि म्हणायचे, " वहिनी काय एकटीच फिरायला गेली आहे का ..?" मी उडवाउडवीची उत्तरे देत फोन ठेवून द्यायचो.. ती मात्र तिच्या व्हाट्सऍप स्टेट्सला आमचं दोघांचं ही फोटो ठेवत असत..
एके दिवशी आम्ही देवाचं दर्शन घेण्यासाठी एका मंदिराबाहेर रांगेत उभे होतो.. गर्दी जास्त असल्याने रांगेत असणाऱ्या व्यक्तींचा एकमेकांना धक्का लागत असे.. ती माझ्या समोर रांगेत उभी होती.. मी रांगेत असताना आजूबाजूचा परीसर बघत होतो.. मला थोड्या दूर अंतरावर एक म्हातारी दिसली.. ती माझ्याकडं एकदम खुन्नस नजरेने बघत होती.. थोडा वेळ थांबून ती थेट माझ्या दिशेने भरभर चालत आली.. मी जरा घाबरूनच गेलो.. ती म्हातारी माझ्या समोर येवून उभी राहीली आणि माझ्याकडं रागानं बघू लागली.. मी भीतभीतच विचारलं, " काय आज्जी, काय झालं.." ती जोराने ओरडून म्हणाली, " लाज नाही वाटत मुलींना छेडायला.. " आज्जीच्या आवाजाने रांगेतील सगळी लोकं माझ्याकडं बघायला लागली.. मी त्या म्हातारीला म्हणालो, " मी कधी कोणाला छेडलं..?" माझ्या प्रश्नाने म्हातारी तावातावाने म्हणू लागली, " मी कधी पासून बघतो, तु या पोरीला मधेमधे धक्का देत आहेस.. " म्हातारीच्या उत्तराने मला काय बोलावं सूचेनासे झाले.. तेवढ्यात मोहीनी म्हणाली, " अहो आज्जी..! हा माझा नवरा आहे.." असे बोलून तीने मला तेवढ्या लोकांत एकदम घट्ट मिठी मारली.. तिने मारलेल्या मिठीकडे बघत आवाक होवून ती म्हातारी निघून गेली.. पण मोहीनीने तेवढ्या लोकांत मला मारलेल्या त्या घट्ट मिठी प्रमाणे माझं प्रेम ही घट्ट होत गेलं..