हा..! तर ती आहे मोहिनी.. जसा मी नावाप्रमाणे काळा तशीच ती नावाप्रमाणे मोहीनी.. " १०८ " हा नंबर शुभ म्हणून मानला जातो.. म्हणून दुकानातून १०८ पानांची वही आणून प्रत्येक पानावर १०८ वेळा तिचा नाव लिहिला..
आता आमची बारावी झाली तरी मला काय पुढं जाता आलं नाही.. कसा जाणार हो..! तीचं ना माझं नातं म्हणजे चंद्राचं आणि त्यावरील डागाचं जसं असतं तसचं.. तीला प्रपोज करून इज्जतीचा फालूदा करून घेण्यापेक्षा न बोललेलं बरं.. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तीच्यावर मी प्रेम दिलवाले पिक्चर मधील अजय देवगण पेक्षा जास्त केलं आहे..
मला माहीत आहे की उभ्या आयुष्यात ती माझी गलफ्रेंड बनू शकत नाही म्हणून काय मी तिच्यावर प्रेम करणं सोडून द्यायचं.. हे कदापी होणार नाही.. समाजाची, तिची आणि माझी सुद्धा लाज राखून मी आज असे घोषीत करतो की ती माझी मानलेली गलफ्रेंड म्हणून मी तिचा स्वीकार करत आहे..
बारावी नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी आम्हाला जरा लांबचाच प्रवास करावा लागत असे.. तशी बसची सुविधा होती ही, पण त्यात एवढी गर्दी असायची की पाय ठेवायला ही जागा उरत नसे.. एवढ्या या गर्दीत जर तिला कोणाचा धक्का लागला की माझं मात्र तिळपापड व्हायचं.. शेवटी मी वडीलापाशी हट्ट धरला की मला बाईक पाहीजे म्हणून..
आता एकुलता एक लेक आणि वंशाचा दिवा असल्याने बापानी ही माझा हट्ट पुरवला.. माझी नजर मात्र ती काॅलेजला जायला कधी निघते यावरच असायची.. ती जेव्हा काॅलेजला जाण्यासाठी बस स्टाॅप कडे निघायची नेमका तेव्हाच मी बाईक घेऊन निघायचो.. तिच्या समोर जाऊन बाईक थांबवून तीला बसायला सांगायचो.. ती ही निसंकोचपणे बसायची.. तेव्हा माझी दशा धुम पिक्चर मधील उदय चोप्रा सारखी व्हायची..
मी तीला रोज काॅलेजला घेऊन जायचो आणि येताना ही घेऊन यायचो.. साधारणतः मुलगा - मुलगी असे एकमेकांबरोबर येत-जात असतात तेव्हा समाज त्यांना वेगळ्या दृष्टीने बघत असतो.. पण आमच्या बाबतीत तसं कधीच झालं नाही.. ते का..? हे तुम्हांला सांगायची गरज नाही.. तरीपण सांगतोच.. अहो..! चिखलात कमळ कसा दिसावा तसचं काहीसे आम्ही दिसत होतो..
लहानपणी शाळेत असताना मुलं मला तिच्या नावाने चिडवायची.. त्यावेळी जर कोणी एखाद्या मुलीला एखाद्या मुलाच्या नावाने चिडवत असेल तर ती मुलगी त्या मुलाला राखी बांधत असे.. त्यामुळे रक्षाबंधन या दिवसाची मला खूप जास्तच भीती वाटायची.. हा संपूर्ण दिवस माझा रानातच जात असे कारण ती राखी बांधायला येईल या भीतीने मी सकाळीच फरार होत असे.. भूक लागू नये म्हणून बरोबर गुळ शेंगदाणे आणि एक पाण्याची बाटली तेवढी घेवून जात असे.. मी कुठे गेलो आहे हे आईला समजू नये म्हणून जाताना म्हणायचो की, " मित्राकडे चाललो आहे , तिकडेच जेवण करणार आहे "..
बऱ्यापैकी अंधार पडू लागला की दबक्या पायाने घरी यायचो.. दिवसभर मी दिसलो नाही म्हणून आई शिव्या द्यायचीच पण तिने राखी बांधू नये यासाठी मी त्या ही खायला तयार असायचो.. घरी येताच भरभर जेवन करायचो आणि रूममधे जावून रूम आत मधून लाॅक करायचो.. व्यवस्थित लाॅक केल्याची खात्री झाली की मगच सुटकेचा श्वास टाकायचो.. झटपट लाईट बंद करून झोपेचं सोंग घ्यायचो.. त्या दिवशी एक वेळ कुंभकर्ण सुद्धा झोपेतून जागा झाला असता पण मी होणार नव्हतो.. तरीही मनात धाकधूक असायचीच..
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आईला विचारायचो , " कोण आलं होतं का गं घरी ".. ती नाही म्हणायची तेव्हा मला खूप आनंद व्हायचा.. ती माझ्या राखी बांधायला कधीच कशी नाही आली याचं मला नवलच वाटायचं.. मी ही तिच्या मनात असेन का..? ती ही माझ्यावर प्रेम करत असेल का..? असा माझ्या मनात जरी विचार आला तरी मागून कोणी तरी माझ्या पाठीत लाथ घालत आहे असा मला भास व्हायचा..
एके दिवशी ती मामाच्या घरी गेली होती.. ३-४ दिवस झाले तरी परत आली नाही .. मला तिला बघितल्या शिवाय एक ही दिवस राहवत नव्हतं.. मी माझी इच्छा मित्रासमोर प्रकट केली.. माझ्या एकतर्फी प्रेम प्रकरणाला एकमेव सपोर्ट कोणाचा असेल तर तो फक्त त्याचाच.. त्याच्या त्या सपोर्ट ने मला कधी मजनू तर कधी सलीम असल्यासारखं वाटायचं.. तीच्या मामाचं गाव आमच्या गावाच्या जवळच होतं.. मित्राची तिच्या मामा बरोबर ओळख ही होती.. माझी ईच्छा ऐकून तो भरल्या ताटावरून उठला आणि मला घेऊन निघाला.. मी त्याला रस्त्याने जाताना विचारत होतो की तिथे जावून काय कारण सांगायचं.. पण तो काही हू की चू करत नव्हता..
अखेर तिच्या मामाच्या गावी पोहचलो.. मामाच्या घराजवळून एक छोटासा ओढा वाहत होता, तिथे ती कपडे धुत असताना मला दिसली.. काळजात एकदम कच्च झाल्यासारखं वाटलं.. मला बघून ती ही हसली.. मामा अंगणातील आंब्याच्या झाडाखाली खुर्ची टाकून बसला होता.. आम्हाला बघून त्यांने आमचा स्मितहास्य करत स्वागत केलं खरं, पण मला मात्र अजूनही भीतीच वाटत होती..
५ - १० मिनिटे इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर मामाने मुद्याला हात घातला..
" काय काम काढलं इकडं..?" , मामाने प्रश्न केला..
आता मात्र मला घाम फुटला.. तसा मित्र बोलण्यात पटाईत होता हे मला माहीत होते पण तरी ही मनात कुठेतरी शंका होतीच..
एका सेकंदाचा विलंब ही न करता मित्र म्हणाला,
" कोंबडा बघायला आलो होतो.. याच्या बापाने सांगितले की बघ कुठं कोंबडा भेटतो का..? म्हणून याला ही घेऊन आलो "..
त्याचं हे उत्तर ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.. माझ्या खिशात दमडी ही नव्हती आणि त्याच्या ही खिशात नसेल याची मला गॅरंटी होती.. मग कोंबडा कशाचा घ्यायचा..? मी विचारात पडलो..
तेवढ्यात मामा बोलला, " माझ्याकडे फक्त दोनच कोंबडे शिल्लक आहेत.. एक माझी मुलगी येणार आहे म्हणून तीच्यासाठी ठेवला आहे.. तर दुसरा देवाला सोडायचा आहे "..
मामाचं उत्तर ऐकून मी मात्र खूष झालो.. पण मित्र मधेच बोलू लागला, " बघा.. करा कायतरी अॅडजेस्ट होत असेल तर "..
त्याच्या या वाक्याने त्याचा कानफटात मारावसं वाटलं.. नशीब शेवटी मामाच बोलला की जमणार नाही म्हणून.. तेव्हा कुठं जीवात जीव आला.. कसाबसा चहानास्ता करून आम्ही तेथून पळ काढला.. ती अजूनही ओढ्यावर कपडे धूतच होती.. जाताना तिला मी हाक मारली.. म्हणालो,
" तु कधी आलीय इकडे..? "
" ४ दिवस झाले आज " , तिने उत्तर दिले..
" मग घरी कधी येणार आहेस ".. मी डायरेक्ट मनातील बोललो..
" परवा येणार आहे ".. असे तिने सांगितल्यावर मनात छय्या छय्या डान्स करत आम्ही तिचा निरोप घेतला..
तिच्या आईला मी खूप आवडाचो.. घरात काही बनवलं की ती माझ्यासाठी थोडं पाठवून द्यायची.. एकदा दिवाळीत तीच्या आईने मला दिवाळीचा फराळ खाण्यासाठी त्यांच्या घरी बोलावलं.. सुरूवातीला नको नको बोललो मी पण शेवटी जावच लागलं.. मी सोफ्यावर बसून मोहीनी कुठं आहे हे बघत होतो.. समोरच्याच रूममध्ये ती गाणं गुणगुणत फराळाचे पॅकेटस् तयार करत होती..
समोर पडदा असल्यामुळे ती मला नीट दिसत नव्हती.. त्यांच्या घरात एक टेबल फॅन होता.. तो मी लावला आणि त्याची दिशा त्या पडद्याकडे केली.. फॅनच्या हवेने पडदा थोडा हळू लागला.. मी फॅनला आणखी पुढे सरकवलं.. आता मात्र फॅनच्या हवेने पडदा जोराने हळू लागला.. तिच्या आईच्या निदर्शनास येवू नये म्हणून फॅन Swing मोड वर ठेवला.. फॅनची दिशा पडद्याकडे गेली की पडदा बाजूला व्हायचा तेव्हा ती मला दिसायची.. माझे हे खटाटोप चालू होतेच तेवढ्यात तिची आई फराळ घेवून आली.. मला फराळ दिल्यानंतर तिने मोहीनीला हाक मारली..
" अगं बाहेर ये, काळू आलाय "..
माझं नाव ऐकून ती ही बाहेर आली.. मी तिच्याकडे एकटक बघू लागलो.. तिने जरा लाजल्यासारखे केले.. मी ही नजर हटवली..
" अरे कधी आलास..? ", तिने हातातील फराळाचे पॅकेटस् आईकडे देत देत विचारले..
" झाले ५ - ६ मिनिट " , मी ही फराळातील एक करंजी उचलत उत्तर दिले..
" अरे मग आवाज द्यायचा ना ".. एवढे बोलून ती माझ्याच बाजूला सोफ्यावर बसली..
नवरा - बायको एकत्र बसले की लोक बोलत असतात की बघा कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो म्हणून , पण आमच्या या जोडाला कोणतीच उपमा लागू होत नव्हती.. तिच्याशी बोलताना मी पार भान हरपून जात असतो.. या बोलण्याच्या नादात प्लॅटमधील फराळ कधी संपला पत्ताच नाही.. अखेर पाणी पिवून तिचा आणि तिच्या आईचा निरोप घेऊन मी तिथून निघालो..
तिची आई जितकी प्रेमळ आहे तेवढाच खडूस तिचा बाप आहे.. मी त्याला दिसलो बस.. का माझ्याकडे बटारे डोळे करून बघत असतो.. गावात त्याला बर्यापैकी मानसन्मान होता.. एक दिवशी याची जिरवायचीच असा मी बेतच करून ठेवला होता.. त्याचा दिनक्रम काय आहे यावर २-३ दिवस मी पाळत ठेवली.. त्याला एक प्राॅब्लेम होता की त्याला प्रात:विधी जास्त वेळ कंट्रोल करता येत नव्हती.. तो सकाळी ६ वाजता उठला की थेट अंगणातील टाॅयलेटमध्ये जायचा..
एके दिवशी रात्री मित्राच्या मदतीने मी त्या टाॅयलेटच्या पाठीमागील खिडकीतून काठीने टाॅयलेटची कडी आतून लावून टाकली.. तो सकाळी ६ वाजता उठला.. भरभर चालत येवून टाॅयलेटचा दरवाजा उघडू लागला पण दरवाजा काही उघडत नव्हता.. त्याला वाटलं की आत मध्ये कोणी गेला असेल म्हणून थोडा थांबून राहीला पण ५ मिनिटे झाली तरी कोणी दरवाजा उघडत नाही म्हणून परत जावून दरवाजा ठोकू लागला.. पण आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता..
उजेड पडत चालला होता.. आजूबाजूला लोकांची वर्दळ सुरू झाली होती.. आणखी वेळ वाया जावू नये म्हणून त्याने प्रात:विधीला बाहेरच कुठे तरी जावू असा विचार केला.. पण बाहेर कसं काय प्रात:विधीला जायचं म्हणून घरात जावून स्पोर्ट शुज घालून जाॅगिंगच्या तयारीत बाहेर आला.. लोकांना वाटावा की पाणी पिण्याची बोटल आहे म्हणून बोटलमध्ये पाणी भरून घेतला.. पण रस्त्याने चालताना रावसाहेब कोणत्या कंडीशनमधे आहेत याचा अंदाजा येत होता..
आमच्या गावातील जत्रा म्हणजे पंचक्रोशीतील सर्वात मोठी जत्रा म्हणून तीचा नावलौकिक आहे.. गर्दीने आणि दुकानानी गजबजलेल्या या जत्रेत अनेक प्रकारचे झोके सुद्धा आलेले असतात.. सर्वात उच्च झोक्यावर मला ही बसावसं वाटतं पण झोका फिरू लागला की माझं डोकं ही फिरू लागतं.. म्हणून मी त्यापासून जरा लांबच राहत असतो.. तिला मात्र झोक्यात बसायची खूप हौस आहे..
ती झोक्यात बसली की मी तिला न्याहलत बसतो.. झोक्याच्या चक्राबरोबर माझी मान ही त्या दिशेने फिरत असते पण तेव्हा मात्र मला चक्कर येत नाही.. का कुणास ठाऊक..? मी या जत्रेतून तिच्यासाठी कानातील झुमके घेतले.. तिला डायरेक्ट देणे मला शक्य नव्हते.. म्हणून दुसऱ्या दिवशी पहाटे तिच्या अंगणात फेकून दिले..
सकाळी तिची आई जेव्हा झाडू मारायला लागली तेव्हा तिला ते मिळाले.. ते झुमके काल मोहीनीनेच आणले असतील आणि रात्री इथे पडले असतील असे समजून आईने ते उचलून तिच्या रूममध्ये ठेवले.. मोहीनी जेव्हा सकाळी उठली तेव्हा तिला ते दिसले.. आईने तिच्यासाठी काहीतरी आणले अाहे असे समजून ती ही खूश झाली.. त्याच दिवशी तेच झुमके घालून जेव्हा मला ती दिसली तेव्हा मला चेकमेट मधील स्वप्नील जोशी असल्यासारखे वाटू लागले..
Graduation झाल्यानंतर तिचा लग्न करायचय अशी खबर उडत उडत माझ्या कानावर आली आणि माझी स्थिती देवदास पिक्चर मधील शाहरुख खान सारखी झाली.. देवदास आख्खी रात्र दारूच्या नशेत राहीला मी मात्र आख्खी रात्र अश्रू ढाळत राहीलो.. डोक्यातील मेंदूला सैतानानी काबिज केलं, त्यात नको नको ते विचार येवू लागले.. जर ती माझी होत नसेल तर तिला ही कोणाची होवू देणार नाही अशी मनाशी गाठ बांधली..
रोज तिला बघायला कोणी ना कोणी मुलगा येत असे.. मला याची खबर मिळाली की मी काही ना काही शक्कल लढवत असे.. मुलाला तिच्या घरापर्यंत पोहचू देवू नये यासाठी मी खटाटोप करत असे.. आमच्या गावाकडे येणारा रस्ता हा कच्चा होता.. त्या रस्त्यामध्ये मी खिळे ठोकलेल्या फळीचा तुकडा मातीत पुरून ठेवत असे.. बरोबर दोन्ही चाके एकदम पंचर झाली पाहिजेत अशा रितीने ती ठेवत असे.. दोन्ही चाके एकदाच पंचर झाल्याने मुलाकडच्या मंडळींची चांगलीच फजिती होत असे..
मी दूर एका झाडावर बसून त्यांची मज्जा बघत आसुरी आनंद घेत होतो.. माझ्या या सापळ्यात जवळपास १०-१२ मुले तरी सापडले असतील.. पण पुढे लोकांच्या लक्षात येवू लागले की नेमकी मोहिनीला बघायला येणाऱ्या मुलाचीच गाडी पंचर कशी होते..? त्यांनी लक्ष ठेवायला सुरुवात केली.. नाइलाजाने मला ते बंद करावे लागले..
पुढे कित्येक दिवस मला कोणताही पर्याय मिळत नव्हता.. तिला बघायला येणाऱ्या मुलांना बघून माझा पायाची आग मस्तकात जात असे.. मी ही तिला बघायला जावू का..? माझ्या मनातील गोष्ट आईला सांगू का..? विचारांच्या चक्रात मी डूबून गेलो.. न राहून शेवटी मी आईला विचारलंच..
" आई मला मोहीनी खूप आवडते.. मला तिच्याशी लग्न करायचं आहे "..
आईने एकदा माझ्याकडे बघितले आणि फक्त एवढेच म्हणाली, " पंख फुटले म्हणून कावळ्याच्या पिल्लाने आकाशात झेप नये, आपण आपल्या मर्यादा ओळखूनच हात पाय पसरावे "..
आईच्या उत्तराने काळजाला भलंमोठं भगदाड पडलं.. मी ढसाढसा रडू लागलो.. आई मला सात्वंना देवू लागली.. एवढे दिवस रडून रडून कोरडे झालेले अश्रू पुन्हा एकदा ओले झाले..तिच्या शब्दांमध्ये तथ्य होते.. आईच्या त्या एका वाक्याने डोक्यातील सैतान पळून गेला.. दोन तीन दिवस मी शांतपणे बेडवर पडून होतो.. माझं लक्ष कपाटाकडे गेले.. मी उठून कपाट खोलून बघितलं.. माझी बरीचशी पुस्तके त्यात होती.. त्या पुस्तकात एक वही होती.. हीच ती १०८ पानांची वही..
मी ती बाहेर काढली.. बेडवर बसलो.. ती वही उघडून त्यात लिहलेल्या नावांवर प्रेमाने हात फिरवू लागलो.. आई अंगणात काहीतरी करत होती.. तिच्या नकळत किचनमध्ये जावून माचिस घेऊन आलो.. त्या वहीतील एक एक पान फाडून ते जाळू लागलो.. वहीच्या प्रत्येक पानाबरोबर मी माझ्या एकतर्फी प्रेमाचा ही अंत करत होतो.. पण तिच्या प्रेमाची आठवण म्हणून त्या वहीची झालेली राख मात्र एका डबीत भरून ती साठवून ठेवली..
एक चांगलं स्थळ बघून तिच्या वडीलांनी तिचं लग्न ठरवलं.. १४ फेब्रुवारी म्हणजे नेमका " व्हॅलेटाइन डे " ला च तिचा साखरपुडा ठेवण्यात आला.. संपूर्ण गावाला निमंत्रण देण्यात आले.. मला निमंत्रण द्यायला मात्र ती स्वतः आली..
जेव्हा ती मला निमंत्रण पत्रिका देवू लागली तेव्हा असं वाटलं की एकदा तरी तिला सांगावं की मी तिच्यावर खूप प्रेम करत आहे पण काही बोलू शकलो नाही.. ती पत्रिका देवून निघून गेली.. ती निघून गेल्यावर मी पत्रिका अलगद उघडून बघितली.. त्यात सुवर्ण अक्षरात तिचे नाव लिहिले होते.. मी प्रेमाने त्याच्यावर हात फिरवू लागलो..
दुसऱ्या दिवशी दुपारी मी तिच्या साखरपुड्याच्या मंडपात गेलो.. मस्तपैकी नवारी साडीने नटून ती त्या मुलाच्या बाजूला बसली होती.. सर्व विधी संपल्यावर ती साखरेचं ताट घेऊन सगळ्या मंडळींना वाटू लागली.. साखर देत देत ती जेव्हा माझ्या समोर आली तेव्हा अचानक माझे डोळे पाणावले.. मी नजर खाली करून हात पुढे केला.. तीने माझे पाणावलेले डोळे बघितले पण काही बोलली नाही.. साखर देवून ती पुढे निघून गेली..
मी हातावर घेतलेल्या साखरेकडे बघत राहीलो.. माझ्या डोळ्यातील अश्रू त्याच्यावर पडून ती भिजून गेली आणि थोडी थोडी विरघळू लागली.. पण मी मात्र माझं प्रेम या साखरे प्रमाणे विरघळू देणार नाही.. ती तेव्हा ही माझी मानलेली गलफ्रेंड होती पुढे ही राहणार असे मनाशी बोलून मी तिथून निघालो.. थोडे अंतर पुढे गेल्यावर तिला परत एकदा बघावं म्हणून मी मागे बघितलं.. ती माझ्याचकडे बघत होती.. माझी नजर तिच्यावर पडताच क्षणी तिने तिची नजर हटवली..
मी पुन्हा पुढं पुढं चालू लागलो.............................. क्रमशः