मुठ्ठया.. ( खेकडा)
– एक आत्मकथन
तुम्ही एका ठिकाणी किती वेळ राहू शकता.
एक दिवस….एक आठवडा….एक महिना….
आम्ही एका ठिकाणी किती वेळ राहतो याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही .. का तर तुम्ही आमचा विचार कधी करतच नाही, तुम्हा माणसाला स्वतःला काय मिळेल, किती मिळेल याच्याशीच फक्त लेनंदेणं..
पाऊस पडायचा बंद झाला की आम्हाला आमच्या घरामध्ये जाऊन थांबावं लागतं.. परत कधी बाहेर निघू याचा नेम नाही. आम्हाला काही हौस नाही घरात बसून राहायचीराहायची.. तुम्हा काही माणसा सारखी आयते खाऊ अशी जात नाही आमची.. पूर्ण पावसाळ्यात आम्हाला वर्षभर पुरेल इतक्या अन्नधान्याचा साठा करून ठेवावा लागतो .
अस करणं आमचा नाईलाज आहे कारण आमचं अन्न हे फक्त पावसाळ्यातच मिळत असतो..
तुम्ही विचार करत असाल हा कोण आहे जो आम्हाला एवढे सुनावतो.. तर मी कोणी योग पुरूष नाही तर सर्व साधारणपणे शेताच्या बांधावर किंवा माळरानावर सापडणारा मुठ्ठया आहे… हो हो मुठ्ठया…. !! ज्याला तुम्ही आवडीने खाता.
साल आहे २०२०…महिना जून….
तसं साल कोणता महिना कोणता याचा आमच्याशी काहीही संबंध नाही परंतु तुम्हाला समजावा म्हणून सांगतो. मी आणि माझा परिवार जवळ जवळ ८-९ महिने आमच्या घरातच म्हणजे बिलातच राहत होतो. आमच्या परिवारासारखी जवळपास हजारो परिवार आमच्या आजूबाजूला राहतात..
अन्न संपत आलं होतं.. पाण्याचा तर विचार सोडाच कारण एवढे महिने पाणी साठवून ठेवण्यासाठी आमच्या कडे काही सिंटेक्सची टाकी नव्हती.. जेवढे शक्य असते तेवढे पाणी आम्ही साठवून ठेवतो. पाण्याची पातळी जेवढी खाली जाते तेवढा आमचा जीव वर येत असतो..
पाणी मिळविण्यासाठी आम्ही आमच्या नांग्याने खोदकाम करत असतो.. कधी पाणी मिळते तर कधी नाही. कित्येक दिवस तर आम्ही पाण्यावाचून तहानलेलेच राहतो आणि मग पावसाची वाट बघत बसतो..
आज मात्र वातावरणात काहीसा बदल झाल्यासारखे दिसत होते.. आकाशात ही ढगाळ वातावरण निर्माण झाल्या सारखं वाटत होते.. विजांचा हलकासा आवाज सुद्धा येत होता.. आज पाऊस नक्की पडेल असे वाटत होते..
हे काय…..पाऊस आला…. पाऊस आला…. !
पावसाच्या रिमझिम सरी सोबत वारा. … आहाहा… काय दृश्य आहे.. आम्ही सगळे जण पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर निघालो.. सगळे कसे आनंदी दिसत होते.. बरेच महिने आम्ही मित्र भेटलो नव्हतो.. आज पावसाच्या निमित्ताने मात्र सगळे एकमेकांना भेटू शकलो. किती आनंद झाला , तर शब्दात सांगू शकत नाही एवढा आनंद झाला..
अचानक वाऱ्याचा वेग वाढला, झाडे कोलमडून पडू लागली, पावसाच्या धारा सुद्धा मोठमोठ्यानं बरसू लागल्या. भयभीत होवून आम्ही सगळे जण आपआपल्या घरात जाऊ लागलो. सलग ३-४ तास पाऊस पडत राहीला.. हळूहळू अंधार पडू लागला.. बरेच तास पावसाने निसर्गाला झोडपून काढल्यानंतर मात्र थोडासा विराम घेतला.. फक्त रिमझिम पावसाचे थेंब तेवढे टीप टीप पडत होते..
आम्ही सगळे जण परत बाहेर निघालो, पुन्हा एकदा पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागलो. आम्हाला लांबून कसला तरी प्रकाश जवळ येताना दिसत होता, पण आम्ही कोणीही त्या कडे लक्ष दिले नाही. आम्ही सर्व जण बेधुंद होवून पावसाचा आनंद घेत होतो..
अचानक मला कसलातरी स्पर्श झाला, अचानकपणे झालेल्या त्या स्पर्शाने मी एकदम घाबरून गेलो. समोर बघतो तर काय.. एक माणूस मला पकडत होता, काही करण्याअगोदरच त्याने मला उचलून बरोबर आणलेल्या एका भांड्यात टाकले.. हळूहळू त्याने माझ्या सगळ्या परिवार व मित्रांना सुद्धा पकडून भांडयात टाकले..
आज मी मृत्यूच्या दाढेत उभा आहे, हा माणूस मला कधी खाईल देव जाणो.. परंतु पावसाचा हा पहिला दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरेल हे मात्र नक्की……