निरगुरा डोंगर…
-एक जीव घेणा प्रवास
‘ जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही ‘ तसचं काहीसा आजकाल आमच्या बाबतीतही घडत आहे.. मागील रविवारी डोंगर नवरा-नवरीचा थरार अनुभवल्यानंतर विचार केला होता की पावसाळ्यात परत असे अवघड डोंगर नकोच… परंतु या आठवड्यात हवं तेवढं पाऊस न पडल्याने आमच्या लिस्ट मधील या डोंगराचा प्रवास करूनच घ्यावा, नाहीतर पाऊस पडल्याने ह्या डोंगरावर चढणं शक्य होणार नाही असा विचार आम्ही सर्वांनी केला आणि याच डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला.. बोलतात ना की ‘ विनाश काले विपरीत बुद्धी ‘… हेच ते… ते कसं काय हे तुम्हांला नंतर कळेलच…
निरगुरा डोंगर… श्रीमलंग गडालाच ( हाजी मलंग गड ) लागून असलेला एक छोटासा डोंगर…सह्याद्री पर्वतरांगेतील हा शेवटचा डोंगर असावा…वावंजे मार्गे जर तुम्ही मलंग गडावर जात असाल तर तुमच्या बरोबर डाव्या हाताला जो डोंगर आहे ना तोच तो..या डोंगरावर चढण्याचे रस्ते तसे खूपच आहेत , त्यापैकी कोणत्या रस्त्याने वर चढायचं हे तिथं गेल्यावरच ठरवू असा निर्णय आम्ही घेतला.. एखादं मंत्रीमंडळ ही जेवढे निर्णय घेत नसतील तेवढं आजकाल आम्ही घेत असतो आणि ते ही सर्व च्या सर्व एकमताने..कारण इथं आम्हाला कोणच विरोधक नाही…
आता पर्यंत जेवढे डोंगर आम्ही चढलो आहोत त्यापैकी कोणत्याही डोंगरावर आम्ही ठरवलेल्या टार्गेट पर्यंत पोहचू शकलो नाही.. तशी प्रत्येक वेळेची कारणे ही वेगवेगळी आहेत , परंतु आजचा डोंगर हा इतर डोंगरांच्या मानाने छोटा असल्याने आम्ही सहज पार करू असा आम्हाला आत्मविश्वास होता… कारण आज आम्ही त्या डोंगराची पूर्ण माहिती असणाऱ्या एका अनुभवी मित्राला बरोबर घेतला होता..डोंगराच्या जवळपास पायथ्याशीच एक आदीवासी वाडी आहे , इथं पर्यंत बाईकने प्रवास करता येतो… त्या गावापाशी बाईकने जात असताना मी मित्राला विचारले की आपल्याला कोणत्या मार्गाने वर जायचे आहे.. त्यांनी हाताने इशारा करून दाखवले…
समोरचा दृश्य पाहून मी आवाकच झालो.. कारण त्याने ज्या रस्ताने जाण्याचा इशारा केला होता , त्या रस्ताने जायचा धाडस फक्त रानटी पशूंनीच करावा एवढा खतरनाक रस्ता.. रस्ता कसला मौत का कुवाँ च होता तो.. एकदम भींतीसारखा सरळ दिसणारा कडा.. आधारासाठी कोणतंही झाड नाही की दगड नाही.. आज पर्यंत आम्ही जो काही प्रवास केला होता त्या प्रवासातील रस्ता हा पायथागोरसच्या प्रमेयातील कर्णाच्या Slope सारखा असायचा , परंतु हा रस्ता भूमितीमधील १६ प्रमेयांपैकी कोणत्याही प्रकारचा नव्हता हे मी ठामपणे सांगू शकतो..बहुधा आज १७ व्या प्रमेयाचा शोध लागणार होता..मी त्या रस्त्याने जायला स्पष्ट नकार दिला… आज पहिल्यांदाच आमच्या प्रवासाच्या मंत्रीमंडळात एका विरोधी पक्षनेताची भूमिका मला पार पाडावी लागणार होती आणि ते आवश्यक ही होतं कारण आम्हाला फक्त वर जायचं होतं Direct वर नाही…
अनुभवी मित्र बोलला की, ” हा डोंगर फक्त लांबूनच खतरनाक दिसतो , परंतु आपल्याला वर चढायला बऱ्यापैकी रस्ता आहे.. मी या अगोदर ही गेलो होतो. “
शेवटी मीच हारलो. एकमताच्या निर्णयाची जागा आज बहुमतांनी घेतली ..माझ्या इतर मित्रांनी सुद्धा त्याच्याच शब्दावर विश्वास ठेवला आणि सुरू झाला एक जीव घेणा प्रवास…
नदीच्या पात्रातून प्रवासाला सुरुवात झाली.. सुरूवातीला काहीच वाटलं नाही, परंतु जसजसे पुढे जावू लागलो नदीच्या पात्रातील भले मोठे दगड पार करणे अवघड होवू लागले.. एखादा दगड पार करतो नी करतो लगेच दुसरा दगड समोर दिसायचा.. बहुधा वर न दिसणारे सगळे दगड खालीच येवून पडले असावेत असे वाटू लागले.. नशीब नदी पात्रात पाणी नव्हते, नाही तर प्रवास अजून ही मुश्किल झाला असता… मजल दरमजल करत करत आम्ही पायथ्याशी पोहोचलो… वर बघितल्यावर असे वाटू लागले की एखाद्या गोवंडयाने भिंतीची लेवल बघण्यासाठी जरी ओळंबा सोडला ना तरी तो सरळच खाली येईल एवढा तीव्र उतार…
या डोंगरावर जाण्यासाठी दोन टप्पे आहेत.. पहिल्या टप्प्यावर मनमोहक असा धबधबा आहे, परंतु पाणी नसल्याकारणाने तो कोरडाच दिसत होता तर दुसऱ्या टप्प्यावर सपाटी आहे.. हाच आमचा टार्गेट पाॅईंट …धबधब्या जवळ पोहचण्यासाठी अनुभवी मित्र पुढे निघाला.. आज आम्हाला सुरूवातीपासूनच Harness लावावा लागला.. अनुभवी मित्राला ना Harness ची गरज होती ना रस्सीची…त्याने रस्सीचे एक टोक पकडले आणि डोंगरावर चढू लागला.. सरळ न जाता कधी उजव्या बाजूला जायचा तर कधी डाव्या बाजूला..ह्याच टेक्निकच्या साहाय्याने आम्हाला वर जावं लागणार होते.. बऱ्यापैकी वर गेल्यावर तो हातात नेलेली रस्सी कुठंतरी बांधायचा व हाताने सुद्धा पकडून ठेवायचा , मग आम्हाला चढायला सांगायचा..
आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून बिनधास्त चढायचो .. वर गेल्यानंतर समजायचे की त्याने रस्सी ही एखाद्या रानटी केळीला बांधलेली असायची.. मनात प्रश्न यायचा की जर आपण घसरलो तर आपला वजन हे केळीचं झाड Hold करेल का..? आमच्या कडे दुसरा पर्याय पण नव्हता.. आम्ही जरा जपूनच पाऊल टाकायचो जेणेकरून घसरू नये.. माझ्या पाठीवर भरगच्च भरलेली बॅग होती..त्यात जेवण , पाण्याच्या बाटल्या होत्या.. साधारणत: वजन ५-६ किलो असेल.. इथं स्वत:ला चढणं मुश्किल तिथं एवढा वजन.. माझी पाठ दुखू लागली.. सुरूवातीला हे वजन Nothing वाटत होते पण जसं जसं वर जात होतो, तसंतसं वजन आपोआप वाढल्यासारखे वाटायचे…
आता पहिला टप्पा जवळ आलेला दिसत होता.. जवळपास ३ मजली इमारती एवढा ऊंच असेल असा हा धबधबा जरी दुरून कोरडा दिसत असला तरी पाण्याच्या छोट्याशा धारेने मनमोहक दिसत होता.. आमची तिथं जाण्याची आतुरता वाढली.. उत्साहाने आणि सावधगिरीने चढत शेवटी आम्ही तिथं पोहचलोच.. पहिला टप्पा यशस्वी रीत्या पार पाडल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.. पोहचता क्षणी मी धबधब्या खाली गेलो, टपटप पडणारे पाण्याचे छोटे छोटे थेंब.. दवबिंदू पडल्यासारखे वाटत होते.. चेहऱ्यावर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी सगळा थकवा क्षणार्धात निघून गेला.. मी डोळे मिटून त्याचा आनंद घेऊ लागलो..
फक्त २०० मीटरचा प्रवास करायला आम्हाला जवळपास दीड तास लागला होता अजून ३०० मीटर प्रवास बाकी होता.. आम्ही सकाळी घरून नास्ता करूनच निघतो त्यामुळे टार्गेटवर पोहचल्यावरच जेवण करत असतो..आज मात्र इथंच जेवायचा विचार केला.. झणझणीत कोकणी पद्धतीचं चिकन आणि तांदळाच्या भाकरी.. आजचा मेनू जीभेला पाणी सुटेल असाच होता.. आम्ही सगळ्यांनीच ताव मारला क्षणार्धात जेवण फस्त.. कोकणी रस्याची चव अजूनही जीभेवरच आहे.. १०-१५ मिनिटे आराम केल्यानंतर पुढील प्रवासाला आम्ही सुरूवात केली.. माझ्या पाठीवरील वजन कमी झाला होता मात्र पोटामधील वाढला होता… म्हणजे परिस्थिती ‘ जैसे थे ‘च होती..
आम्ही जेवत होतो तेव्हा दोन १५-१६ वर्षांची आदिवासी मुले आम्हाला दिसली होती, त्यांना आम्ही बोलावून आमच्याबरोबरच जेवण दिलं.. ते ही असेच फिरण्यासाठी आले होते.. त्यांना पण वर जायचे असल्याने ते ही आमच्या बरोबरच येवू लागले.. ही दोन्ही पोरं जरा चपळच दिसत होती, कसलाही आधार न घेता ही सपासप चढत होती.. आम्ही मात्र रस्सीच्याच साहाय्यानेच चढत होतो..
एका ठिकाणी खूप अवघड रस्ता होता, अनुभवी मित्र कसा तरी रस्सी घेऊन वर गेला आणि आम्हाला आवाज दिला की चढा.. मी चढू लागलो, सावधगिरीने पाऊलं टाकत टाकत रस्सीचा मधेमधे आधार घेऊन वर चढत होतो आणि वर चढताच मला धक्काच बसला कारण त्याने रस्सी कशालाच बांधली नव्हती.. मुळात रस्सी बांधण्यासाठी तिथं काहीच नव्हतं.. मी ज्या भरवशावर वर आलो होतो तोच भरवसा तिथं नव्हता.. केवल मित्रानेच रस्सी पकडून ठेवली होती… माझं वजन आणि सरकलो असतो तर मिळणारा एकदाच जोराचा हिसका याला पेलवला असता का ?.. मी त्याच्याकडे बघून विचार करत होतो.. तो मात्र आत्मविश्वासाने माझ्याकडे बघून स्मितहस्य करत होता.. त्याला त्याच्या ताकदीवर आणि पायाच्या Grip वर भरवसा होता..
मी वर येऊन रस्सी घट्ट पकडली.. बाकीच्या मित्रांना आवाज दिला. ते ही वर येवू लागले फक्त आमच्या भरवशावर.. मी रस्सी पकडून उभाच होतो तेवढात मला समोरून माझ्याच दिशेने येणारा साप दिसला.. फुरसे जातीचा साप होता तो.. मला बघताच क्षणी तो थांबला.. बहुधा अगोदर मी त्याला दिसलो नसेन.. मी मित्रांना आवाज दिला , मित्र ही थबकले आणि होते तिथेच थांबले.. साप परत माघारी गेला.. मित्र वर आले.. प्रत्येक प्रवासात मला साप दिसतातच, कदाचित माझी रास ही राक्षसगण असावी असे मित्र बोलतात..
पुढे बरेच असे अवघड रस्ते होते.. एका ठिकाणी मी थांबलो असता मला भास होवू लागला की मी खाली बघत आहे आणि मला चक्कर येत आहे.. ४-५ वर्षापूर्वी मी असाच एका पाण्याच्या टाकीवर चढलो होतो आणि मला चक्कर आली होती .. मी शिडीला घट्ट मिठी मारून डोळे मिटून राहीलो होतो… ते मला आठवू लागलं.. इथं तर मिठी मारायला सुद्धा काहीच नव्हतं.. मला चक्कर येणार , मी पडणार असे मला वाटू लागले.. मी मित्रांना आवाज दिला, ” मला चक्कर येत आहे , मला रस्सीची आवश्यकता आहे “.. वर जाणारा मित्र तिथंच थांबला , त्याच्या Harness मधून रस्सी काढून माझ्या दिशेने फेकली.. मी माझ्या Harness ला रस्सी अडकवली आणि भरभर चढत सुरक्षित ठिकाणी जाऊन बसलो..
तुम्हाला जर उंचीचा Phobia असेल तर तुम्ही कधीच असा जोखमीचा प्रवास करू नका.. कारण कोणत्या क्षणी काय होईल याचा नेम नाही.. हा हा करता आम्ही ठरवलेल्या टार्गेट पर्यंत पोहचलो.. आज पहिल्यांदाच अस घडलं होतं पण त्यासाठी आम्ही खूप मोठी जोखीम घेतली होती.. वर सपाटीवर गेल्यानंतर आम्ही हिरव्या गवताच्या चादरीवर , डोळे मिटून दोन मिनिटे पडून राहिलो… किती मस्त वाटत होते.. वरून जेव्हा खाली बघितलं तर डोळे तृप्त व्हावेत असा नजारा.. Wow

आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडू लागले.. वर चढत असताना एका केळीच्या झाडामधून आम्ही ‘ पोकटा ‘ काढला होता.. पोकटा म्हणजे केळीच्या झाडाचं खोड…फक्त ठराविक केळीच्या झाडांमधेच हे खाण्यालायक खोड असतं..इथं वर बसून आम्ही तो खाण्याचा आनंद सुद्धा घेतला..
वर एका ठिकाणी हानिफ बाबाची गुफा आहे.. असे म्हणतात की तो इथेच राहत असे.. लोक इथं दिवसा यायला घाबरतात हा बाबा मात्र रात्री इथं कसा राहत असेल..त्याला हिंस्त्र प्राणी किंवा सापांची भीती वाटत नसेल का..? आम्ही विचार करू लागलो.. आम्ही त्या गुफेत गेलो.. आदिवासी लोक तिथे आले होते.. हानिफ बाबा नंतर दुसरा एक बाबा आता तिथं येवून राहत आहे.. त्याने त्या आदिवासी लोकांसाठी बिर्याणी बनविली होती.. हा व्यक्ती का बरं इथं येवून राहत असेल.. ? याला कुटुंब नाही का..? जगाशी याच काहीच लेनंदेनं नाही का..? असा विचार करत करत आम्ही परतीचा मार्ग पकडला.. परत येताना आम्ही पायऱ्या असणारा मार्ग निवडला.. अर्ध्या तासातच आम्ही बाईक लावलेल्या ठिकाणी येऊन पोहोचलो..
मी मित्राच्या बाईकवर बसलो..येताना मी मागे वळून त्या डोंगराकडे बघू लागलो.. मला विश्वासच बसत नव्हता की आम्ही त्या मार्गानेच वर गेलो होतो…
‘ विनाश काले विपरीत बुद्धि ‘ .. अशीच परिस्थिती होती , परंतु ‘ देव तारी त्याला कोण मारी ‘ …म्हणूनच बहुधा आम्ही सुखरूप घरी परत आलो होतो…