पेबगड…
– ऐतिहासिक किल्ला
माथेरान…
– जळूची दहशत
जवळपास ६-७ डोंगराचा प्रवास केल्यानंतर थोडाफार अनुभव येत चालला आहे.. तसे डोंगर चढणे आता आमच्या ‘ बाये हात का खेल ‘ बनला आहे.. मनातील भीती तर निघूनच गेली आहे.. आता जरी पाय घसरून मरण आले तरी वीरगती मिळेल अशीच भावना आमच्या मनात उत्पन्न झाली आहे.. तसे आम्ही ९९.९९ टक्के सुरक्षितच प्रवास करतो पण कधी काय होईल हे सांगता येत नाही.. काहीतरी होईल म्हणून सुट्टीचा दिवस घरातच बसून घालवण्यापैकी आम्ही नाहीत..कारण नशीबावर विश्वास ठेवण्यापेक्षा नशीब घडवण्यावर आमचा जास्त विश्वास आहे.. हेच ध्येय मनात ठेवून आम्ही डोंगर प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे.. गाडीने प्रवास करून पायथ्याशी जायचं आणि तिथून पुढे ११ नंबरच्या बसने.. असाच आमचा नेहमीचा प्लॅन..
आज निवड केलेल्या डोंगराला ऐतिहासिक असे महत्त्व आहे.. पेबगड/पेब किल्ला..याला विकटगड असे ही म्हणतात.. गडावर असणाऱ्या पेबी देवीच्या मंदिरामुळे या गडाला पेबगड म्हणतात असे तेथील स्थानिक लोक बोलत होते..श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरण स्पर्शाने पावन झालेला गड अशी ह्याची ऐतिहासिक ओळख.. कोंबल टेकडी या आदिवासी वाडीतून या डोंगरावर जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.. माझा भाऊ या वाडीतील शाळेवर बरेच वर्षे शिक्षक म्हणून होता, त्यामुळे त्याला बऱ्यापैकी येथील परिसराची ओळख होती.. या प्रवासात तो ही आमच्या बरोबर येण्यास तयार झाला, शिवाय त्याने तेथील एका स्थानिक मुलाला ही बरोबर घेतला जेणेकरून त्या गडाची संपूर्ण माहिती आम्हाला मिळावी.. तो मुलगा आता आमचा Local Guide झाला होता..
Trekking चा ग्रुप जेवढा मोठा तेवढी मजा जास्त.. आजचा आमचा ग्रुप हा अगोदरच्या इतर प्रवासांपेक्षा मोठा होता.. त्यामुळे खूप मज्जा येईल हे मात्र नक्की..
नेहमीच्या बरोबर असणाऱ्या साहित्यांची यादी आता तुमची ही पाठ झाली असेल म्हणून परत परत नको..आता मुद्याचं तेवढच बोलतो..गाईड असल्याने रस्ता चुकण्याचा आज प्रश्नच नव्हता.. आज नुस्त भरभर चढायचं आणि क्षणाक्षणाचा आनंद लुटायचा एवढचं..मागील आठवड्यापासून पाऊस धो-धो पडत असल्याने डोंगरावरील सर्व ओहळ तुडुंब भरून वाहत होते..त्यामुळे आम्हाला वाटेत जाताना असंख्य असे छोटे- मोठे कित्येक धबधबे बघायला मिळत होते.. आता जातानाच धबधब्याखाली नको कारण भिजल्यावर चालणे जरा अवघडच होते याचा प्रत्यय आम्हाला मागील प्रवासात बऱ्याच वेळा आलेला आहे..
आम्हाला वर चढण्याची घाई कधीच नसते..वाटेतील प्रत्येक गोष्टीची आम्ही मजा घेतच वर जात असतो.. गाईड प्रत्येक ठिकाणाची पद्धतशीर माहिती देत होता.. पण ठाकरी भाषेत.. ठाकरी भाषा आम्हाला ही येते, त्यामुळे कोणताच प्राॅब्लेम नव्हता..हिरवळीची चांदर संपूर्ण परीसरात पसरलेली होती.. एवढे सुंदर दृश्य फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळते.. पण त्यासाठी वर चढावा लागतो.. रस्ताने जाताना खूप सारी आलूची झाडे पाहायला मिळत होती.. त्यावर हिरवेगार असे लिंबू पेक्षा थोडे मोठे आलू आलेले होते.. असे म्हणतात की हा फळ पिकल्यानंतर जास्त वेळ टिकत नाही खूप गोड असल्याने त्याला लगेच कीड पकडते आणि गळून खाली पडते..प्रत्येक झाडाखाली अर्धवट पिकलेल्या आलूंचा सडा पसरलेला दिसत होता.. खाण्यालायक एक ही आलू नव्हतं.. हे फळ मला खूप आवडतं.. लहानपणी मी झाडावरून कच्चे आलू तोडून आणायचो आणि भाताच्या पेंढ्यात ते पिकत ठेवायचो..
जसजसे आम्ही पुढे जात होतो तसतसे प्रत्येकाच्या तोंडून आपसूकच Wow..

Wonderful..

असे शब्द निघत असत.. या गडाच्या सभोवताली असंख्य अशा डोंगरांचा संच आहे.. जे या गडाचे महत्त्व आणखीनच अधोरेखित करतात..गप्पा-गोष्टी करत करत मध्येच एखादा जोक मारत आमचा प्रवास आनंदाने चालला होता.. आता आम्ही गडाच्या मुख्य भागात पोहचलो होतो.. सुरूवातीलाच एक छोटसं हौद दिसलं, गाईड बोलला की हे हौद जरी छोटं दिसत असलं तरी खूप खोल आहे आणि यातील पाणी अजून पर्यंत कधीच आटलं नाही.. त्यात उडी मारून त्याची खोली मोजायला आम्ही काय ‘ गोताखोर ‘ नव्हतो..मुकाच तेथून निघून पुढे जावू लागलो..
गडावर २-३ फुट ऊंचीच्या १५-२० मीटर लांबीच्या अशा अनेक गुफा होत्या.. त्यातील बऱ्याच गुफा पावसाच्या पाण्याने भरलेल्या होत्या.. एक मात्र रिकामीच होती.. त्यात शिरून आतमध्ये काय आहे ते बघायला आम्ही सगळेच उत्सूक होतो , पण पहीला आत मध्ये जायचे धाडस करेल कोण हा एक प्रश्नच होता.. अखेर मी आत जाण्याचा विचार केला.. मोबाईलची Torch

लावली , व्हिडिओ आॅन केली आणि धीरेधीरे Duck Walk सारखं चालू लागलो..मनात भीती होती पण दाखवत नव्हतो कारण मागून येणारे माझ्याच भरवशावर आत येत होते.. मी जर मागे फिरलो असतो तर आत मधील Scene बघण्यापासून आम्ही सगळेच वंचित राहीलो असतो..आत मध्ये खूप कोंडट वास येत होता.. पक्ष्यांच्या विष्टेचा वास होता तो..एक मित्र जोरात ओरडला की हा अमोनिया वायूचा वास आहे.. खूप विषारी असतो..कोणीही तोंडाला हात लावू नका.. या मित्राला सगळंच कस माहीत असतं.. मागील प्रवासात ही याने बरेच असे काहीना काही आम्हाला सांगितले आहे..आम्ही याला आजपासून ‘ गुगल मित्र ‘ च म्हणू..
आत जाताना गुदमरल्यासारखं वाटत होतं.. बाकी मित्र मागे येण्याचा सल्ला देत होते आणि माघारी फिरण्याच्या बेतात ही होते.. पण नाही मी मागे फिरलो आणि नाही त्यांना माघारी जाऊ दिलं.. गुफेत एक ५-६ फुटाची लोखंडी शिडी लावलेली होती.. तेथून उतरून थोडंस पुढे गेल्यावर गुफेचा गाभारा दिसू लागला.. भरभर चालून अखेर तिथे मी पोहचलोच..आत मध्ये ३-४ लोक एैसपैस झोपू शकतील एवढी जागा होती.. शिवाय तिथे फरशी ही लावलेली होती.. ही आताच्या कालातील असेल .. मी आत पोहचल्यावर सगळ्यांना आवाज दिला.. ते ही येवू लागले.. ते येताच कोणत्यातरी कोपऱ्यात बसलेले दोन पक्षी गिरट्या घालू लागले.. आम्ही सुरूवातीला जरा घाबरलोच.. शेबंरी / पातेरी जातीचा पक्षी होता तो.. साधारणत: वटवाघूळाला सारखा दिसणारा परंतु अतिशय छोटा पक्षी.. आत न येणाऱ्या मित्रांना ही आम्ही बोलावून घेत होतो.. जर तुम्ही आला नाहीत तर आयुष्यात तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्कीच राहील की गुफेच्या अगदी तोंडापासी होतो , मित्र ही आत होते , फक्त थोडं धाडस केलं असतं तर गुफेतील सुंदर असे ठिकाण बघण्याचे साक्षीदार झालो असतो.. Duck Walk चालून पाय दुखू लागले होते.. थोडा वेळ थांबून आम्ही सगळे बाहेर निघालो.. ‘ आज का फिल कुछ ओर ही था ‘ असे प्रत्येकाला वाटू लागले होते..
गुफेतून निघून थोडे पुढे गेल्यावर एक भली मोठी दुसरी गुफा दिसली..हाच पेबगडाचा मुख्य भाग..ही गुफा महाराजांच्या काळात धान्याचे कोठार म्हणून वापरली जात होती.. जवळपास ३० बाय ३० फुट लांबीची आणि २०-२५ फुट उंचीची ही गुफा असेल.. आता या गुफेचे दोन भागात विभाजन केले आहे.. मध्यभागी ५-६ फूट उंचीची भिंत पण त्याला छोटासा बोगदा पाडलेला आहे.. गुफेतील एका बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला श्री गजानन महाराजांची मूर्ती बसवलेली आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर उभे राहून आम्ही ‘ शिवाजी महाराज गारद/शिवगर्जना ‘ केली.. छत्रपती शिवाजी महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा/ललकारी दिली जायची तिला गारद असे म्हटले जाते. गारद ला दुसऱ्या भाषेत बिरुद किंवा बिरुदावली तर ऊर्दु भाषेत अल्काब असे म्हणतात..
दर्शन घेवून आम्ही सगळे जण गुफेच्या बाहेर आलो..आमच्या सारखाच दुसरा एक Trekking Group ही तिथे आला होता.. गुफेच्या बाहेरच एका कोपऱ्यात बसून आम्ही जेवणाचा आनंद घेवू लागलो.. रिमझिम पडणारे पाऊस त्यात संथ वाहणारा वारा आणि समोरची हिरवळीने झाकून गेलेली खोल दरी.. अशा वातावरणात फिरण्याची मौज काही वेगळीच असते.. रिमझिम पडणाऱ्या पावसाने आता रूद्र रूप धारण केले होते.. क्षणार्धात धुक्याने आजूबाजूचा संपूर्ण परीसर व्यापून टाकला.. समोरचं १० फूटावरी माणूसही पुसटसा दिसू लागला.. आता आम्हाला गडाच्या वरच्या भागा वर जायचं होतं.. धुक्यातून वाट काढत आम्ही वर – वर जात होतो..समोर एक ढासळलेला बुरूज दिसत होता.. येथून वर चढायला अवघड असल्याने येथे एक भली मोठी लोखंडी शिडी लावलेली होती.. त्याच्या सहाय्याने आम्ही वर चढू लागलो.. वर चढताच गडावरील दुसरा हौद आम्हाला दिसला.. मागच्या हौदा पेक्षा हा जरा मोठाच होता..थोडे अंतर चढल्यानंतर आम्ही अशा कड्यावर जावून पोहचलो जिथून जवळपास २५ – ३० मैलाचा भाग स्पष्टपणे दिसला असता पण धुक्यामुळे त्या क्षणाचा आनंद आम्हाला घेता आला नाही.. पाऊस ओसरून धुकं जाईल अशी चिन्ह पण दिसत नसल्याने आम्ही आमचा मोर्चा पुढच्या दिशेने सरकवला..
आता आमच्या समोर दोन रस्ते होते एकीकडे दत्त मंदिराकडे जाणारा रस्ता तर दुसरीकडे महाराजांच्या काळातील तोफखाना असलेले ठिकाण.. गाईडने आम्हाला सांगितले की २६ जुलै २००५ साली जो महापूर झाला त्यावेळी दरड कोसळून तिथे असलेली तोफ गडाखाली पडली होती.. पुरातत्त्व खात्याने तीला उचलून नेलेली आहे.. आम्ही सर्व जण दत्त मंदिराच्या दिशेने निघालो.. गडावरील सर्वात ऊंच ठिकाणावर हे मंदिर आहे.. येथून चारी दिशांकडचा परीसर पाहता येतो पण पावसाचा जोर आणि पसरलेले धुके यांनी ह्या ठिकाणाचा पण आनंद आम्हाला घेवू दिला नाही.. आता पुढे जायचे का इथूनच मागे फिरायचा असा आम्ही विचार करत होतो..आम्ही सकाळी लवकर आल्याने आमच्याकडे तसा खूप वेळ होता..गडाच्या दुसऱ्या बुरूजाच्या अगदी समोरच माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण आहे.. या बुरूजावरून माथेरान मधील पॅनोरमा हा पाॅईंट समोरच दिसतो.. या पाॅईंटच्या खालच्या बाजूस माथेरान मधील प्रसिद्ध असा कड्यावरचा गणपती आहे.. जवळपास ४०-५० फुटाची मूर्ती ही डोळ्याची पारणे फिटावी अशीच आहे असे आम्हाला गाईडने सांगितले.. आमच्याकडे वेळ असल्याने ते ठिकाण बघून येण्याची सर्वांची इच्छा झाली.. मग काय निघालो त्या दिशेने..
कड्यावरच्या गणपतीकडे जाणारा रस्ता जरा भयानकच होता..आजूबाजूला सगळे धुकेच धुके असल्याने आम्हाला फक्त रस्ता तेवढाच दिसत होता.. एका ठिकाणी तर एक भला मोठा दगड शंकर महादेवाने एका पायावर उभे राहून जशी Pose द्यावी त्याच प्रमाणे उभा असलेला दिसत होता..आज ना उद्या तो पडेल असा ही अंदाज त्यावरून लावता येवू शकत होता.. आज जर इथं बाहुबली असता तर त्याने तो उचलून नक्कीच बाजूला ठेवला असता असा पुसटसा विचार हि माझ्या मनात येवून गेला .. येथून खाली उतरण्यासाठी दोन लोखंडी शिड्या एकमेकांना जोडून लावलेल्या आहेत.. त्या जरा हालतच असतात पण सुरक्षित आहेत.. पुढचा रस्ता U आकाराच्या दोन कड्यामधून जातो.. हे गडावरील सर्वात सुंदर ठिकाण.. दोन्ही बाजूला उंच असे कडे आणि समोर गढूळ पाण्याचे मोठमोठे धबधबे.. पाहताना असे वाटत होते की तासभर इथेच बसून ते निहालत रहावे.. रस्त्यातून जाताना गाईडने एका रानटी केळीच्या झाडातून पोकटा काढून आम्हाला खायला दिला.. यास रानमेवा असेही बोलतात.. रानटी केळीचे हे खोड असते.. ठराविक केळीच्या झाडांच्या मध्येच हे खाण्यालायक खोड असते.. रानमेव्याचा स्वाद घेऊन आम्ही कड्यावर च्या गणपतीच्या दिशेने रवाना झालो..
५-१० मिनिटाच्या आतच लांबून आम्हाला कड्यावर च्या गणपतीचा काहीसा भाग दिसू लागला.. बघण्याची ओढ वाढू लागली.. गाइडला मागे टाकून आम्ही त्या दिशेने धावू लागलो.. धावत जाऊन आम्ही चूकीचा रस्ता पकडला आणि कड्यावरच्या गणपती ठिकाणी न जाता त्याच्या वरच्या कड्यावर गेलो.. गाइडने परत आम्हाला बोलावून घेवून दुसऱ्या रस्त्याने कडवरच्या गणपतीच्या ठिकाणी नेलं.. अबब..! एवढा मोठा गणपती..! त्या गणपतीच्या पायाशी बसलेला उंदीर मामा ही आमच्यापेक्षा मोठा होता.. या ठिकाणावरून गणपतीचं दर्शन हवं तसं घेता येत नाही.. फक्त चरण स्पर्श तेवढचं काय ते करता येते.. गणपतीचं मुखदर्शन घेण्यासाठी आम्हाला माथेरानच्या पॅनोरमा पाॅईंटच्या दिशेने जावं लागणार होतं.. सर्वांना बघण्याची उत्सुकता असल्याने आम्ही सगळेच तिकडे जावू लागलो.. वर चढल्यावर आम्ही माथेरानला जाणाऱ्या मिनी ट्रेन च्या पटरीवर येवून पोहोचलो.. ही ट्रेन कर्जत तालुक्यातील नेरळ येथून निघून माथेरान च्या मुख्य बाजार पेठेत जाते.. कोणाला जर माथेरानला जायचं असेल आणि चालण्याचा त्रास होत असेल तर त्याने या ट्रेनने जाणे अतिउत्तम.. या पटरीवरून चालत आम्ही अशा ठिकाणावर पोहचलो जिथून कड्यावरच्या गणपतीचे संपूर्ण दर्शन घेवू शकत होतो.. पण इथं ही आमच्या आड धुके आलं.. पण बऱ्यापैकी दर्शन होत होतं..
आता पुढे काय..? आल्या मार्गे परत जाणे की दुसऱ्या मार्गाने जाणे..गाइडने दोन पर्याय सुचवले.. दोन्ही कडून वेळ सारखाच लागणार होता.. दुसऱ्या मार्गाने गेलो तर आणखी काहीतरी नवीन बघता येईल या विचाराने आम्ही दुसऱ्याच मार्गाचा स्वीकार केला आणि येथून सुरू झाली अंगावर शहारा आणणारी घटना..
हा रस्ता माथेरानच्या मुख्य बाजार पेठे जवळून माथेरानच्या एका कड्यावर घेऊन जातो.. तिथून धोधाणी या आदीवासी वाडीत हा रस्ता निघतो.. काही पर्यटक याच रस्ताचा अवलंब करतात.. आम्ही प्रवास सुरू केलेल्या कोंबल टेकडी या आदीवासी वाडी पासून हे ठिकाण जवळच असल्याने आमच्यासाठी ही हा रस्ता सोईस्कर होता.. आता पर्यंत अवघड रस्त्याने चालून आम्ही ही थकून गेलो होतो.. कड्यावर जाईपर्यंत संपूर्ण रस्ता हा सपाटच असल्याने आम्ही सगळेच खूष होतो.. आता नुसती मजाक मस्ती करत आमची धमाल चालू होती.. ट्रेनच्या पटरीवरून जात तोल सावरत चालताना आम्ही एकमेकांची मस्करी करू लागलो.. खूप चालून सुद्धा बाजार पेठ येत नव्हती..
” अजून किती लांब आहे बाजार पेठ ..? ” , मी गाइडला विचारू लागलो ..
” हे काय ५ मिनिटाच्या अंतरावर ” , त्याने उत्तर दिले..
” मी थोडा बसतो ईथे , तुम्ही चला पुढे , मी येतो मागून धावत.. ” , मी मित्रांना बोललो..
ते माझी थट्टा करून पुढे निघून गेले..
२ – ३ मिनिटे बसल्यानंतर मी धावत त्यांच्या दिशेने जाऊ लागलो.. थोडा पुढे गेल्यानंतर मला सगळेच जण खाली वाकलेले दिसले.. प्रत्येकाने गुडघ्यापर्यंत पँट वर सरकवलेली होती.. काय झाले मला कळेनाच.. मी त्याच्या जवळ जाण्यासाठी धावलो.. मला बघताच क्षणी सगळे जण जोराने ओरडले.. ” जवळ नको येवू आमच्या ” .. मी पार घाबरून गेलो.. जागीच थांबलो आणि मित्रांच्या पायाकडे बघू लागलो.. त्यांच्या पायांना किटक चिपकलेले होते.. गाईडच्या पायाला सुद्धा २-३ किटक चिपकलेले होते.. छोट्याशा काठीच्या साह्याने माझा एक मित्र त्याचे किटक काढत होता..तो ते काढत होता पण त्याच्या पायावर ही किटक चिपकलेला होता हे त्याला खूप उशिरा कळले.. हे दृश्य मी Live पाहत होतो.. काय करावं सूचत नव्हतं..
तेवढ्यात ‘ गुगल मित्र ‘ बोलला , ” हे तर जळू आहेत ..Painless Therapy करण्यासाठी याचा वापर करत असतात ..हा शरीरातील अशुद्ध रक्त सोसून घेत असतो ” ..
हे सांगताना त्याने अपरिचित movie ची पण आठवून करून दिली..त्या movie मध्ये कुकर्म करणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर लाखो जळू सोडलेले आम्ही movie मध्ये बघीतले हि होते.. तो सांगत होता पण आमचा त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हता..
जळू हे कुजलेल्या पालापाचोळ्यात खूप असतात.. त्यामुळे कुजलेल्या पालापाचोळ्यात पाय न ठेवता फक्त माती असेल अशाच ठिकाणी पाय ठेवण्याचा सल्ला आम्हाला गाइडने दिला.. त्याप्रमाणे सगळे जण मातीच्या ठिकाणी उभे राहून आपआपले पाय चेक करत होते.. मी मात्र त्यांच्या कडे बघतच उभा होतो.. अखेर सगळ्यानी चेक करून पायावर जळू नसल्याची खात्री करून घेतली.. सगळ्याच्या मनात भीती निर्माण झाली होती.. पालापाचोळा नसलेल्या ठिकाणी पाय टाकत टाकत आम्ही पुढे जाऊ लागलो.. सुरक्षित ठिकाणी जाऊन आम्ही पुन्हा पुन्हा चेक करत असत.. परत चेक केले असता आम्हाला परत धक्का लागला.. काही जणांच्या पायांवर अजूनही काही जळू चिपकलेलेच होते.. एका मित्राला तर असे वाटू लागले की जळू त्याच्या शरीराला Hole करून आत मध्ये चालला आहे की काय ..? तो जोर जोराने ओरडू लागला.. आम्ही सगळे जण खूपच घाबरून गेलो.. गाइड आम्हाला सांत्वना देत होता आणि चिपकलेले जळू काढत होता.. सगळे जळू काढून झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गाचा वेग वाढवला.. चालता चालता गाइड सांगू लागला की मला कड्यावरच्या गणपतीच्या येथे आठवण झाली होती की या रस्त्याने जळू असू शकतात.. पण सांगायचेच राहून गेले.. हे बघा महाशय.. सगळं काही सांगितलं.. महत्त्वाचं तेवढं विसरला..
माझ्या पायावर अजून जळू चढला नव्हता..
मी मित्रांना विचारू लागलो , ” किती वेदना होतात रे चावल्यावर ” ..
” अजिबात वेदना होत नाहीत ” , ते म्हणाले..
” काय..? असं कसं होईल , एवढा चिपकून बसतो आणि वेदना नाही होत , मग तुम्हांला समजले कसे की पायावर काहीतरी चढले आहे म्हणून..” , मी आश्चर्य चकीत होवून विचारू लागलो..
” अरे जळू पायावर चढले की तिथे एकदम थंड गार वाटू लागते ” , एकाने उत्तर दिला ..
येवढ्यात गुगल मित्र म्हणाला , ” मी मघाशी बोलत होतो ना की Painless Therapy साठी वापरतात हे म्हणून ” ..
संभाषण करत आम्ही आमच्या रस्त्याने पुढे जाऊ लागलो.. आणखी थोडं पुढं गेल्यावर आम्हाला परत पालापाचोळ्याचा रस्ता दिसला.. या रस्त्यात पण जळू असतील का ..? असा विचार करतो नी करतो तोच एका मित्राच्या अंगावर परत एक जळू चढला.. आम्ही कसा तरी त्याला काढला आणि जमिनीकडे निरखून बघू लागलो.. जमिनीवर बरेच जळू फिरत होते.. आम्हाला बघून ते जागच्या जागी सरळ ९० अंशाचा कोनात उभे राहत असत.. जसे आम्ही त्यांच्या जवळ जात असत ते डायरेक्ट Jump घेऊन पायावर चिपकत असत.. शरीराला चिपकल्या चिपकल्या ते एवढ्या Speed मध्ये रक्त सोसून घेत असत की क्षणार्धात ते मोठ-मोठे होत असत.. एक जळू जवळपास ५ ते १० मिली रक्त एकाच वेळी सोसून घेवू शकतात , मग असे १०-१२ जळू एकदाच लागले तर झालेच कल्याण.. भीतीने आम्ही अक्षरश: कापू लागलो.. अंगावर नुसते शहारे येवू लागले..
समोर असणाऱ्या पालापाचोळ्यात १०० टक्के जळू असतील हे सांगायची गरज नव्हती , कारण आम्ही उभे असलेल्या ठिकाणाच्या आजूबाजूलाच बरेच जळू दिसत होते..आता काय करायचे..? सगळ्यांचीच हवा टाईट.. सगळ्यानी विचार केला की सरळ धाव ठोकायची जो पर्यंत सुरक्षित जागा येत नाही तो पर्यंत.. मग जळू चढोत अगर न चढोत.. आम्ही त्या पालापाचोळ्याच्या रस्ताने धाव ठोकली.. रस्ता जरा उताराचाच होता.. जवळ पास १ किलोमीटर अंतर पार केले असेल आम्ही , तरी पालापाचोळ्यांचा रस्ता संपेना..धावताना पाय घसरून आम्ही दोघं पडलो ही.. पण लगेच उठून परत रनिंग Start.. अखेर बरेच अंतर पार केल्यानंतर आम्ही सुरक्षित ठिकाणी पोहचलो.. आम्ही सगळे जण स्वत:ला चेक करू लागलो.. सगळ्यांच्याच अंगावर जळू चढले होते फक्त मला सोडून.. प्रत्येकाच्या पायाला जळू चावला होता आणि रक्ताच्या धारा लागल्या होत्या.. चिपकलेले जळू आम्ही कसे तरी काढले.. परंतु कपड्यावर अजून कुठ आहेत का..? ते पण चेक करू लागलो.. पँटला ही जळू चिपकलेले होते.. ते ही काढून टाकले.. माझ्या भावाच्या Socks च्या आत सुद्धा जळू घुसला होता..
आता परत जाणारे दोन रस्ते आमच्या समोर होते.. त्यापैकी एक उतरायला सोपा होता तर दुसरा कठीण परंतु शाॅर्टकट.. जो रस्ता सोपा होता त्या रस्त्याने गेलो तर परत जळूंच्या attack चा सामना करावा लागेल तर दुसऱ्या रस्त्याने जीव मुठीत घेऊन उतरावा लागेल कारण रस्ता जरा चिकटच होता शिवाय नदी पार करावी लागणार होती ..पाऊस जास्त पडल्याने नदीला पाणी ही जास्तच असणार होते.. आम्ही जीव मुठीत घेऊन उतरायचा निर्णय घेतला.. जळूने आम्हाला सळो की पळो करून सोडले होते.. त्यापेक्षा हा रस्ता आम्हाला परवडणारा होता.. निवड केलेल्या रस्त्याने आम्ही उतरू लागलो.. हळूहळू अंधार पडत चालला होता.. तीव्र उतार , चिकट रस्ता आणि पडणारा अंधार यांचा ताळमेळ घालून आम्ही उतरत होतो.. वाटेत चालताना सुद्धा आम्हाला अंगावर जळू असल्याचा भास होत होता.. शेवटी आम्ही माथेरानच्या पायथ्याशी पोहोचलो , परंतु खूप अंधार पडला होता.. आता आम्ही मोबाईलच्या Torch

च्या उजेडावर चालू लागलो.. अजून आम्हाला नदी पार करायची होती.. नदीच्या पाण्याची पातळी थोडी कमी झाली होती , परंतु पार करणं जरा अवघडच होतं.. आम्ही सगळ्यांनी साखळी तयार केली..साखळी मध्ये एकमेकांना आधार मिळतो हे खरं आहे पण एकाचा पाय सरकला तर तो इतरांना ही पाडू शकतो..एकाला आम्ही कसं तरी नदी पार केलं आणि त्याच्याकडे सगळे मोबाईल दिले व हळूहळू नदी पार करू लागलो.. असे आम्हाला दोनदा करावे लागले.. अखेर आम्ही अवघड प्रवास पूर्ण करून सुखरूप ठिकाणी पोहचलो होतो.. इथून थोड्याच अंतरावर आमच्या गाड्या लावलेल्या होत्या.. येताना आम्ही प्रवासातील सगळ्या गोष्टी आठवू लागलो.. काही मजेशीर किस्से तर काही थरारक अनुभव.. आणि तो एक जळू…
या प्रवासावरून आल्यानंतर मी दोन – तीन दिवस व्यवस्थित झोपलो नाही.. मला स्वप्नात ही जळू दिसतात आणि मी दचकून जागा होतो.. जळू चावल्याचा अनुभव मला नाही पण त्याची दहशत मात्र माझ्या मनात अजूनही आहे…