श्री मलंगगड…
-अवघड अशा वाटा
मनाशी ठरवलं आहे ..या वर्षीच्या मान्सून ऋतूतील प्रत्येक रविवारचा आनंद लुटायचा.. मग कुठं बर जायचं ,असा प्रश्न माझ्या मनात येवूच शकत नाही.. तुम्ही विचाराल… का? तर विचारू नका …थांबा मीच सांगतो.. समजा,तुम्ही घरी आहात आणि तुम्हांला तहान लागली, तर तुम्ही सहाजिक आहे घरात असणारं पाणीच पिणार ना कि त्यासाठी नदीवर जाणार…
एक्झॅक्टली तेच सांगतोय…जर माझ्या गावाभोवती निसर्गरम्य असे डोंगर असताना मी कुठ कशाला बरं जाऊ… मान्सून ऋतूतील प्रत्येक आठवडयाला जरी एका डोंगरावर गेलो तरी संपणार नाहीत एवढे लहान मोठे डोंगर आहेत माझ्या गावाभोवती …
लहानपणी मी यापैकी काही डोंगरावर वडिलांबरोबर कित्येक वेळा गेलो आहे, परंतु वडील मला नेहमी सोप्या अशा मार्गाने नेत असत…. अवघड असे मार्ग मी जरा कमीच पाहिलेत…मात्र आज हे अवघड असणारे मार्ग पार करण्यासाठी मी सक्षम आहे….
मागच्या आठवड्यातील ” प्रवास ब्राह्मण ( तवळी) डोंगराचा ” हे तर तुम्ही वाचलं असेल हि आणि फोटो देखील बघीतले असतीलच… आज मात्र तुमच्या माहितीतीलच डोंगरावर जाणार आहे… श्री मलंगगड ( हाजी मलंगगड ) …. रायगड जिल्ह्यास्थित माथेरान पर्वत रांगेतील एक हिल स्टेशन… तसे बघितले तर कल्याण तालुक्याला ही याची हद्द जोडली गेली असल्याने कल्याण तालुक्यातील हाजी मलंगगड अशी ही याची ओळख आहे…
या गडाचा इतिहास तसा जुनाच आहे पण मी काय तुम्हाला ते सांगत बसत नाही.. विकिपिडीया वर तुम्ही ते वाचू शकता… या गडावर जाण्याचे तसे खूप मार्ग आहेत, काही पायऱ्यांचे आहेत तर काही कच्चे… जे खुप अवघड आहेत. अशाच एका मार्गाने आज आम्ही प्रवास करणार आहोत… ते म्हणजे शिरवली मार्गे मलंग गड…
माझं गाव पायथ्याशीच असल्याकारणाने प्रवासाला सुरुवात आज घरापासूनच पायी करावी लागली.. आज आम्ही तिघेच जण होतो… जंगलात जायच म्हणजे भीती वाटणे साहजिक आहे कारण हिंस्त्र प्राण्यांशी सामना करणे एवढी ताकद एका दोघांमध्ये नसते, तरी पण आम्ही विचार केला की असं काही झालं तर कोणी पळून जायच नाही तर तिघे ही एकत्र मिळून भिडायचं मग पुढे काहीही होवो…
आज नदी मार्गे न जाता कच्चा अश्या कडेकपारीतून जायचं होतं.. प्रवासाच्या सुरवातीलाच एकाचा नदीत पाय घसरला आणि पडतापडता वाचला… पुढे गेल्यावर एका स्वच्छ पाण्याने भरलेले तलावात गडाचा अतिशय सुंदर असे प्रतिबिंब दिसत होते , असे दृश्य बघायला लोकं कितीतरी लांबून येत असतात …
आम्ही गडाच्या मूळ पायथ्यापासून चढायला सुरवात केली.. ५-१० मिनिटातच घामाच्या धारा सुरू झाल्या कारण रस्ता हा अतिशय तीव्र चढावाचा असल्यामुळे थोड्याच वेळात आम्ही थकून गेलो… थांबत थांबत आम्ही वर वर जात होतो… आम्हाला काही घाई नव्हती कुठे जायची तर प्रत्येक क्षणाचा आनंद घेवूनच पुढे पुढे जायचं होतं… त्यासाठीच तर आम्ही आलो होतो…
रस्ता हा वळणावळणाचा होता… २-३ दिवसापूर्वी पाऊस पडला असल्याने माती ही ढिसाळ झाली होती त्यामुळे प्रत्येक पाऊल पुढे टाकताना आम्हाला खबरदारी घ्यावी लागत होती… पाय घसरून खाली पडला तर थेट पायथ्याशीच निघायला जाईल एवढा खतरनाक होता तो रस्ता… मजल दरमजल करत करत आम्ही वर-वर जात होतो…
मधेमधे वरून खाली बघितल्यानंतर भयानक अशी दरी दिसायची , परंतु त्याचवेळी दूरवर पाहिलं तर नयनरम्य असे निसर्गाचे दृश्य ही दिसायचे. वर चढल्याचं चीज झाल्यासारखं वाटायचं… या गडावर रानटी केळीची खूप झाड आहेत , काहीना तर छोटी-छोटी केळी ही आली होती, आम्ही त्याचा ही आस्वाद घेतला…
हो नाही करता करता आम्ही अर्धा गड चढून ही गेलो..
आता मात्र तहान आणि भूक दोन्ही ही लागली होती.. तिथेच एका छोट्याशा झाडाखाली बसून निसर्गाचे सौदर्य पाहत आम्ही बरोबर नेलेला नास्ता करू लागलो.. तुम्ही कधी उंचावर बसून असा आनंद घेतला आहे का ..? नसेल तर कधी घेऊन बघाच…
नास्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.. अर्धा रस्ता पार केल्यानंतर अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती.. पाणी संपलं होतं मात्र टार्गेट अजून खूप दूर होतं ..आजूबाजूला कुठे मिळेल असेही दिसत नव्हते.. आता मात्र आम्ही वेग वाढवला.. सर सर करत आम्ही पुढचा रस्ता सहज पार करून सपाट पठारावर पोहोचलो..
पठारावरचा नजारा तर खुपच सुंदर होता.. वर पाण्याचे भरलेले हौद होते, गुरे चरत होती, सोबत गुराखी ही होते.. हौद बघत बघत मी पुढे पुढे जात असताना माझ्या पायाच्या अगदी समोरच नागाचं छोटसं पिल्लू दिसलं.. मी एकदम दचकलो आणि जोराने ओरडलो.. माझे मित्र ही घाबरून गेले की याला अचानक काय झाले म्हणून.. आम्हाला बघून ते नागाचं पिल्लू ही घाबरलं आणि सरपट,उड्या मारत त्याने डायरेक्ट हौदात उडू मारली.. कधी घाबरलेल्या सापाच्या पिल्लाला बघीतलं नसेल तर एकदा बघा कसं उड्या मारतो तो.. कारण त्याला नीट सरपटता ही येत नाही…
पठारावरून जेव्हा खाली बघितलं तर अख्ख्या पनवेल तालुक्याचा परिसर दिसत होता… असे दृश्य जेव्हा नजरेस पडते तेव्हा प्रवासाचे सार्थक झाल्याचा जो आनंद मिळतो तो काही औरच असतो…
जशी वर चढताना आम्ही काळजी घेतली तशीच खाली उतरताना ही घेतली.. उतरताना चे तीव्र उतार आम्ही मोठे धाडस करून एकमेकाचा आधार घेऊन पार केले आणि जसे सुरक्षित वर चढलो तसेच सुरक्षित खाली उतरलो …
खाली उतरल्यानंतर पायथ्याशी बसून आम्ही तिघेही त्या गडाकडे एकटक पाहत राहिलो… काय विचार करत असू याचा विचार तुम्हीच करा.. आम्ही मात्र आता आराम करणार आहे….