भिजलेलं पाखरू…
– प्रतिक्षा पुनर्जन्माची
” आई , आभाळ एवढा काळा का झालाय गं..? “, त्या इवल्याशा पाखराच्या पिल्ल्याने तीला विचारले..
” बाळा , आता पावसाळा ऋतू येणार आहे.. ” , पिल्लाच्या प्रश्नाला आईने ही उत्तर दिले..
” काय असत गं ते..? ” , पिल्लाने लगेच दुसरा प्रश्न केला..
” आभाळातून पाणी पडत असतो.. ” , तीने जरा रोषानेच त्याच्याकडे बघून उत्तर दिले..
मनात खूप सारे प्रश्न होते त्याच्या .. परंतु आई रागावेल म्हणून त्याने विचारनं बंद केले.. एरवी पण तो असाच प्रश्न विचारून तीला हैराण करायचा.. इवलेसे पिल्लूच ते.. ७-८ महिन्याचं असेल.. हिवाळा आणि उन्हाळा ऋतू त्यानी अनुभवला होता , पण पावसाळा नक्की काय असतो, हे जाणून घेण्याची त्याची इच्छा होती.. आभाळातून पाणी पडणार ह्या आईने दिलेल्या उत्तराने त्याला नवलच वाटले होते.. पण रोज रोज आईला किती प्रश्न विचारायचे म्हणून त्याने बोलणं टाळलं.. आता हा पावसाळा ऋतू कसा आहे हे स्वत:च जाणून घ्यायचं असा त्यानी विचार केला आणि आभाळाकडे बघत राहिला.. काळे-निळे चालणारे ढग बघून त्याला खूपच मज्जा येवू लागली.. आभाळातील बदलत जाणाऱ्या रंगबेरंगी छटानी तो भारावून गेला..
” अय्या..! किती सुंदर असतो पावसाळा .. ” , आनंदाने तो आईला सांगू लागला.. पण आई काही खूश दिसत नव्हती हे बघून आपसूकच त्याचा ही मूड आॅफ झाला..
बदलणाऱ्या आभाळा बरोबरच आता संथ हवेची झुळूक वाहू लागली.. अंगाला लागणारा गार गार वारा त्याला हवाहवासा वाटू लागला.. उन्हाळ्यात खूप चटके सोसले होते त्याने.. तशी आई पंखाने त्याला सावली करून देत ही होती , पण तरीही उन्हाच्या कचाट्यातून तो सुटला नव्हता.. हळूहळू रिमझिम करत पावसाने सुरूवात केली..
” हाच का तो पावसाळा..!” , तो पुटपुटला.. हा तर इतर ऋतूंपेक्षा कितीतरी मस्त आहे.. पडणाऱ्या रिमझिम पावसात तो आनंदाने नाचू लागला.. अजून उडता तर येत नव्हते त्याला.. पण जमेल तसे पंखं फडफडायचा..
हळूहळू अंधार पडत चालला होता.. रिमझिम पडणाऱ्या पावसा बरोबर आता मात्र वाऱ्याचा वेग वाढला.. घरटं असलेले झाड हलू लागले.. आईने त्याला जवळ घेऊन पंखाखाली लपवले.. आईच्या पंखातून तोंड बाहेर काढून तो पडणाऱ्या पावसाचा आनंद घेऊ लागला.. अचानक जोराचा आवाज झाला.. तो घाबरून गेला..
” कसला आवाज आहे गं हा..?” , त्याने घाबरलेल्या स्थितीतच आईला विचारले..
” ढग एकमेकांवर आपटले ना, की असा आवाज येतो..”, तीने त्याला पंखाने आणखी घट्ट पकडून सांगितले.. वीजा ही चमकू लागल्या होत्या.. चमकणाऱ्या वीजा बघून तो पार बिथरून गेला..
” हे काय चमकले गं..?” , बिथरलेल्या पिल्लाने तीला विचारले..
” आपटलेल्या ढगांचे घर्षण होऊन जो प्रकाश पडतो ना त्याला वीज म्हणतात.. ही खूप घातकी असते.. एखाद्या झाडावर पडली की ते झाड जळून एकदम खाक होते.. “, तीने ही बिथरलेल्या पिल्लाला समजावून सांगितले..
ही वीज आपल्या झाडावर पडली तर.. या विचाराने तो आणखीनच जास्त घाबरून गेला..
पावसाने रूद्र रूप धारण केले होते.. मुसळधार पडणाऱ्या पावसाने घरटे पार भिजवून गेले होते..
” आई, बाबा अजून परत कसे नाही आले गं..? ” , घाबरलेल्या पिल्लाला आता वडीलांची आठवण झाली.. तीला ही काळजी वाटू लागली होती.. सहसा अंधार पडायच्या आत ते परत येत असतात, मग आज त्यांना एवढा उशीर का बरं झाला असेल.. नको नको त्या विचाराने तीची चिंता वाढू लागली.. वाऱ्याचा वेग आणि पावसाचा रोष बघून तीच्या ह्रदयातील धकधक वाढू लागली होती.. पिल्लू ही पार घाबरून गेलं होतं.. सुरूवातीला मस्त वाटणारा पावसाळा आता त्याला भयानक वाटू लागला होता.. वाऱ्याने घरटे असलेले झाड झोक्यासारखे हलू लागले.. आजूबाजूची छोटी झाडं तर लव्हाळ्या सारखी भुईसपाट होवू लागली होती.. मध्येच कट असा आवाज करून सर्वात मोठा आणि जुना असलेला झाड मध्यभागातून तुटून खाली पडला.. आता आपलं झाड ही टिकणार नाही असे त्या पिल्लाच्या आईला वाटू लागले.. तीने तसेच पिल्लाला चोचीमध्ये पकडले आणि उडान घेतले.. उडताच क्षणी घरटं असलेले झाड कोलमडून पडलं.. उडत असताना ती ही वाऱ्याच्या झोता बरोबर जावून एका दुसऱ्या झाडावर आपटली.. तिच्या चोचीमधले पिल्लू ही चोचीतून निसटून खाली पडले.. दोघांना ही मार लागला होता.. तीने कसे तरी स्वत:ला सावरून त्या पिल्लाला पुन्हा चोचीमधे पकडले आणि भरारी घेवून सुरक्षित ठिकाण शोधू लागली..
पिल्लाला तर काय चाललय कायच समजत नव्हते.. तो पार भांबावून गेला होता.. एवढा खतरनाक पावसाळा असतो हे बघून त्याला पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाचा तिटकारा वाटू लागला..उडत उडत ती खूप दूर चालली होती , परंतु कुठेच तीला सुरक्षित जागा दिसत नव्हती.. खूप वेळ प्रवास केल्यानंतर तीला शहरातील लाईटचा उजेड दिसू लागला.. तीने त्या दिशेने झेप घेतली.. चोचीतले पिल्लू बेशुद्ध होवून गेलं होतं.. तीने एका पत्र्याचे शेड असलेल्या इमारतीच्या टेरेस वर जावून एक बसण्यालायक जागा शोधली.. पिल्लाला खाली ठेवलं , अंगावरील पाणी झटकून टाकलं.. डोक्याने पिल्लाच्या अंगावरील पाणी ही पुसून काढलं आणि त्याला पंखाखाली घेऊन उब देवू लागली.. पाऊस अजूनही धो धो पडतच होता.. पिल्लाचे बाबा कुठे असतील या विचाराने तीची चिंता आणखीनच वाढली होती.. आता ते परत आले तर आम्हाला कुठे शोधतील या विचाराने ही ती परेशान झाली होती.. आजची रात्र इथेच काढू आणि उद्या परत घरटे असलेल्या ठिकाणी जावू असा तीने विचार केला आणि ती ही झोपी गेली..
सकाळच्या सुर्य प्रकाशाने तीला जाग आली.. पिल्लू अजूनही ही झोपलेलचं होतं.. थोड्या वेळाने त्याला ही जाग आली.. जेव्हा तो जागा झाला तेव्हा आजूबाजूचे दृश्य बघून आवाकच झाला.. सभोवताली असणाऱ्या भव्य उच्च इमारती, रस्त्याने चालणाऱ्या गाड्या आणि फिरणारी माणसं बघून तो चक्रावून गेला..
” आई, कुठं आलोय गं आपण..? ” , त्या पिल्लाने तीला विचारले..
” बाळा, हे शहर आहे.. बाबा इकडूच नेत असतात तुझ्यासाठी खाऊ ..” , तीने ही त्याला सांगितले..
” आई, बाबा आलेच नाही का गं अजून..? “, त्याने लगेच दुसरा प्रश्न केला.. पिल्लाच्या प्रश्नाने आता मात्र ती निरुत्तर राहिली..
एका बिल्डिंगच्या गॅलरीत खेळणारी मुलं बघून त्या पिल्लाला ही मज्जा येवू लागली..
” आई, कोण आहेत गं ते..? “, त्याने आणखी एक प्रश्न केला..
” ती माणसं आहेत , बाळा.. तीच आपल्याला खाऊ टाकत असतात.. ” , ती त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होती..
” आई , त्यांचं घर बघ ना किती मस्त आहे.. पाऊस पण नाही पडत त्यांच्या घरात.. आपल्याला पण असच घर पाहीजे होतं ना.. कधी भेटणार आपल्याला तसं घर.. “, त्याने उत्सुक होवून तीला विचारले..
” बाळा, ते माणसांचं घर आहे.. आपल्या पाखरांसाठी नसतं ते.. “, ती त्याला समजावून सांगू लागली..
” मग मला ही माणूस बनायचंय.. “, तो हट्ट करू लागला.. आता त्याला कसं समजवायचं.. ती पेचात पडली.. न राहून शेवटी ती म्हणाली..
” बाळा, पुढच्या जन्मी आपण ही माणूस बनू आणि असेच घर बांधू.. “
” मग कधी मिळेल गं पुढचा जन्म..? “, त्याची आणखीनच अतुरता वाढली.. आता मात्र तीला राग आला आणि रागाच्या भरात ती त्याच्यावर ओरडून म्हणाली..
” मेल्यानंतर.. “
मरण काय असतं.. हे माहीत तर नव्हतंच त्याला पण आई रागावली हे बघून गप्पच बसला.. तेवढ्यात कोणी तरी व्यक्ती टेरेस च्या दिशेने येताना तिने बघितले.. तीने सावध होऊन पिल्लाला चोचीत पकडले.. त्या व्यक्तीने त्या पाखरांना बघून बाजूलाच पडलेली काठी उचलली आणि त्यांच्या दिशेने भिरकावली.. त्या काठीला चुकवून तीने कशीतरी भरारी घेतली आणि घरटे असणाऱ्या झाडाच्या दिशेने निघाली.. त्या व्यक्तीने केलेल्या कृतीने पिल्लू जरा हादरलाच.. माणूस असा ही असतो हे बघून त्याला जरा वाईटच वाटले.. काय केला होता आम्ही..? पावसामुळे असराच तर घेतला होता ना.. कोणता त्रास दिला होता त्याला..? जो आम्हाला मारण्यासाठी काठी फेकली आमच्या अंगावर.. थोड्या वेळात ती घरटं असलेल्या ठिकाणी पोहचली.. झाड कोलमडून पडलं होतं.. घरटं ही तुटून गेलं होतं.. तेवढ्यात तीची नजर बाजूला पडलेल्या पाखराच्या बाबांकडे गेली.. रक्ताने बंबाल होवून तो निपचित पडला होता.. तीने लगेच त्याच्या दिशेने झेप घेतली.. चोचीतल्या पिल्लाला बाजूला ठेवले आणि त्याला उठवू लागली.. त्याचे डोळे बंद होते.. शरीर कडक झाले होते.. अंगावर मुंग्या आल्या होत्या.. त्याची प्राणज्योत मावललेली होती.. चोचीत पिल्लासाठी आणलेले दाणे तसेच होते.. तिने एकदमच टाहो फोडला.. तीला रडताना बघून पिल्लू तीला विचारू लागला, ” आई, काय झालं गं बाबांना ..?”
ती त्याला जवळ घेऊन रडत रडत सांगू लागली..
” तुझे बाबा नाही राहीले अाता.. ते मरण पावले आहेत.. “
” मरण पावले ..! म्हणजे आता बाबांना माणसाचा जन्म मिळणार ना “, ते केविलवाणे पिल्लू बोलू लागले.. ती फक्त रडतच राहीली.. आता बाबा माणूस होणार आणि आपल्याला ही शहरातल्या सारखं घर बांधणार आणि आम्हाला पण घेऊन जाणार.. असा तो विचार करू लागला..
बरेच दिवस उलटून गेले.. तरी त्याचे बाबा त्यांना नेण्यासाठी परत आले नाही .. येणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये त्याला बाबा दिसू लागले होते.. परंतु कोणत्याही माणसांने त्यांच्याकडे ढूंकून ही बघितले नाही.. कुठे राहीले असतील माझे बाबा.. त्या पहिल्या पावसात पण तो वाट बघत होता.. आज ही बघत आहे.. पण तेव्हा ही बाबा आले नव्हते आणि आज ही नाही .. आज नाही तर उद्या मला ही मरण येईल आणि माझा ही पुर्नजन्म होईल याचीच प्रतिक्षा करत ते भिजलेलं पाखराचं पिल्लू झाडाच्या फांदीवर बसून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे एकटक बघत बसला आहे..